कुझ्को विमानतळावर उतरून आम्ही शहरात प्रवेश केला. तो रस्ता मुख्य रस्ता आहे असे आमच्या गाईड महाशयांणी संगितले. पण त्या मानाने तो काही खूप प्रशस्त वाटत नव्हता. दोन्ही बाजूंनी दगडी फूटपाथ, छान कलात्मक जुन्या इमारतीं बरोबरच नव्या बांधलेल्या आधुनिक इमारतीही गर्दी करून उभ्या होत्या. वाटेत इथला ‘ सिटी स्क्वेअर’ लागला. दुपारची वेळ, पाऊस भुरभुरत होता. रस्त्यात फारशी गर्दी नव्हती आमची बस थांबली मात्र ,गुळाभोवती मुंग्या जमाव्या तसे अचानक कुठूनसे विक्रेते आमच्याभोवती जमा झाले. हातात पेरूमध्ये बनवलेली खेळणी, पिशव्या, बटवे, डोक्यावरच्या टोप्या, गळ्यातले स्कार्फ, अंगावर घेण्याच्या शाली….असंख्य गोष्टी. बघता बघता त्यांचा आग्रह सुरू झाला. पण गाईडने सराईतपणे आमची वरात हॉटेलकडे वळवली. पावसाची झिम झिम वाढली होती त्यामुळे हवा प्रसन्न व आल्हाददायक होती.
कुझ्को ११००० फुटांपेक्षा जास्त उंचीवर असल्याने विरळ हवामानाचा त्रास थोडासा झालाच. विरळ हवामानाच्या त्रासाचं काही सांगताच येत नाही. तिबेटमध्ये १६००० फुटांचरती मिलापासला काहीसुद्धा त्रास झाला नाही पण कुझ्कोत मात्र झाला. ऑक्सिजनचा वापर नाही लागला कुणाला. पण कोका चहा मात्र वरचेवर प्यावा लागत होता. कुझ्को ही इन्का लोकांची पूर्वीची राजधानी असल्याने इमारती खूपच आकर्षक व मोठ्या मोठ्या होत्या. आमचे हॉटेलही खूपच प्रशस्त,सुशोभित केलेले व जुन्या पद्धतीचे होते. स्थानिक हवेशी जुळवून घेण्यात उरलेला वेळ गेला. हॉटेलमध्ये, रस्त्यावर सगळीकडे माचूपिचूची चित्रे लावलेली पाहून कधी एकदा तिकडे जातो असे झाले. पण इंन्कांची इतर ठिकाणे पहाण्य़ाची उत्सुकताही तेवढीच होती. दुस-या दिवशी सकाळीच कुझ्को मधील ठिकाणे पहायला आम्ही निघालो.
दुस-या दिवशीची सकाळ फारच आल्हाददायक होती. आम्ही आज कुस्कोतील म्हत्त्वाची ठिकाणी पाहणार होतो. त्यातले पहिले होते – कोरीकांचा. शहराच्या मध्यवर्ती चौकात पाचाकुती राजाचा पुतळा, कारंजे, छोटीशी बाग होती. त्या बागेला वळसा घालून छोटा चढ चढून आम्ही कोरीकांचा देवळाच्या प्रवेशद्वारात पोहोचलो. कोरी – क्वारी – म्हणजे सोने व कांचा म्हणजे परिसर. चारी बाजूंनी भिंतीने वेढलेली सोन्याने मढलेली इमारत असणारा परिसर म्हणजे कोरीकांचा.
गाईडचे निवेदन पुढे चालू झाले. “ या जागेचे मूळ नाव ‘इतिकांचा’. सूर्योपासक इन्का, ‘वीराकोचा’ हा इन्कांचा देव सूर्याचा अवतार होता असे मानत. राजा पांक्वी पाचांकुती याने शहराची पुनर्बांधणी केली तेव्हा सूर्याच्या प्रार्थनेसाठी हे मंदिर बांधले. त्यावेळी इन्कांचे साम्राज्य वैभव भरभराटीच्या सर्वोच्च शिखरावर होते. राजाने प्रचंड घडीव दगडांचा वापर करून ही इमारत बांधली. या भिंतीही आतून सोन्याने मढविलेल्या होत्या.” बाई सांगत होत्या व त्यांच्या वर्णनशैलीमुळे सोन्याची झळाळी आमच्या नजरा दिपवत होती.
आम्ही प्रवेशद्वारातून एका सरळ एका चौकोनी छोट्या खोलीतच शिरलो. तिथे भिंतीवर एक सोन्याच्या पत्र्यावर कोरलेला व एक निळ्या पट्टिकेवर रंगवलेला असे नकाशे होते. “ इन्कांच्या राज्यात ही इमारत व आतला परिसर, वेगवेगळी देवळे, ४००० धर्मगुरू व सहका-यांसाठी रहाण्याच्या खोल्या यांनी व्यापलेला होता. सूर्याचे प्रमुख मंदिर मोठे, भक्कम व सोन्याच्या पत्र्यांनी मढवलेले होते. त्यासाठीवापरलेले पत्रे प्रत्येकी अंदाजे अर्धा चौ. मी. आकाराचे व दोन किलो वजनाचे होते. या देवळात व परिसरात पुष्कळ सोन्याच्या मूर्ती, फुलदाण्या वगैरे होत्या. तसेच एका भागात शेतीची अवजारे व मका, बार्ली, भाज्या, फळे यांच्या सोन्याच्या प्रतिकृतीही होत्या. सूर्याचा अवतार वीराकोचाची मूर्ती व त्याच्या चेह-यावर चढवलेला सूर्यकिरण पसरवणारा सुवर्ण मुखवटा होता. मंदिरात ७ खुर्च्यांवर पांक्वी पाचांकुतीने आपल्या पूर्वजांना सोन्याने मढवून आसनस्थ केले होते. या खुर्च्या आज संग्रहालयात आहेत. वीराकोचाच्या मुखवटयावर पडणा-या सूर्यकिरणांमुळे खोली रोज उजळून निघत असे. परिसरात इंद्रधनुष्य, ढग, वीज, चंद्र, नक्षत्रे, स्त्री-पुरुष, सर्प, रानमांजर (प्यूमा) अशी बरीच देवळे होती. हा त्याचा नकाशा”, असे सांगून गाईड बाईंनी आम्हाला कोरीकांचाच्या परिसरात नेले.
“आता तिथे काहीच सोने शिल्लक नाही हे पाहून तुमची निराशा झाली असेल ना ?” गाईड च्या प्रश्नावर काहीच प्रतिक्रिया व्यक्त करण्यासारखी नव्हती. पण एवढे प्रचंड सोने कोठे गेले असेल हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आल्याखेरीज राहिला नाही. “ १५३३ साली पहिल्यांदा स्पॅनिश लोक इथे आले. त्यांच्याबरोबर घोडदळ होते. घोडा हा प्राणी , स्पॅनिश सैन्याची हत्यारे, बंदुका इन्कांनी कधी बघितल्याच नव्हत्या. त्यामुळे स्पॅनिश सैनिक म्हणजे ‘देवच आले आहेत’ अशा समजुतीतून इन्का योद्धे त्यांना विरोध करण्याऐवजी शरण गेले. इन्का प्रमुख ‘अताहुपा’या ‘देवां’ना भेटी घेऊन गेला. स्पॅनिशांनी त्यालाच पकडून नेले व त्याच्या सुटकेसाठी भरपूर सोने वसूल केले. कुस्कोसारखे आखीव रेखीव शहर, कलात्मक इमारती, वैभवशाली राजवाडा पाहून थक्क झालेल्या स्पॅनिशांचे आयतेच फावले. कोरीकांचामधील सोन्याचे पुतळे, भिंतींवर लावलेली चित्रे, सोन्याच्या फ्रेम्स, दरवाज्यावरच्या सोन्याच्या पट्ट्या, मौल्यवान रत्ने यातला बराचसा हिस्सा पिझारेरो या प्रमुख अधिका-याने स्पेनला पाठवला. इतर अनेक मौल्यवान वस्तू वापरून या मंदिराच्या जागेवरच त्यांनी चर्च बांधले. या वस्तू आपल्याला चर्चमध्ये बघायला मिळतात.”
आम्ही कोरीकांचाच्या सुवर्णकाळातून भानावर येऊन वास्तवातले रूप पहात होतो. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर चारही बाजूंना सुस्थितीतल्या भिंती, अजूनही सुस्थितीतील भींतीवरचे रंगकाम ,कोरीव खांब, काही घडीव दगड व २-४ भल्या मोठ्या फुलदाण्या इतकेच शिल्लक होते.एका खोलीतील प्रचंड मोठा १२ कोनी दगड पाहून त्यावेळच्या बांधकामाची कल्पना येत होती. हा दगड जरी एकसंध असावा असे प्रथमदर्शनी वाटले तरी तो १२ घडीव दगड एकमेकात बसवून केलेला आहे हे कळल्यावर खूप आश्चर्य वाटले. गाईडने त्यापैकी दोन दगडांच्या अस्पष्ट भेगेतून कागद आरपार घालून दाखवला, तेव्हा चाक, तंत्रज्ञान लेखनकला यापैकी काहीही माहिती नसलेल्या इन्कांनी हे काम केले आहे यावर विश्वास बसला नाही. स्पॅनिश लोकांनी याच देवळाच्या भिंतींवर ,याच दगडांचा वापर करून कॅथेड्रल बांधले व मूळ रूप पूर्ण बदलून टाकले. परंतु १९५० च्या प्रचंड भूकंपात स्पॅनिश बांधकाम पडले व इन्कांचे मूळ बांधकाम बाहेर आले. त्यातल्या काही खोल्या अद्यापही सुस्थितीत आहेत. पैकी एका खोलीत दगड एकमेका बसवण्यासाठी इन्कांनी वापरलेली मेल-फीमेल लॉकिंग पद्धत पहायला मिळाली.
Dear madam,
Very nice information in proper wording.
Thank you.
Thanks Swapnil for the comment.