१० मार्चला (१९९९) मी नाशिकमध्ये होतो, पण या योगायोगाला काय नांव देऊ? नोव्हेंबर १९९८ पासून दर आठवड्याला मी नाशिकमध्ये असतो. जानेवारीत भेटायला आणि माझ्या पत्नीचं पुस्तक ” संस्कृतीच्या प्रसादखुणा ” द्यायला मी आपल्या दारापर्यंत आलो होतो. आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे भेटीला मनाईचा बोर्ड आपल्या अंगणातील झाडाला टांगला होता. त्या काळात त्या रस्त्यावरून वाहतूकही बंद केली होती, असं कोणीसं म्हणाल्याचं आठवतंय.
नंतर एकदम १० मार्चलाच रात्री भेट ! रस्ते सुन्न, माणसांची मुसमुसणारी रांग. आपल्या घराबाहेर अश्रू आवरत चाललेलं एका प्रौढेचं गीतापठण.
पोलीस,बॅरिकेड्स, वातावरणातील गंभीर शिस्त. ही भेट काही वेगळीच होती आणि शेवटचीही- आजोळ हरपल्याचं जाणवून देणारी. ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वातून जिव्हाळा आपण आम्हां कुटुंबियांना दिलात.आमच्या साहित्याला प्रत्येक भेटीत दाद दिलीत. आमच्या अपरोक्ष आमच्या नाशिक स्थित नातेवाईकांकडे आमच्या लेखनाबद्दल आस्थेवाईकपणे/ आठवणीने बोलणं यापरतं मोठेपण ते कोणतं ? आमच्यासाठी तुम्ही एक कायमचं जागृत साहित्यस्थान होतात.
घरची वडीलधारी व्यक्ती गेली की कसं वाटतं, याचा अनुभव मला आहे. पण आख्खे गांव एका व्यक्तीसाठी शोक करतंय हे दृश्य एकाचवेळी स्तिमित करणारं अन व्याकुळ करणारंही होतं. साहित्यिकाचा हा एका शहरावरील अधिकार तुमच्या जाण्यामुळे दिसला/भिडला.
अनेक थोर साहित्यिकांच्या संपर्कात मी आलोय अन थोर माणसांच्याही ! पण साहित्यिक अधिक माणूसपण दोन्हीही उत्तुंग असणारं तुमचं व्यक्तिमत्व होतं.
आपल्या जाण्याने झालेलं दुःख, त्यादिवशी व्यक्त करावं पण तेवढी तुल्यबळ व्यक्तीही नजरेसमोर आढळत नव्हती. ऐकून घेणारेही तेवढ्याच ताकतीचे असावे लागतात अन आजकाल तेही दुर्मिळ होत चालले आहे.
—————————————————————————————————————
जसं दरवेळी तिरुपतीला जाताना हरिप्रिया एक्स्प्रेस धारवाड स्टेशन वर थांबली की मी प्लॅटफॉर्मवरच्या मातीला स्पर्श करतो आणि जीए भेटीचा आनंद जागवतो, तसंच आजकाल नाशिकला गेलो की आपल्या घरावरून जातो आणि हात जोडतो. तुम्ही असता तिथे !!
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply