नवीन लेखन...

‘बुध’ ग्रहाचे वेगळे दर्शन अर्थात बुध अधिक्रमण

A Unique Viw of Mercury during its Transit on 9th May 2016

बुधाचे निरीक्षण

बुध ग्रह सूर्यास्तानंतर संध्याकाळी काही वेळ पश्चिम क्षितीजाजवळ दिसतो तर काही महिन्यात हाच बुध ग्रह पूर्व क्षितीजावर पहाटे सूर्योदयापूर्वी दिसतो. बुध हा सूर्यापासून पहिलाच ग्रह आहे. त्यामुळे त्याचे सूर्यापासूनचे अंतर कमी आहे. परिणामी बुध ग्रह सूर्याची पाठ कधीच सोडत नाही. विशिष्ट कालावधीत, सायंकाळी किंवा पहाटे आणि क्षितीजालगत बुध दर्शन होत असल्यामुळे बुध शोधणे म्हटल. तर सोपे आहे म्हटल. तर कठीण आहे.

बुधाचे आगळे वेगळे दर्शन समजावून घेण्यासाठी सूर्यग्रहणाची घटना डोळ्यासमोर आणू. सूर्यग्रहणात पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये पण त्याच्याच पातळीत चंद्र येतो. यामुळे सूर्यबिंब झाकले जाते आणि चंद्राची अप्रकाशित बाजू (काळी बाजू) आपणास दिसते.

बुध ग्रहाची कक्षा सूर्य आणि पृथ्वी यांच्यादरम्यान असल्यामुळे बुध ग्रह सुद्धा पृथ्वी आणि सूर्य यांना जोडणाऱ्या रेषेवर या दोघांच्या दरम्यान येऊ शकतो पण… बुध लहान असल्यामुळे तो सूर्याला झाकू शकत नाही. बुधाचा लहान काळा ठिपका सूर्यबिंबावरून सरकत जातो. बुधाच्या लहान बिंबामुळे सूर्याच्या प्रकाश काही अडविला जात नाही. परिणामी बुध ग्रह सूर्यबिंबावरून गेला तरी आपल्याला पत्तासुद्धा लागत नाही.

सूर्यबिंबाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे सरकत जाण्याच्या या घटनेलाच बुधाचे अधिक्रमण (transit) किंवा पारगमन असे म्हणतात.

अधिक्रमण कळते कसे?

गणितशास्त्र हे आश्चर्यकारक आणि अचूक शास्त्र आहे. सूर्य, बुध, पृथ्वी, चंद्र इ. ग्रहांच्या भ्रमणामुळे घडून येणाऱ्या गणिताने अधिक्रमणासारख्या विविध घटना केव्हा होणार ते १०० टक्के बिनचूक शोघता येते. हे शास्त्र भूतकाळातही शिरते आणि भविष्यकाळातही डोकावते. १६०७ ते २३०० या ७०० वर्षाच्या काळात बुधाची १४ अधिक्रमणे आहेत.

म्हणजे एका शतकात साधारण १२ ते १३ अधिक्रमणे होतात. सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान दर ११६ दिवसांनी बुध ग्रह येतो. या घटनेला अंतर्युती म्हणतात. म्हणजे खरं तर वर्षातून ३ वेळा तरी अधिक्रमण व्हायला हवे होते नाही का? बुध ग्रह पृथ्वी व सूर्य यांच्या पातळीत फिरत नाही. बुधाची परिभ्रमण कक्षा या पातळीला दोन बिंदूत छेदते. या छेदनबिंदूपाशी अंतर्युती झाल्यासच अधिक्रमण होऊ शकते. अंतर्युती होणे आणि पृथ्वी-सूर्य जोडणाऱ्या रेषेत बुध येणे हे सध्या फक्त मे आणि नोव्हेंबर या महिन्याच्या १० तारखेच्या आसपास घडू शकते. तर आता अशी संधी ९ मे २०१६ रोजी, सोमवारी आली आहे. या अधिक्रमणाचे साक्षीदार आपल्याला व्हायचे आहे.

“मे” महिन्यातील अधिक्रमणाचे वैशिष्ठये

मे महिन्यात घडून येणाऱ्या अधिक्रमणाच्यावेळी बुध ग्रह सूर्यापासून दूर म्हणजे पृथ्वीला जवळ असतो. त्यामुळे बुध बिंब थोडे मोठे दिसते (त्याचा व्यास सुमारे १२ कला असतो). तरीही सूर्यबिंब त्याच्या सुमारे १५८ पट मोठे असते मग आता सांगा ते सूर्याला कसे झाकेल? उलट बुधाचा काळा ठिपकाच सूर्यबिंबावरून सरकताना दिसेल. बुधाने सूर्यबिंबाला एका टोकाशी स्पर्श केला की, आख्खे सूर्यबिंब पार करून दुसऱ्या टोकाशी बाहेर पडण्याच्या या घटनेला साडेसात तास लागणार आहेत. संध्याकाळी पावणेपाचच्या सुमाराला अधिक्रमण सुरु होईल ते रात्री सव्वाबारापर्यंत चालू राहिल. रात्री ८.३० च्या सुमारास या प्रवासाचा मध्य बुधाने गाठलेला असेल. म्हणजे तेव्हा सूर्यबिंबाच्या केंद्रबिंदूजवळ सूर्य असेल.

पण हाय? हा सगळा प्रवास आपल्याला पाहता येणार नाही. सूर्य अस्ताला गेला की, ज्या पडद्यावर हा खेळ आपण पाहणार तो पडदाच गायब होणार. नाही कां? तरी सुद्धा संध्याकाळी ४.४५ पासून सूर्यास्तापर्यंत साधारण दोन तास हा खेळ पाहता येईल

दोन तास तर दोन तास. म्हणतात नां? Something is Better than Nothing….

अधिक्रमण पाहतांना घ्यायची काळजी

बुधाचा काळा ठिपका सूर्यबिंबावर पहायचा म्हणजे सूर्याकडे पहाणे आलेच. मग नुसत्या डोळ्यांनी तर नाहीच नाही पण सौर गॉगलमधूनही (नेहमीचा गॉगल नव्हे) हे पाहता येणार नाही. बुधाचा लहान ठिपका दिसणार कसा? मग टेलिस्कोपचा वापर करावा लागेल. पण त्यालाही विशिष्ट असा सुरक्षित फिल्टर बसवला आहे कां याची पक्की खात्री करावी लागेल. द्विनेत्री म्हणजे binocular मुळीच नको. कारण त्याला फिल्टर बसविलेला नसतो. काही संस्था असे अधिक्रमण दाखवतील. तेथे जाता येईल. तरीही डोळ्यांच्या सुरक्षिततेची पक्की खात्री झाल्याशिवाय अशा कोणत्याही उपकरणातून थेट पाहू नये. अन्यथा डोळे कायमचे बिघडतील. अंधत्वही येऊ शकेल.

पुढील अधिक्रमणे

बुधाचे यानंतरचे अधिक्रमण ११ नोव्हेंबर २०१९ रोजी आहे. पण त्याचीही सुरुवात संध्याकाळी सहाच्या सुमारास असल्यामुळे न दिसण्याऱ्या अधिक्रमणातच त्याची गणना करावी लागेल. १३ नोव्हेंबर २०३२ चे बुध अधिक्रमण दुपारी १२.१५ ते ४.४० या वेळात दिसेल. मे महिन्यात होणारे यानंतरचे अधिक्रमण ७ मे २०४९ रोजी आहे. त्याची सुरुवातही याचप्रमाणे संध्याकाळी पावणेपाचचे सुमारास आहे? तेव्हा डोळ्यांची योग्य काळजी घेऊन अधिक्रमण निरीक्षणाची हीच संधी घ्यायला हवी.

– हेमंत मोने
९८२०३ १६३१५
e-mail : hvmone@gmail.com

आकृतीत बुध अधिक्रमण मार्ग दाखविला आहे. आपण पश्चिमेकडे तोंड करून उभे राहणार. म्हणजे सूर्यबिंबाची उत्तर बाजू साधारण उजवीकडे असेल. सूर्यबिंबाचा पूर्व बिंदू वरच्या बाजूस असेल. हे लक्षात घेऊन बुध अधिक्रमण मार्ग दाखविला आहे.

1 Comment on ‘बुध’ ग्रहाचे वेगळे दर्शन अर्थात बुध अधिक्रमण

  1. फारच छान माहिती दिलीत. मी हे बघितले. मजा आली..

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..