अंग्रजीत अे पासून झेड् पर्यंत 26 अक्षरे असल्यामुळे आणि त्यांना काना मात्रा वेलांटया नसल्यामुळे अक्षरानुक्रम पाळणे फार सोपे आहे. पण देवनागरीतील कोशवाङमयात बर्याच अडचणी येतात.
देवनागरीतील वेगवेगळे कोश किंवा मराठी पुस्तकांच्या शेवटी असलेली सूची बघितली तर चटकन लक्षात येते की मराठीत अक्षरानुक्रम पाळण्यात अेकसूत्रता नाही. ती आणणे आणि अंग्रजीतून आलेले विज्ञानविषयक किंवा अतर शब्द सामावून घेण्यासाठी नवी स्वरावली स्वीकारणे आवश्यक झाले आहे. अुदा. अ अॅ आ ऑ अि अी अु अू अे अै ओ औ अं असे तेरा स्वर घ्यावे लागतील. ऋ ऋ लृ लृ आणि अ: हे शुद्ध स्वर नाहीत असे माझे मत आहे. वृद्ध कृष्ण ह्यासारख्या शब्दात ऋ अजून शिल्लक आहे. ‘पुन:प्रत्यय’ ‘दु:ख’ सारखे शब्द अजून प्रचारात आहेत ही आनंदाची बाब आहे. व्रूद्ध, क्रूष्ण, दुख्ख पुन्हा असे रूप घेअून ते सामावून घेतले जाअू शकतात. अर्थात त्यांचे अुच्चार सर्वथा सारखे नाहीत हे मान्य आहे.
वा. गो. आपटे ह्यांच्या ‘मराठी शब्दरत्नाकर’ ( 1956 सालची 4थी आवृत्रि ) ह्या शाब्दकोशात अनुस्वारीत अक्षर हे त्यानंतरच्या व्यंजनाच्या क्रमानुसार घेतले आहे. अुदा. ‘पंक’ हा शब्द ‘पईज’ नंतर पण ‘पकड’ ह्या शब्दाआधी घेतला आहे. ‘पंखा’ हा शब्द ‘पखवाज’ नंतर पण ‘पखाल’ ह्या शब्दाआधी घेतला आहे. ह्यावरून असे दिसते की अनुस्वारीत अक्षरे अननुस्वारीत अक्षरांच्या आधी घेतली आहेत म्हणजे अ च्या आधी अं आला आहे. आणि तोही सलग आलेला नाही तर पुढील व्यंजनानुसार विखुरला आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळाच्या ‘विश्वकोशात’ ही अनुस्वारीत अक्षरे अननुस्वारीत अक्षरांच्या आधी घेतली आहेत पण ती सलग घेतली आहेत म्हणजेच अंगभूषा, अंतरीक्षविज्ञान, अंबालिका हे शब्द अकुंठित, अखिल वगैरे शब्दांच्या आधी घेतले आहेत.
वरील दोन्ही कोशांत अर्धाक्षरांचा क्रम पूर्णाक्षरानंतर घेतला आहे. शब्दरत्नाकरात व्यंजनांची ओळख करून देतांना असे लिहिले आहे :
क – मराठी व्यंजनातील पहिले व्यंजन
ख – मराठी व्यंजनातील दुसरे व्यंजन वगैरे.
वास्तविक खरी व्यंजने ‘क’ ‘ख्’ अशी आहेत. आणि त्यांस अ हा स्वर जोडला म्हणजे क ख वगैरे ‘अक्षरे’ होतात. म्हणजेच अर्थाक्षरे (व्यंजने) ही पूर्णाक्षराआधीच आली पाहिजेत. म्हणूनच मी म्हाडदळकर हे आडनाव मकाशीर ह्या आडनावाआधी घेतले आहे.
अ आ अि अी ह्या क्रमानुसार अं चा क्रम 11वा घेतला तर फक्त अंकलकोटे किंवा अंकलीकर ह्या आडनावांची सोय होते पण आंग्रे, अंगळे, अुंटवाले, अेंगठे, ओंकार, औंधकर ही आडनावे कोणत्या क्रमाने घेणार? म्हणून अनुस्वारीत अक्षरांचा क्रम अननुस्वारीत अक्षरानंतर घेतला आहे. ‘अ’ नंतर ‘अं’ ‘आ’ नंतर ‘अम’ ‘अ’ नंतर ‘अं’ वगैरे. ह्यात रूढीक्रम बदलण्याचा प्रश्नच अुद्भवत नाही. ह्याचप्रमाणे कंक, कांग्रळकर, किंजवडेकर, कुंचीकर, केंगे, कोंगरे, कौंदाडे वगैरे आडनावांचा क्रम अननुस्वारीत अक्षरानंतर घेतला आहे.
कोशकर्त्याने अेक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावयास हवी ती ही की कोणता शब्द नेमका कोठे सापडेल हे संदर्भ घेणार्या व्यक्तिला चटकन अुमगले पाहिजे. अंग्रजीत ही अडचण अजिबात येत नाही. देवनागरीतील कोशवाङमयात सुसूत्रता आणल्यास फार मोठी गैरसोय दूर होण्यासारखी आहे. मी वापरलेला — प्रथम अर्धाक्षरे नंतर पूर्णाक्षरे व नंतर अनुस्वारीत अक्षरे हा क्रम सर्वथा निर्दोष आहे असा माझा दावा नाही पण त्यामुळे अेकादे आडनाव नेमके कोठे सापडेल हे चटकन अुमगते.
रूढी बदलेल अशी भीति बाळगण्याचे कारण नसावे कारण तत्कालीन समाजाच्या सोयीनुसार रूढी बदलतातच.
— गजानन वामनाचार्य
Leave a Reply