नवीन लेखन...

डुईसबुर्ग जर्मनी ‘प्राणिसंग्रहालयाचा’ फेरफटका – भाग २

फ्लेमिंगो ची स्वारी त्यांची शोभा न्यारी

आणखीन एका पक्षाने आमचं लक्ष वेधून घेतले आणि तो म्हणजे फ्लेमिंगो! त्यांचे रंग,  लाल,  गुलाबी आणि अबोली. त्याचा मुलाचा रंग राखाडी असतो. परंतु, (कॅरटोनॉइड) गाजरासारख्या कंदमुळाच्या खाण्यातून त्यांना असे विविध छटांचे रंग प्राप्त होतात. असे विविध लाल रंगातील ‘फ्लेमिंगो’ हिरव्या झाडांच्या पार्श्वभूमीवर फारच खुलून दिसत होते. फ्लेमिंगो हा शब्द मुळात लॅटिन आणि स्पॅनिश या भाषांमधून आला आहे. ‘फायर’ – म्हणजे ‘फ्लेम’. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे उंचच – उंच बारीक, काडीसारखे दिसणारे दोन पाय. पण त्यातील एक पाय तो जमिनीवर ठेवतो आणि बऱ्याच वेळा दुसरा पाय आपल्या पोटाशी दुमडून घेतो. आम्ही गेलो त्या दिवशी तेथे ६-७ फ्लेमिंगो आमच्या समोरून जाणाऱ्या उपवनातल्या मातीच्या रस्त्यावरून जात होते आणि लागेचच एका वळणावरून आमच्या उजवीकडे वळत होते. तिथले नागमोडी रस्ते त्या हिरव्या  झाडी झुडपांची शोभा वाढवत होते. चालताना त्यांचे आमच्याकडे लक्ष नव्हते. आणि काहीतरी  शोधण्याचा प्रयत्न करत होते. त्यातला एक वयस्क- म्हाताऱ्या फ्लेमिंगोला जमिनीवर एक पाय ठेवताना त्रास होत होता. हे पाहून आम्हाला त्याची खूपच दया अली.

फ्लेमिंगो एका वर्ष्यामधे एकाच ‘अंडे’ देतात- घालतात. तसेच शरीराची उष्णता जगण्यासाठी, ऊर्जा वाचवण्यासाठी ते एका पायावर उभे राहतात आणि त्यांचे आयुष्य २० वर्षांपर्यंत असते. ते पाण्यात उभे राहून चिखलातील अन्न वेचतात आणि भक्षण करतात. अश्या एका अनोख्या आकर्षक आणि चित्तवेधक पक्षाकडे पाहून आम्हाला अतिशय समाधान वाटले

जिराफांचा अभ्यास

मला स्वतःला : जिराफ खूपच आवडतात. त्यांना पाहता क्षणीच, जिराफांच्या उंच कुंपणांसमोर उभे राहताच  मला आनंदाचे भरते आले.  विस्तीर्ण परिसरात केवळ चारच जिराफ होते.  कधीकधी ते एकमेकाला ढुशा मारत-मारत, पुढे पुढे जात होते.  थोड्या थोड्या अंतरावर त्यांना खाण्याजोगे झाडे-झुडपे लावली गेली होती. त्यांचा माना उंच कराव्या लागतील एवढ्या उंचीवर, थोड्या थोड्या अंतरावर खाण्याचे पदार्थ ‘शिंकाळ्यान्मध्ये’ भरून ते लोम्बकाळत  झाडांवर बांधले होते. त्या शिंकाळ्यान्मध्ये ‘पाने, डहाळ्या, झाडांवरची फळे, झुडुपांची पाने,  कळ्या यांचा खुराक बांधलेला होता.  जिराफांची मानाचं ६ फुटांपेक्षा लांब असल्या मुळे त्यांना उंचावरचे  खाणे सुलभ होते पण वाकून पाणी पिणे कठीण जाते. एक जिराफ उभ्या उभ्याच झोपत होता आणि तोंडाने ‘बें, बें असा आवाज करीत होता.  मी हे सर्व न्याहाळत असताना , जवळच थोड्या अंतरावर असलेल्या दोन जर्मन विद्यार्थिनींशी माझी ओळख झाली.  त्यांना थोडेफार इंग्रजीचे ज्ञान अवगत  होते.  त्यामुळे आमच्यात संवाद  शक्य झाला.  विद्यार्थिनींच्या  प्रोजेक्टचा विषय ‘जिराफ’ हा होता. जिराफ किती पावले चालतो, मान किती वेळा हलवितो,. त्यांचा खाण्याच्या पद्धती काय आहेत वगरे अनेक गोष्टीचे निरीक्षण करून  त्या नोंदी करत होत्या आणि चित्रे काढीत होत्या. मला त्यांचे मोठे कौतुक वाटले . जिराफ हा, नामशेष होण्याचा धोका असलेल्या प्राण्यामध्ये मोडतो आणि त्यांची  संख्या रोडावत चालली आहे.   त्यांचा त्या अभ्यास करत होत्या..

आफ्रिकन आणि इतर देशीय ‘पेंग्विन’ पक्षी  फारच ऐटदारपणे पाण्याचा ओढ्याचा किनाऱ्यावर चालत होते. पांढरे पोट आणि ‘काळे गडद पंख’  असे त्यांचे रूप पाहताच पांढरा शर्ट आणि ‘काळी डगली’ घालून न्यायालयाच्या आवारात वावरणाऱ्या वकील  मंडळींची मला आठवण झाली आणि मनातल्या मनात  हसू आले..

नशिबाने त्याच दिवशी आम्हाला पाण्यात डुंबणारे वाघ- सिंह आणि अनेक ‘गलेलठ्ठ’ जंगली प्राणी पाहावयास मिळाले.

आम्ही इकडे तिकडे मजेत बघत असताना, एक भला मोठा चिंपँझी हिरव्यागार झाडाच्या फांद्यावर चढून बसलेला अचानकपणे दिसताच अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. एखाद्या जंगलात राहणारा  ‘आदी मानव’ तर आपल्यासमोर अवतरला नाहीना? डोळ्यासमोर लहानपणी  शिकलेल्या ‘मानवाची व्युत्पत्ती’  या प्रकरणातील ‘आदी मानव’ डोळ्या समोर प्रकट झाल्याचा भास झाला. याच्या तावडीत सापडलो तर आपली सुटका कशी होणार अशी भीती क्षणभर मनाला चाटून गेली. नुकतेच विकत घेतलेले आईस्क्रीम आमच्या हातात होते आणि क्षणैक भीतीने ते भर-भर वितळून चालले आहे कि काय असा भास झाला.

या आश्चर्यातून सावरून त्याच आईस्क्रीमचा स्वाद घेत, सहा तासांच्या भटकंती नंतर, मनमुराद आनंद लुटत, अनेक भावनांचे  आणि आठवणींचे गाठोडे मनात बांधून,  डुईसबुर्ग-प्राणी संग्रहालयातून बाहेर पडलो आणि परत परत   बंद दरवाजाकडे वळून पहात राम राम केला.

 

— वासंती गोखले

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..