नवीन लेखन...

गणपति : विज्ञानयुगीन उकल : गणपतीचे विविध अवतार

A scientific corelation

पुराणवाङ्मयात गणेशाच्या अवतारांचा उल्लेख आहे. पुराणें वेदांहून खूपच अर्वाचीन आहेत हें खरें. (पुराणाचा काळ आहे, इ.स. च्या पहिल्या सहस्रखातीक पहिली काही शतकें). परंतु, आधी म्हटल्याप्रमाणें, एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, ती ही की, कालप्रवाहात जनसमूहांमधे अनेक प्रकारची माहिती व ज्ञान पिढ्यान् पिढ्या मौखिक स्वरूपात चालत येते, व नंतरच त्याचा लिखित साहित्यात समावेश होतो. त्यामुळे, हें गृहीत धरायला हरकत नसावी, की पुराणांमधील उल्लेखांच्या खूप आधीपासूनच, गणेशावतारांची संकल्पना व माहिती जनमानसामधे रूढ झालेली आहे.

अवतार घेणें म्हणजे धरतीवर पुनरामन करणें. अर्थातच, गणेशावतार म्हटलें की, गजाननाचे धरतीवर पुन्हापुन्हा आगमन आभिप्रेत आहे. त्या संकल्पनेचा वैज्ञानिक अर्थही आपण शोधायला हवा.

एक महत्वाची शक्यता अशी : अवकाशप्रवासात ‘टाइम-डायलेशन’ होतें. म्हणजेच, पृथ्वीवर अनेक शतकें लोटलेली असली, तरी अवकाशयानातील प्रवाशासाठी फक्त अल्प वर्षेंच गेलेली असतात. (अशी सापेक्ष कालगणना भारतीय परंपरेमधेसुद्धा आहे. मानवाची अमुक-लक्ष वर्षें म्हणजे ‘ब्रह्म्याचे’ एक वर्ष, असें भारतीय परंपरा सांगते.) म्हणजे असें पहा, हा अवकाशयात्री (किंवा त्याची टोळी) एकदा येऊन गेल्यानंतर, पुढील वेळी जेव्हां पृथ्वीवर उतरला असेल, तेव्हां तो स्वत: फक्त थोडीशी वर्षेंच व्यतीत करून आलेला असेल, परंतु पृथ्वीवर मात्र कैक शतकें व अनेक पिढ्या गेलेल्या असतील. त्यामुळे, अवकाशप्रवासी ही व्यक्ती स्वत: तीच जरी असली तरी, पृथ्वीवासीयांना तो नवीन ‘अवतार’ वाटणें स्वाभाविक आहे.

दुसरी एक शक्यता : आपण आणखीही एक अन्य गोष्ट आपण ध्यानात घेऊं. आपण हें पाहिलेंच आहे की, ‘विशालकाय गजानन’ म्हणजे ‘स्पेस-सूट घातलेला अवकाशप्रवासी’ आहे. आतां, एक गोष्ट उघड आहे की, स्पेस-सूट हा एकप्रकारचा ‘युनिफॉर्म’च (गणवेश) आहे. आणि, आपणां सर्वांना ठाऊकच आहे की, गणवेश घातलेल्या सर्व व्यक्ती, दुरून नजर टाकल्यावर ‘एकसारख्याच’ दिसतात. उदाहरणार्थ, पोलिस, फायर-ब्रिगेडवाले, सैनिक, वगैरे. त्यामुळे, आधी व कालांतरानें पृथ्वीवर उतरलेल्या व असा युनिफॉर्म म्हणजे स्पेस-सूट घातलेल्या अवकाशयात्री व्यक्ती जरी भिन्न भिन्न असल्या, तरी बघणार्‍याना ‘ती एकच व्यक्ती पुन्हा अवतरली आहे’, असे वाटणें सहज शक्य आहे.

हल्लीचे उदाहरण : आपण हल्लीचे एक उदाहरण घेऊन हा मुद्दा अधिक स्पष्ट करू. काहीं दशकांपूर्वी पृथ्वीवासी ‘ऍस्ट्रॉनॉट’ आर्मस्ट्राँग हा चंद्रावर उतरला होता. तेव्हां त्यानें स्पेस-सूट घातलेला होता. आपण त्याची तशा वेशातील, चंद्रावरील छायाचित्रेही पाहिलेली असतील.

समजा, चंद्रावर त्यासमयीं जर कोणी अप्रगत जीव वास करत असते, तर त्यांना आर्मस्ट्राँग हा गजाननासारखा, व आकाशातून उतरलेला, ‘देव’ वाटू शकला असता.

आणि, कांही दशकांनंतर,. किंवा शतकांनंतर, जर दुसरा एखादा, तसाच स्पेस-सूट घातलेला ऍस्ट्रॉनॉट चंद्रावर उतरला, तर तेथील जीवांना तो ‘त्या देवाचा अवतार’ आहे, त्या देवाचें ‘पुनरागमन’ झालें आहे, असेच वाटलें असते.

म्हणूनच, आपल्याला गजाननाच्या अवतारांचा उल्लेख मिळतो ; गजानन अनादि आहे, अनंत आहे, असें मानलें जातें.

विविध अवतारांची भिन्नभिन्न वाहनें :

पुराणांनुसार, गजाननाच्या प्रत्येक अवताराचें वाहन भिन्न आहे. जसें, उंदीर, सिंह, मोर. तें कां, याचाही विचार करायला हवा.

याचें स्पष्टीकरण सोपें आहे. आजही, मोटारींचे वेगवेगळे आकार आपण पाहतोच. तसेंच, फक्त-जमिनीवर पळणारी मोटार, पाण्यात-चालणारी होडी किंवा बोट, व ‘ऍम्फिबियस’ (भूमी व पाणी, दोन्हीवर प्रवास करू शकणारें) हॉवरक्राफ्ट यांचे स्वरूप भिन्नभिन्नच असते.

ज़रासे-वरती, आकाशात प्रवास करू शकणार्‍या, हवाई-बलून (एअर-शिप), ग्लायडर व हेलिकॉप्टर यांचे स्वरूपही एकमेकांपेक्षा वेगळें असतें. जमिनीवरून टेक्-ऑफ् घेऊन उंच-उंच उडणार्‍या जेट-विमानांचा आकार अगदीच वेगळा असतो. असेच ‘फ्लाइंग-सॉसर्स’चें होतें आहे. अशा ‘उडत्या तबकड्या’ वस्तुत: अस्तित्वात आहेत की नाहींत, हा एक वेगळाच विषय आहे, परंतु, एक मात्र खरें की, ज्यांना अशी ‘अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑबजेक्टस्’ (UFOs) ‘दिसलेली’ आहेत, ते लोक त्यांच्या आकाराचें भिन्नभिन्न वर्णन सांगतात, जसें, बशीसारखें, चिरूटासारखें, गोळ्यासारखे- गोलाकार (speherical), इत्यादि.

त्याप्रमाणेंच, अवकाशप्रवासी वापरत असलेल्या ‘ग्राउंड-कार्स’चें (पृथ्वीग्रहावरती, जमिनीवर, पाण्यात, किंवा काहीं उंचीवर आकाशातून, प्रवास करू शकणार्‍या वाहनांचें) स्वरूप कालानुसार किंवा आवश्यकतेनुसार, भिन्नभिन्न असूं शकेल; व त्यामुळे, भूतलवासियांना त्या वेगवेगळ्या प्राण्यांप्रमाणें दिसल्या असाव्यात.

गणपति : विज्ञानयुगीन उकल : गजाननाची विज्ञानयुगीन प्रार्थना, आरती :

गजमुख देव गणपतीची स्तोत्रे, प्रार्थना, नमन, वंदना, आरत्या, हें सर्व आपण वाचलेलें-ऐकलेलें आहे. पण, परग्रहवासी-अवकाशप्रवासी अशा गजाननासाठी जुनी स्तोत्रें इत्यादी कितपत उपयोगी ठरतील ? त्यासाठी, त्याची ही विज्ञानयुगीन नूतन स्तुती, नूतन आरती :

‘व्योमातुन अवतरला गजमुख’
अंतराळ-यायित्राकासारखा धारुन गणवेश
व्योमातुन अवतरला गजमुख, देव-गणाधीश ।। १

सोंडेसम भासतो मुखवटा, ‘प्राणवायु’ पुरवी
संरक्षक अवकाश-कवच त्या तुंदिलतनु बनवी
ध्वनिसंवर्धक मुखाजवळ, जणुं हस्तिदंत एक
शूर्पकर्णसम बशीमधे केंद्रित ध्वनि प्रत्येक
अश्वहीन रथ मूषक भासे, पुच्छ धूम्ररेष ।।
व्योमातुन अवतरला गजमुख देव-गणाधीश ।। २

प्रकाशगतिनें कुठून आला लक्ष-लोक लांघुनी
भूवर कधि, कितिदा अवतरला, नच जाणे कोणी
कोटिकोटि मानव-जन्मांच्या पल्याड कर्तृत्व
मर्त्य जगाला कालातीतच वाटे अस्तित्व
निरर्थ भूत-भविष्या करतो, अवकाशा दास ।।
व्योमातुन अवतरला गजमुख देव-गणाधीश ।। ३

असे हें, कालातीत गजाननाचें, अवकाशयात्री-गण-पतीचे व गणेशाच्या अवतारांचे विज्ञानयुगीन स्पष्टीकरण. वाचल्याबरोबर, लागलीच तें पटो न पटो; पण काहीं अवधीनंतर तें सर्वांच्या विचारांना नक्कीच चालना देईल, अशी खात्री वाटते. काही काळाने, एखाद्या गणेशोत्सवात वरील आरतीचा गजर घुमला तर आश्चर्य वाटायला नको.

— सुभाष स. नाईक.
मुंबई.
M – 9869002126.

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..