नवीन लेखन...

आदर्शाचार्य

“काका अलीकडे तुमचे कामात लक्ष नाही असे वाटते.”

“काय झालं साहेब?”

“अहो त्या वाह्यात गुरुजींना आदर्शाचार्य पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात. त्याला पंधरा दिवस होऊन गेले आता. त्यातला ताजेपणाही निघून गेला. तरीही त्यांची मुलाखत तुम्ही अजूनही घेतली नाहीत? कुठे होता तुम्ही सूर्याजी रविसांडे?” ‘रोजची पहाट’ चे संपादक आणि विशेषांक सम्राट आपल्या प्रमुख वार्ताहरवर म्हणजे काका सरधोपट यांच्यावर फारच नाराज झाले होते.

“कुठे म्हणजे? त्यांच्या गावी, आणखी कुठे?”

“ते चोराची आळंदी-विद्यापीठ नगरीला असतील तर ना?”

“चोराची आळंदीला असतील तर म्हणजे? कुठे गेले?”

“साहेब आदर्शाचार्य पुरस्कार मिळताच ते दिल्लीहूनच परस्पर अमेरिकेच्या सफरीवर गेले. तेही मुख्यमंत्र्यांच्या खास आग्रहावरून! उद्या-परवा परत येणार आहेत.”

“अमेरिका दौरा? तोही पंधरा दिवस?”

“होय साहेब, भारतातील आदर्श आचार्य कसा असतो याचे या परदेशीयांना फार आकर्षण. त्यांनीच मुख्यमंत्र्यांशी बोलून हा दौरा ठरवला होता.”

“काय सांगता काय?”

“खरं सांगतोय साहेब. त्यांच्या मुलाखतीत मी याबाबत खुलासेवार जाणून घेणारच आहे.”

“ठीक आहे. लागा कामाला. हां काका आणि मुलाखतीत एक प्रश्न त्यांना नक्की विाचारा.”

“तो कोणता साहेब?”

“त्यांना विचारा की असे पुरस्कार मिळण्यासाठी काही विशेष वयोमर्यादा असते का?”
विचारीन साहेब. पण अशा प्रश्नाचे प्रयोजन?”

“काका बहुतेक असे पुरस्कार वयाची सत्तरी शंभरी गाठणाऱ्यांना मिळतात. माझेही आता पंचाहात्तर वय होतेय. मलाही वृत्तपत्रातील महान कार्यासाठी एखादा वृत्तपात्राचार्य असा काही पुरस्कार मिळतोय का पाहता येईल.”

“होय साहेब, त्यासाठी आतापासूनच फिल्डिंग लावता येईल. मुलाखतीत वाह्यात गुरूजींबरोबरच मुख्यमंत्र्यांचेही कौतुक येईल याची काळजी घेईन.”

“काका तुम्ही ‘त’ वरून ताकभात ओळखता, चला लागा कामाला.”

काकांनी ठरल्या तारखेला आदर्शाचार्य श्री. अनंत तिरशिंगराव वाह्यात गुरुजी यांची बारामतीला त्यांच्या चिंधडे आदर्श विद्यालयाच्या परिसरातील त्यांच्या पर्णकुटी या झोपडीसारख्या दिसणाऱ्या परंतु आतून सुसज्ज अशा बंगलेवजा घरी भेट घेतली.

गुरूजींनी काकांचे स्वागत केले. पांढरेशुभ्र खादीचे कडक इस्त्रीचे कपडे, डोक्यावर टोकदार गांधी टोपी, पायात मऊ मुलायम चपला आणि अत्यंत हसतमुख चेहरा, दोन्ही गालांवर खळ्या असे त्यांचे दिलाखुलास व्यक्तिमत्त्व होते.

“या या काकासाहेब, आपल्या सुप्रसिद्ध वर्तमानपत्रासाठी मुलाखत देण्याचा मान दिल्याबद्दल धन्यवाद!”

“ही सगळी आमच्या मुलाखत सम्राट, सूर्याजीरावांची कृपा. धन्यवाद. गुरूजी आपले हे चिंधडे विद्यालय संकुल फारच भव्य दिसते.”

“होय काका. ती सर्व आपले माननीय मुख्यमंत्री खुशालरावजी चिंधडे साहेब यांची कल्पना. खरेतर हा आदर्शाचार्य पुरस्कारही त्यांचीच मेहेरबानी. मी फक्त कर्तव्य करतो. फळाची आशा करीत नाही.”

“वा म्हणजे चिंधडेसाहेब आपल्याला अगदी भगवानाच्या ठायी आहेत म्हणायचे!”

“काका ते खरोखरच आधुनिक युगातील कर्मयोगी आहेत. त्यांची दूरदृष्टी आणि तळागाळातील लोकांसाठी अविरत कष्ट करण्याची वृत्ती हीच आमची प्रेरणा.”

“वाह्यात गुरूजी हा तुमचा मोठेपणा आहे. बरे ते असो. आज मी आपल्याला ” आदर्शाचार्य पुरस्कार मिळाला त्याबाबत आपली मुलाखत घ्यावी म्हणून आलो आहे.” तेवढ्यात एक शिपाई एक काचेची सुंदर सुरई आणि दोन कट ग्लासचे पेले घेऊन येतो. गुरूजी दोन्ही ग्लासमध्ये सुरईतून छोटे छोटे दोन पेग भरतात. त्या किरमिजी द्रव्याचा एक ग्लास उचलून ते तो काकांपुढे धरतात.

“घ्या काका. मुलाखत सुरू करण्यापूर्वी याची चव चाखा. हे आमच्या चोराची आळंदीचे खास पेय आहे.”

“हे काय आहे?”

“हा सोमरस आहे. प्राचीन ऋषीमुनी याचेच प्राशन करीत. परंतु यालाच वाईन म्हणतात हे आम्हाला आमच्या अमेरिका दौऱ्यात समजले.”

“काय? वाईन म्हणजे सोमरस?”

“होय काका. आमच्या अमेरिका भेटीत आम्ही तिथल्या फोक्सास विद्यापीठाला भेट दिली तेव्हा तिथल्या कुलगुरूंनी मि. फॅकडोनाल्ड यांनी आम्हाला आपली चोराची आळंदीची वाईन दिली. तिला ते सोमरस म्हणतात. या नावाचे त्यांनी पेटंटही घेतले आहे.”

“काय सांगता काय सोमरस नावाचं पेटंट?”

“खोटं नाही काका. अहो सोमरसच काय अशा कित्येक भारतीय नावांची, औषधांची त्यांनी लूट चालवलीय.”

“फारच अद्भुत आणि आपल्याला ठाऊक नाही?”

“काका हळदीचं आणि योगाचं पेटंट घेतलं तेव्हा आपले लोक जागे झाले.

हळूहळू अख्या भारताचं पेटंट घेतील तेव्हा आपली झोप उडेल.”

“काय सांगता?”

“हो ना, अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या आपल्याकडे परंपरागत वारसा म्हणून चालत आल्या आहेत. आता हेच पहा ना, तुम्ही कॅबेरे, डान्सबार, बारबाला याबद्दल रोज वृत्तपत्रातून वाचता ना?”

“हो वाचतो ना. पण त्याचा आणि या परंपरांचा, वारसाचा, पेटंटचा काय संबंध?”

“काका हेच हेच तर आपले अज्ञान. इतकी उच्च परंपरा असलेली गोष्ट आपण बंद करायला निघालो आहोत. अहो काका, अमेरिकेने यासाठी लासव्हेगास म्हणून एक अख्खे शहर वसवले आहे तेही वाळवंटात! आहात कुठे? अहो खोऱ्याने पैसा कमावताहेत ते आपल्या जुन्या लाटलेल्या गोष्टीतून? आपण मात्र ते बंद करायच्या गोष्टी करतोय!”

“अहो गुरूजी ते लासव्हेगास म्हणजे त्याला सिनसिटी म्हणजे पापनगरी म्हणतात तेच ना? यात कसली उच्च भारतीय परंपरा? आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतो.”

“छे, छे! अहो गैरसमज कसला? आता मला सांगा आपल्या परंपरेप्रमाणे मेल्यावर आपण कुठे जातो? एकतर स्वर्ग किंवा नरक. नरकात हालअपेष्टा असतात पण स्वर्गात काय असते? सांगा, सांगा ना?”

“स्वर्गात स्वर्गीय सुख असते आणि काय?”
“स्वर्गीय सुख म्हणजे नक्की काय असते?”

“कोणास ठाऊक पण भरपूर आनंद मिळतो म्हणे!”

“हं आता कसे बोलतात. अहो हा आनंद म्हणजे भरपूर अमृतपान करून स्वर्गातल्या रूपसुंदर अप्सरांचे नृत्य पाहणे असे म्हणतात ना? तेही देवांचा राजा इंद्राच्या दरबारात! अहो मग तेच तर या बारबाला, डान्स बार, कॅबेरे इथे देतात. मग स्वर्ग स्वर्ग तो काय? अहो या आपल्या स्वर्गसुख कल्पनेची ही चक्क अमेरिकेने उचलेगिरी चालवलीय. आपण मात्र मूर्खासारखे त्यावर बंदी घालतोय.”

“वाह्यात गुरूजी, मला वाटते, आपली काहीतरी गल्लत होते आहे. कॅबेरे आणि स्वर्ग यांची तुलना म्हणजे जरा अतिच होते आहे असे नाही का वाटत?”

“छे, छे. अहो त्यात काय अति?”

“बरं ते असो. पण गुरूजी, मी आज आपल्याला आदर्शाचार्य पुरस्कार मिळाला त्याबाबत आपली मुलाखत घ्यायला आलो आहे. स्वर्गाबाबतचे आपले मैलिक विचार जाणून घ्यायला मला आवडेल पण त्याकरिता मी पुन्हा आपली भेट घेईन. शिक्षण क्षेत्रातील या बहुमानाच्या सत्काराबाबत आपल्याला काय वाटते?”

“काका शिक्षणाला जुन्या कर्मदरिद्री परंपरेतून बाहेर काढून त्यात आधुनिक काळाला साजेल असे रूपांतर घडविण्याचे कार्य केले म्हणून आपले महनीय मुख्यमंत्री माननीय खुशालरावजी चिंधडे साहेब यांनी या पुरस्कारासाठी माझी खास शिफारस केली होती. माननीय मुख्यमंत्री खुशालरावजी चिंधडे हे काळाच्या चार पावले पुढे जाणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांची दूरदृष्टी अजब आहे. दंडकारण्यातून थेट लंकेपर्यंत पाहू शकणाऱ्या संपाती या गिधाडाप्रमाणे ते फार दूरचे पाहू शकतात. मा.मु.खु.चिं. हे…”

“समजले. गुरूजी खरेतर हा पुरस्कार मा.मु.खु.चिं. यांनाच मिळावयास पाहिजेल होता असे आपणास म्हणावयाचे होते, खरे ना?”

“होय काका. मा.मु.खु.चिं. यांच्या थोरपणाबाबत शब्द अपुरे पडतात. मा.मु.खु.चिं.”

“बरे आले लक्षात. आपण शिक्षणास कर्मदारिद्रयाच्या कर्दमातून बाहेर काढून त्याला आधुनिक चिखलातील कमळाचे रूप दिले असे आपण म्हणालात ते जरा स्पष्ट कराल का?”

“हो करतो. काका अजूनही आपण शिक्षणाचा चितळे मास्तर पॅटर्न आदर्श मानतो, मानतो ना?”

“चितळे मास्तर पॅटर्न? मी नाही कधी ऐकला तो?”

“काका तुम्हाला पु.ल. तरी माहिती असतील ना?”

“हो म्हणजे तेच ना आपले महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व?”

“हो तेच.”

“बरं मग त्यांचा आणि या चितळे मास्तर पॅटर्नचा काय संबंध?”

“काका त्यांची चितळे मास्तर ही वल्ली तुम्हाला ठाऊक नाही? घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणारी? मुलांना फुकट शिकवण्या देणारी?”

“हो हो, ते चितळे मास्तर होय? वा! फारच आदर्श होते ते मास्तर. आता असे आदर्श दिसतात कुठे? सगळीकडे नुसते पैसे खाणे. शिक्षणाचा बाजार केलाय सगळ्यांनी.”

“तेच तेच काका, मला तेच म्हणायचे आहे. अहो आता तो पॅटर्न काय कामाचा? आता कोणतीही गोष्ट फुकट मिळण्याचे दिवस गेले. अगदी हवा आणि पाणीसुद्धा. शुद्ध हवेसाठी वातानुकूलित यंत्र लागते आणि शुद्ध पाण्याची बाटली दहा पंधरा रुपयांना विकत घ्यावी लागते. शिक्षकी पेशा हा निस्वार्थ बुद्धीने विद्यादान करणे आणि ते करताना सरस्वतीच्या पूजनात दंग राहून लक्ष्मीकडे पाठ फिरवणे ही कल्पना आधुनिक काळात लागू पडत नाही. शिक्षकी पेशाला लागलेल्या या दारिद्र्याच्या शापातून त्याला मी मुक्त करण्याचा प्रयत्न तोही मा.मु.खु.चिं यांच्या मार्गदर्शनाखाली केला म्हणून माझा सरकारने असा गौरव केला.”

“शिक्षण, विद्यादान हे एक पवित्र कार्य आहे. धंदा नव्हे हे आपल्याला मान्य नाही असे दिसते.”

“काका वाटणे आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात फार फरक असतो. पूर्वी म्हणजे चितळे मास्तरांच्या वेळी चार पाच रुपये पगारात चांगला संसार व्हायचा. आता पाण्याची बाटलीच दहा पंधरा रुपयांत मिळते, खेडोपाडी तर तीही मिळत नाही. अशा परिस्थितीत शिक्षकाने कसे जगावे?”

“आपण म्हणता त्यात तथ्य आहे. पण आता शिक्षकांना पगारही तीनचार आकडी
मिळतात, जसे काम तसे वेतन.”

“काका, मुळात काम तसे वेतन हे तत्त्व इथे लागू होत नाही.”

“का बरं?”

“काका, आता एकेका वर्गात ६० ते १०० विद्यार्थी असतात. छडी लागे छमछम ही पद्धत आता बाद झाली. शिक्षकाच्या नोकरीसाठी किमान पात्रता डी.एड्. बी. एड्. लागते. त्यासाठीच दोनचार लाख मोजावे लागतात. त्यानंतर शिक्षकाची नोकरी मिळालीच तर पगाराच्या पूर्ण आकड्यांवर सही करून अर्धाच पगार पदरात पडतो अशी बहुतेक ठिकाणी परिस्थिती आहे. त्यानंतर दर चारपाच वर्षांनी बदलते अभ्यासक्रम. बदलती धोरणे, जनगणना, प्रौढ साक्षरता, लसीकरण, कुटुंब नियोजन, एडस् कार्यक्रम असे एक ना अनेक कार्यक्रम त्याच्या बोकांडी बसतात. शिक्षणाधिकाऱ्यांचे फतवे आणि शिबिरे यांची तर बेसुमार गर्दी असते. अशा वातावरणात तो शिकवणार काय बोडक्याचं?”

“अहो पण याचा शाळेशी काय संबंध? शाळांनी, शिक्षकांनी, शिक्षण खात्याने ते नाकारायला नको का?”

“काका इथेच आधुनिक शिक्षणाचे महत्त्व आपण समजून घेतले पाहिजे. भारतीय लोकशाही जर मजबूत करायची असेल तर फक्त पुस्तकी शिक्षण कामाचे नाही. त्यातून फक्त कारकून निर्माण होतात. इंग्रजांना कारकून हवे होते म्हणून त्यांची जुनी पद्धत ठीक होती. आता आपल्याला कारकून नकोत. खर्डेघाशी करणारे नकोत त्यापेक्षा फर्डे राजकारणी हवेत. शाळेत जाऊन पुस्तकी ज्ञान मिळवण्यापेक्षा आपल्या महान लोकशाहीची बूज कशी राखायची हे शिक्षण मिळायला पायजेल आहे. त्यासाठी शासनाचे हे सर्व उपक्रम तळगाळापासून राबविणे हे आधुनिक शिक्षणाचे आणि शिक्षकांचे मूलभूत कर्तव्य आहे. मी स्वतः, ग्रामपंचायतीच्या शाळांपासून जिल्ह्याच्या शाळेत मुख्याध्यापकापर्यंत जाताना हे सर्व उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पाडले. मा. मु. खु. चिं. हे ग्रामपंचायत सरपंच ते आज मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेल्या त्यांच्या उत्कर्षकाळात मी त्यांच्याच प्रेरणेने हे काम केले.”

“वा! फारच छान, पण हे करत असताना आपण शालेय शिक्षणाच्या आपल्या दृष्टीने दुय्यम असणाऱ्या बाबींकडे कसे लक्ष पुरविलेत? आपण ‘वाह्यात गुरूजी पॅटर्न’ म्हणून एक अत्यंत यशस्वी पॅटर्न, लातूर पॅटर्न सारखा यशस्वी केला आहे असे ऐकतो. या पॅटर्नमुळे आपल्या विभागातील शाळांचे निकाल जवळपास शंभर टक्के लागतात असे ऐकतो. काय आहे हा पॅटर्न?”

“हो खरे आहे. हा पॅटर्न आता सर्व भारतभरातील शाळांना लागू करण्याचे ठरत आहे. या पॅटर्नमुळेच खरेतर मला हा आदर्शाचार्य पुरस्कार मिळाला आहे. अर्थात त्याची मूळ संकल्पना मा.मु.खु.चिं. यांचीच.”

“ते लक्षात आले. जरा हा पॅटर्न खुलासेवार सांगता का?”

“हो सांगतो की. काका या पॅटर्नमागे दोन उद्देश आहेत. एक म्हणजे मुलांच्या मनावरचे अभ्यासाचे दडपण कमी करणे. दुसरे पालकांना आपली मुले अभ्यासक्रमाप्रमाणेच अभ्यास करतील आणि त्यांना अभ्यासक्रमाबाहेरील कोणतेही प्रश्न परीक्षेत विचारले जाणार नाहीत याची खात्री देणे. त्यामुळे होते काय की मुले आणि पालक दोघेही निर्धास्त मनाने परीक्षांना सामोरो जाऊ शकतात.”

“वा! फारच छान! हे कसे साधले जाते?”

“काका तोच माझा वाह्यात गुरूजी पॅटर्न! काका तुम्हाला माहीत असेल की आपल्याकडे आणि जगातही सगळीकडे मोठमोठ्या जागांवर, पदांवर नेमणुका होतात. राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, मु.मंत्री, मुख्य न्यायाधीश इत्यादी. त्यावेळी प्रथम काय करतात? त्यांना शपथ घ्यावी लागते, हो ना?”

“हो पण या शपथेचा शाळेच्या शिक्षणाशी आणि परीक्षांशी काय संबंध?”

“काका ही मोठमोठी मंडळी शपथ घेऊन पदभार स्वीकारतात. त्यांच्यावर गुप्ततेची जबाबदारी असते. त्यांना भ्रष्टाचार, लबाडी, फसवणूक अशा बदनामीस तोंड द्यावे लागते पण त्यातूनही ते निर्दोष सुटतात का? तर त्यांनी गुप्ततेची शपथ घेतलेली असते. ते असे गैरकृत्य कसे करतील? तेव्हा हे शपथ घेण्याचे तत्त्व हा माझ्या वाह्यात गुरूजी पॅटर्नचा मुख्य गाभा आहे.”

“वा, म्हणजे हा आपला सत्याचा प्रयोगच म्हणायचा? फारच विलक्षण वाटतो, काय आहे तो?”

“काका, या पॅटर्नप्रमाणे आम्ही तिमाही, सहामाही आणि वार्षिक परीक्षांच्या पंधरा दिवस आधी सर्व पालकांची बैठक बोलावतो. त्यांना परीक्षेची प्रश्नपत्रिका देतो. त्यांनी ती घेऊन घरी जायचे. शिक्षक विचारतात की प्रश्नपत्रिका अभ्यासक्रमाप्रणेच आहेत ना? त्यांचा होकार मिळाल्यावर त्या सर्व प्रश्नपत्रिका परत घेतो. त्यांचा होकार मिळाल्यावर आम्ही त्या परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना देतो.’

“गुरूजी हे तर सरळ सरळ प्रश्नपत्रिका फोडणेच नाही का?”

“काका, पालकांना या प्रश्नपत्रिका देण्यापूर्वी त्यांना एक शपथ घ्यावी लागते. त्यानुसार ते ही प्रश्नपत्रिका आपल्या पाल्याला दाखविणार नाहीत असे सांगावे लागते. अशी शपथ घेतल्यावरच त्यांना ती मिळते. आमचा सत्यमेव जयतेवर पूर्ण विश्वास आहे. हा पॅटर्न खूप यशस्वी झाला आहे. त्यामुळे आमच्या विभागातील जवळपास सर्व शाळांचे निकाल शंभरटक्के लागतात. या गोष्टीचा आदर्शाचार्य पुरस्कार देताना राष्ट्रपतींनी आवर्जून उल्लेख केला.”

“वा! गुरूजी आपण तर विद्यार्थांच्या आणि पालकांच्या मनातील हे परीक्षांचे भूत पार पिटाळून शिक्षणाला भयमुक्त केले हे फार मोठे कार्य आपण केले यात काही शंका नाही.”

“होय काका. लोकशाही तत्त्वाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीस स्वातंत्र्य आहे. शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलास पास होण्याचे आणि वरच्या वर्गात जाण्याचे स्वातंत्र्य आहे आणि तेच या माझ्या पॅटर्नमुळे साधते. लवकरच मी मुक्त शिक्षणाचा पॅटर्न’ आणणारा आहे.”

“तोही काही विलक्षण क्रांतिकारक पॅटर्न दिसतो!”

“होय काका, या पॅटर्नप्रमाणे प्रत्येक मुलास वयाच्या पाच वर्षानंतर कोणत्याही शाळेत न जाता घरी बसून किंवा तो जिथे असेल तिथून कोणत्याही परीक्षा केंद्रावर परीक्षा देता येईल. त्यासाठी शाळेत जाणे गरजेचे राहणार नाही. त्यामुळे शिक्षण, शाळा, शिक्षक, शिक्षणखाते इत्यादींवर होणारा प्रचंड खर्च वाचेल.”

“वा! फारच छान! मग उच्च शिक्षणाचे काय?”

“तूर्तास ही योजना राबवून मग त्या दिशेने लोकमत विचारात घेऊन पुढचे पाऊल टाकू अशी मा.मु.खु.चिं. यांची सूचना आहे.”

“गुरूजी आपणास आणि आपले मार्गदर्शक मा.मु.खु.चिं. यांना सुयश चिंतून शिक्षण क्षेत्रात अशाच क्रांतिकारक योजनांचे पेव फुटो अशी सदिच्छा व्यक्त करून मुलाखत संपवतो. धन्यवाद!”

(मा. वहिनी- ९.२००७)

–विनायक अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..