लोकसत्ता मुंबई आवृत्तीमधील श्री. गिरीश कुबेर यांचा ‘एक जखम वाहती ..’ हा लेख माहितीपूर्ण आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील युरोपीय महासत्तांच्या ‘गुर्मी’ ची त्यातून चांगली कल्पना येते. युद्ध जिंकण्यांच्या २ वर्षें आधीच या महासत्तांनी ‘वाळूत रेघा’ मारल्या होत्या !
पण लेखात दिलेल्या बॅकग्राउंड-माहितीत कांहीं किरकोळ तपशिलाची गफलत आहे.
पॅलेस्टाइन भूभाग हा, इंग्लंड व फ्रान्स यांच्यामध्ये विभागण्यांसाठी झालेला ‘सायकस-पिको करार’ ही घटना १९१६ ची आहे. कुबेर यांनी या समयींच्या ब्रिटिश साम्राज्यात अमेरिकेचा उल्लेख केलेला आहे.
अमेरिका एके काळीं ब्रिटनच्या साम्राज्याचा एक भाग होती, हें खरें आहे. पण ती स्थिती १७७५ च्या आधीची होती. त्यानंतर अमेरिकेचें स्वातंत्र्य-युद्ध सुरूं झालें व १७८३ पर्यंत चाललें. म्हणजेच, सायमन-पिको कराराच्या सव्वाशे वर्षें आधीची ही घटना आहे. त्यामुळे तिचा या कराराशी प्रत्यक्षाप्रत्यक्ष कांहींही संबंध नाहीं.
हा करार झाला तेव्हां केमाल पाशा हा ऑटोमन साम्राज्याचा सम्राट होता, असा उल्लेख कुबेरांनी केला आहे. केमाल पाशा (अतातुर्क) हा पहिल्या महायुद्धात ( १९१४ ते १९१८ ) लढत होता ; तो त्यावेळी सैन्यात होता. लेखात उल्लेख आहे तसा तो ऑटिमन साम्राज्याचा सम्राट नव्हता, कधीच नव्हता. तऑटोमन साम्राज्य हें, पहिलें महायुद्ध संपल्यावर लयाला गेलें. १९१९ ते १९२१-२२ हा, केमाल पाशानें टर्कीमध्ये केलेल्या क्रांतियुद्धाचा काळ आहे. त्यानें टर्कीत ‘रिपब्लिक’ सुरूं केलें.
मात्र, या किरकोळ गफलतीमुळे मुख्य माहितीला कांहीं बाधा पोचत नाहीं.
— सुभाष नाईक
Leave a Reply