आता आम्हाला वेध लागले होते ‘ सांतो दोमिंगो’ कॅथेड्रलचे. कोरीकांचामधून बाहेर पडून आम्ही ‘प्लाझा डि आर्मास’ चौकात कोरीकांचाच्या भिंतींवर बांधलेल्या या चर्चकडे गेलो. त्याचे भव्य लाकडी पण खूप नाजूक कोरीव काम केलेले दार त्यावरच्या सोनेरी रंगाच्या चकत्यांमुळे व मोठमोठ्या खिळ्यांमुळे उन्हात उठून दिसत होते. हे कॅथेड्रल व कोरीकांचा यांची नावे एकमेकांसोबतच घेतली जातात.
“ १५३३ मध्ये जरी इन्कांचा पराभव झाला, तरी पुढे अनेक वर्षे इन्का संस्कृतीचा प्रभाव तिथल्या व आसपासच्या रहिवाशांच्या मनावर होता. ही गोष्ट अर्थातच स्पॅनिश राज्यकर्त्यांच्या मनात सलत होती. १५३६ पासून इन्कांचे कुस्को परत मिळविण्यासाठीचे हल्ले सुरू झाले होते. त्यामुळे त्यांची संस्कृतीच नष्ट करण्यासाठी १५५९ मध्ये कुस्कोच्या मध्यवर्ती भागात कॅथेड्रल बांधायचे राज्यकर्त्यांनी ठरवले. इन्कांचा मानबिंदू असलेल्या कोरीकांचा हीच जागा त्यासाठी निवडली. या बांधकामासाठी घडीव दगड कोरीकांचाच्या भिंतींचे व तटाचे तसेच सॅक्सेवमनमधून आयतेच मिळाले. पण ती मूळची बांधकामे इतकी प्रचंड होती की कॅथेड्रल बांधूनही मूळ इमारतींचे अवषेश शिल्लक राहिलेच.
या कॅथेड्रलचा आकार लॅटिन क्रॉसचा आहे. त्याचा खूप लांब रुंद १४ खांबावर तोललेला गाभारा त्याचे तीन पांख (विंग) एकत्र येऊन झालेला आहे. खांब मोठे व कलात्मक आहेत. कोरीकांचामधून आणलेले सोन्याचे पत्रे या खांबांना, छताला सुशोभित करण्यासाठी वापरले आहेत. सूर्यमंदिरातील फुलदाण्या तशाच कॅथेड्रलमध्ये आणण्यात आल्या. सूर्याची भली मोठी तबकडी, वीराकोचाचा सुवर्णाचा भव्य सूर्य मुखवटा व इतर देवळातील सोने वापरून कॅथेड्रल सुवर्णमय बनवण्यात आलं.” एवढी माहिती ऐकून आम्ही कॅथेड्रलमधे गेलो अन……आमचे पाय तिथेच खिळून राहिले, नजरा विस्फारल्या. कोरीकांचामध्ये पहायला न मिळालेले सोने इथे दृष्टी दिपवत होते. जगातली अनेक चर्चेस आजपर्यंत पाहिली, पण इतके वैभवशाली व सोन्याने मढलेले चर्च प्रथमच पाहिले.
उत्तम ग्रॅनाईटची फरशी व मजबूत खांब, सुरेख गुळगुळीत भिंती,त्यावरच्या सुवर्ण चौकटी, त्यातील सुरेख चित्रे….. पहावे तेवढे थोडेच ! सारे दंग होऊन पहात राहिले. गाईडला या प्रतिक्रियेची सवय असावी. आश्चर्यातून बाहेर पडायला पुरेसा वेळ देऊन ती पुढे सांगू लागली व तिची महिती पडताळून पहात आम्ही मंत्रमुग्धाप्रमाणे तिच्या मागोमाग फिरू लागलो.
ज्या कॉरिडॉरमधून आम्ही आत शिरलो तो सरळ गाभा-यात पोहोचत होता. तिथपर्यंतचा छताचा भाग १४ खांब व दोन्ही बाजूस जाणा-या लांबलचक तुळया यावर तोलला आहे. छतावरची कोरीव कलाकुसर व रंगकाम अतिशय सुरेख आहे. समोरच ‘अल्टार- वेदी’ आहे. अल्टार दुरून पाहिले तर एकच दिसते पण प्रत्यक्षात एकापुढे एक अशा दोन वेदिका आहेत. मागची मूळची ‘आल्डेर’ झाडाच्या लाकडाची व त्याभोवती सोन्याचे नक्षीकाम असलेली आहे. पुढचे अल्टार सेडर लाकडाचे असून त्यावरही पूर्वी सोन्याचे काम होते. पण ते नंतर चांदीने मढवले गेले. खरं तर आजूबाजूला इतर इतक्या गोष्टी सोनेरी रंगात चकचकत होत्या की, या चांदीच्या कामाकडे फारसे लक्षच गेले नाही. एके ठिकाणी अतिशय सुंदर असे ‘लास्ट सपर’चे खूप जुने पेंटिंग लावलेले होते. त्याकाळच्या या पेंटिंग्जवर चित्रकारांच्या सह्या नाहीत, पण त्यातील ठेवलेल्या काही ना काही खोडींवरून चित्रकार ओळखला जाई.
इ.स. १६५० च्या भयानक भूकंपाच्या दृश्याच्या चित्रापाशी गाईडच्या रसवंतीला पूर आला.”हे चित्र नीट निरखून पहा. कुस्को शहर, त्यात झालेली पडझड, लोकांची धावपळ, चेह-यावरील भाव अगदी अप्रतिमरीत्या रंगवलेले दिसतील. याच चित्रात बिशप, इतर धर्मगुरू व बरेच लोक भूकंप थांबावा म्हणून, प्रार्थना करत येशूची मूर्ती पालखीत ठेवून चौकात फिरवत होते असेही रंगवले आहे. योगायोग असा सांगतात की, येशूची मूर्ती बाहेर यायला व भूकंप थांबायला एक गाठ पडली. त्यामुळे त्या विशिष्ट ‘पाम संडे’ (Palm Sunday) या दिवशी दरवर्षी येशूची मूर्ती अजूनही बाहेर आणतात. “खरोखरच ते चित्र खूप पूर्वी काढलेले असूनही खूपच छान व स्पष्ट होते.
डावी-उजवीकडच्या भागात वेगवेगळ्या प्रार्थनेच्या जागा, संतांचे पुतळे आहेत व त्यांच्या रक्षा आहेत. प्रत्येक पुतळ्यासमोर त्याच्या कारकीर्दीचा उल्लेख असणारा फलक होता. गाईड बरोबर बोलत बोलत आम्ही कॅथेड्रलच्या एका अत्यंत सुशोभित भागात गेलो. येथे मार्कोस झपाटा याची १८ व्या शतकातील सुंदर चित्रे लावली आहेत. कुस्कोच्या बिशपचे पोर्ट्रेट, तसेच गडद काळपट रंगातील येशूचे अप्रतिम चित्र येथे दिसते. याच भागात धर्मगुरू आपल्या प्रार्थनांची तयारी करतात. त्यासाठी लागणारी साधनसामुग्रीही इथेच असते. या जागेत प्रवेश करताना सर्व ख्रिश्चन भाविकांच्या चेहे-यावर भक्तिभाव दाटलेले दिसत होते. यानंतर आम्ही सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी गेलो, जिथे सुळावर चढवलेल्या येशूची संपूर्ण काळ्या रंगाची मूर्ती होती. त्याच्या चेहे-यावरील भाव अतिशय उत्तम कोरले गेले आहेत. तिचा मूळ रंग हस्तिदंती आहे, पण लोकांनी त्याच्यापुढे प्रार्थना व नवस फेडण्यासाठी इतक्या मेणबत्या जाळल्या की त्या काजळीने तिचा रंग पूर्णपणे काळा झाला आहे. आता कोणत्याही समारंभात त्यासमोर मेणबत्त्या लावण्यास मनाई करण्यात आली आहे. १६५० च्या भूकंपातून याच येशूने कुस्को शहर वाचवले अशी लोकांची श्रद्धा आहे. याचीच पाम संडेला मिरवणूक काढली जाते.
या चर्चमधील आणखी एक प्रेक्षणीय गोष्ट म्हणजे ‘मारिया अंगोला’ नामक घंटा – २.१५ मी उंचीची व अंदाजे ५९८०किलो वजनाची १६५९ साली तयार झालेली. चर्चच्या बाहेर उजव्या टॉवरवर टांगलेली, घंटानाद केल्यास अंदाजे २० मैलपर्यंत ध्वनी ऐकायला जाणारी. सध्या तिला तडा गेलेला असल्याने फक्त काही खास समारंभांसाठीच ती वाजवतात. कॅथेड्रलमध्ये बरेच काही पाहिले. जे पाहिले ते मनावर कोरले गेले खरे, पण त्याची छबी फोटोरूपात उतरवता आली नाही. “ फोटो काढण्यास सक्त मनाई आहे” या सूचनेचा इतका राग कधीही आला नव्हता ! हे सर्व पाहून आम्ही इन्कांच्या बांधकाम कौशल्याने खरोखरच दिपून गेलो. १९५० च्या भूकंपाने कॅथेड्रलचे बरेच नुकसान झाले हे खरे, पण कोरीकांचाचे मूळ अवशेष त्यातून जगासमोर आहे हे एक वरदानच म्हणावे लागेल.
Dear madam,
Very nice information in proper wording.
Thank you.
Thanks Swapnil for the comment.