हल्ली सर्वजण खूप प्रवास करतात. फक्त देशातच नव्हे तर परदेशातही. पुर्वीसारखे परदेशवारीचे अप्रूप आता राहिले नाही. मोठ्या संख्येने मुले-मुली शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी परदेशी जायला लागले. मग त्यांचे आई-वडील मुलीच्या -सुनेच्या बाळंतपणासाठी अमेरिका युरोपला जायला लागले. मुलं विदेशी नोकरी करीत असल्याने मध्यमवर्गीयांच्या खिशात पैसा खुळखुळायला लागला आणि आता विमानाने जाणे, परदेशी जाणे ही अचंबित करणारी गोष्ट राहिलेली नाही.
सध्या हातातील मोबाईलद्वारेही आपण बसल्या जागेवरून हवे ते ठिकाण बघू शकतो व त्याची माहिती मिळवू शकले. तरीसुध्दा प्रत्यक्ष प्रवासाचा आनंद निराळाच असतो. माझ्या सुदैवाने मी भारतातील अनेक राज्ये व पंचवीस देशांतून प्रवास केला आहे. चार देश तर दुसऱ्यांदा नातवाबरोबर बघतानाही नव्यानेच बघत असल्याचा आनंद मिळाला.
प्रत्येक प्रवासात वैविध्य असतेच. सूर्योदय, सूर्यास्त, समुद्र, यातही खूपच फरक असतो. समुदाची विविध रूपे बघायला मिळतात. श्रीलंका, मॉरिशस या ठिकाणी समुद्राच्या पाण्याच्या, नानारंगी छटा मन मोहून घेतात. लहान बोटी, मोठ्या शिडाच्या बोटी, गंडोला, मोटर बोट, कॅटामरीन, सबमरीन यातून खूप भटकंती केली. त्यायोगे निसर्गाच्या अगदी जवळ जाऊन त्याची विविध रूपे अनुभवली. पाण्यातील रंगीबेरंगी मासे, जलचर, प्रवाळ तसेच काठावरचे सीगल्स, फ्लेमिंगो यासारखे पक्षी व कासवे, लिटिल पेंग्विन एवढेच नाही डॉल्फिन्स, व्हेल असे मासेही जवळून बघता आले हे सांगायचा उद्देश हाच की पाण्यावरची भटकंती ही इतर भटकंती पेक्षा वेगळी असते. पाण्याच्या संगतीत केलेला प्रवास नुसताच आनंददायी, अविस्मरणीय न राहता स्वतःच्या मनाशी संवाद साधायला फारच अनुकूल ठरतो. अशाच एका सफरीबद्दल मी सांगणार आहे.
पेनांग, लंकावि, फुकेत विथ फोर डेज् क्रूझ, अशी ही आठ दिवसांची टूर होती. पेनांग, लंकावि ही मलेशियातील बेटे आहेत. तर फुकेत हे थायलंडमधील बेट आहे. पेनांग हे बँकॉकपासून तीन तासावर कौलालंपूरपासून चार तासावर तर सिंगापूरहून दहा तासांवर आहे. पेनांग मलेशियातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले म्हणजे नऊ लाख इतकी लोकसंख्या असलेले अतिशय सुंदर बेट आहे. या बेटावर पूर्व आशियामधील अप्रतिम व सर्वांत मोठे असे बुध्दाचे टेम्पल आहे. तसेच चायनीज टेम्पल, बुध्दिस्ट टेम्पल, बुध्दिस्ट टेम्पल व मशिद हे सर्व एकमेकाला लागून आहेत. त्या रस्त्याला स्ट्रीट ऑफ हार्मनी असे नाव आहे. पेनांगमधील चॉकलेट फॅक्टरी चहा व कॉफीची फॅक्टरी बघून थोड्या दूरवर जॉर्ज टाऊन इथे ट्रॉपिकल फ्रूट फार्म बघितले. नावाप्रमाणेच इथे असंख्य प्रकारच्या फळांची झाडे आहेत. आकर्षित करणारा भाग म्हणजे अनेक फळांचे रस पिण्यासाठी उपलब्ध होते व अनेक प्रकारची आकर्षकरित्या कापून खाण्यासाठी ठेवली होती. त्यात एवढी विविधता होती की प्रत्येक फळाची चव घेणे अशक्य झाले. अगदी, ऊस, फणसांचे गरे, बोरे, रायआवळे, चिंचासुध्दा होत्या. आपल्या डिशमध्ये घेतांना फळांच्या सुंदर रचनेला धक्का तर लागणार नाहीना इतक्या आकर्षक तऱ्हेने फळांच्या फोडींची सजावट केली होती.
या टूरचे महत्वाचे आकर्षण व उत्सुकता होती ती क्रूझबद्दल. क्रूझ म्हणजे मौजेचे समुद्र पर्यटन बऱ्याच देशात क्रूझवरून फेरफटका मारून दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण क्रूझवर घेतले होते. पण तिथे राहण्याच्या अनुभव घेण्यासाठी मी फारच उत्सूक होते.
क्रूझवर पोहोचताच रूमवर सामान ठेऊन लगेच सेफ्टीड्रीलला हजर राहावेच लागते. तिथे सेफ्टी जॅकेट कसे घालायचे, अडचणीच्या प्रसंग आला तर कोणाशी आणि कसा संपर्क साधायचा हे सांगून संपूर्ण क्रूझवर फिरवून आणले जाते. निरनिराळ्या क्रूझ कंपन्या आहेत. आमची लिब्रा क्रूझ होती, नऊमजल्यांची. आपल्या रूमच्या खिडकीतून बाहेर बघितले किंवा डेकवर गेल्यावरच समुद्राचे दर्शन. तेव्हा मात्र बघावे तिकडे फक्त पाणीच पाणी. अथांग, शांत सागर. अन्यथा एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आपण राहात आहोत असे वाटेल. अत्युच्च दर्जाच्या सर्व सुविधा व अगत्यशील सेवा इथे उपलब्ध असतात. सर्व वयाच्या लोकांसाठी वेगवेगळ्या गोष्टी असतात. एका मजल्यावर मिनी हॉस्पिटल सुध्दा होते. चोवीस तास वैद्यकीय सेवा उपलब्ध असते.
कॉफी शॉप, रेस्टॉरंट, स्विमिंग पूल, कसीनो, लायब्ररी विविध खेळांची (Indoor Games) सोय, तसेच लहान मुलांसाठी प्ले एरिया अनेक मजल्यांवर थिएटर्स, डान्स फ्लोअर ब्युटीपार्लर, स्पा सेंटर, आईस्क्रीम पार्लर याचबरोबर शॉपिंगसाठी दुकान सुध्दा होती. चप्पल घड्याळे कॉस्मेटिक्स, ज्वेलरी, पर्सेस बॅगा, कपडे, गेम्स याचबरोबर आंतरराष्ट्रीय बॅडच्या वस्तू मिळण्याची देखील दुकाने होती. रोजच्या गरजेच्या वस्तू साबण, टुथपेस्ट, टुथब्रश, पोहोण्याचे कपडे, टॉवेल्स या वस्तू सुध्दा मिळतात. ओपन डेकवर मुबलक खुर्च्या असतात. त्यावर बसून सूर्योदय, सूर्यास्त बघण्याची मजा काही औरच. त्यातही हातात थंडगार बियर किंवा गरमकॉफीचा मग असेल तर नक्कीच स्वर्ग सुखाचा आनंद लुटता येतो.
वेगवेगळ्या देशातील लज्जतदार पदार्थ खाऊ घालणे हे क्रूझचे वैशिष्टय असते. खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवणारे जगातील सर्व प्रकारचे खाद्य पदार्थ, त्याच्या जोडीला उत्तमोत्तम वाईन्स, निरनिराळी मॉकटेल्स व कॉकटेल्स मिळण्याची इथे सोय असते. चायनीज, जॅपनीज, इटालियन, कॉन्टिनेंट्ल असे पदार्थ देणारी स्पेशॉलिटी रेस्टॉरंटसही असतात. एकूणच खाण्यापिण्याची अगदी चंगळ असते. सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण यासाठी बुफे लावलेला असतो. संध्याकाळी सहापासून डेकवर नाना प्रकारचे व्हेज-नॉनव्हेज खाद्य पदार्थांची नुसती जत्रा असते. नॉनव्हेज खाणाऱ्यांची तर चंगळच असते. विविध प्रकारचे मासे, चिकनचे अनेक प्रकार असतात. व्हेज खाणाऱ्यांसाठीसुध्दा तऱ्हेतऱ्हेचे स्टार्टर्स, चाट पदार्थ, केक्स, कुकीज, पेस्ट्रीज- डेझर्टस, आईस्क्रीम, फळे, ज्यूसेस, शीतपेय या सगळ्यांची रेलचेल असते. आपण कुठले कार्यक्रम बघायचे ते ठरवू शकतो. यात बॅले, डान्सशेज, नाटिका, सिनेमे, म्युझिकल शोज, आर्टशोज, जादूचे प्रयोग, प्रश्नोत्तरे अशा अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा खजिनाच बघायला मिळतो. पोहण्यासाठी तलाव, जिम, वॉकिंग ट्रॅक तर असतोच. दुकानवाले रोज वेगवेगळ्या वस्तूंचा सेल लावतात, तर कधी फॅशन शो आयोजित करतात. अनेक लाईव्ह शोज सतत चालू असल्याने प्रत्येक संध्याकाळ झगमगून उठते.
कॅसिनो हे सुध्दा क्रूझवरचे मोठे आकर्षण असते. त्यात संध्याकाळी मस्त तयार होऊन आपले नशीब आजमावयाला अनेकजण गर्दी करतात. तेथील जादूई वातावरण बघायलासुध्दा खूप मजा येते.
एकांतात समुद्राच्या साक्षीने स्वतःशी संवाद साधायचा पर्यायही चोवीस तास उपलब्ध असतोच.संपूर्ण क्रूझची अंतर्गत सजावटसुध्दा आकर्षक रंगीबेरंगी असते. जिन्यापासून सगळीकडे उंची गालीचे अंथरलेले असतात. सर्वत्र फुलांची सजावट सुंदर पेंटीग्ज, दिव्यांचा झगमगाट मनमोहून टाकणारा स्वागतकक्ष, खाली वर जाणाऱ्या काचेच्या लिफ्ट पहिल्या नजरेतच हे वातावरण आपल्याला जिंकून घेते.
ग्रुपमधील संख्येनुसार किंवा कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार खोल्यांची रचना केलेली असते. माझी छोटीशी टुमदार पण सर्वसुखसोयींनी सज्ज अशी रूम होती. बेडवर पडून खिडकीतून समुद्राकडे बघण्याचा विलक्षण अनुभव न विसरता येण्यासारखा अशा या क्रूझला पाण्यावर तरंगणारे सप्ततारांकित हॉटेल म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तीन दिवसांच्या या वास्तव्यात एके दुपारी लंच झाल्यावर आम्ही फुकेतला क्रूझच्या बाहेर येऊन बसने फॅटसी वर्ल्डला गेलो. ते पतांग बीचवर होते. तिथेच डिनर व रात्रीचा शो बघून पुन्हा क्रूझवर आलो. ३ दिवस कसे गेले ते समजलेच नाही. चौथ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करून क्रूझला बाय बाय करून पुन्हा पेनांगला एक दिवस राहून नंतर तिथून विमानाने लंकाविला पोहोचलो. मलेशियामध्ये लंकविलाच तुलनेने स्वस्तदरात खेरदी करता येते. हॉटेल जवळच शॉपिंग सेंटर असल्याने अर्थातच शॉपिंग केले. दुसऱ्या दिवशी सकाळीच बीच बघून केबलकारने स्कायब्रिजवरील स्कायवॉकला गेलो. तिथून दिसणारे लंकावीचे दर्शन अवर्णनीय. लेझर शो बघून परत केबलकारने येऊन बीचवर टूरची शेवटची रात्र सगळ्या प्रवाशांचे गेट-टुगेदर साजरे करून घालवली. सकाळी मायभूमीच्या ओढीने विमानतळ गाठला. पुन्हा पुन्हा अनुभवासा वाटणारा क्रूझचा अनुभव प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी घ्यायलाच हवा.
-यामिनी पानगांवकर
(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply