नवीन लेखन...

आग्यामव्हळाचा भडका अन वानरायचा तडाखा !

सोंडू पाटलाच्या शेतातं भैमूंग सोंगायची लगबग चालू व्हती.नव्हाळीच्या चार शेंगा लेकरायच्या तोंडी लागतील मणून सगळं गांव पाटलाच्या शेतात उलथलं व्हत.त्याल कारणबी तसच होतं.सोंडू पाटील गावातला दिलदार माणूस समजला जायचा,पण परतेक्षात मात्र त्यो लयचं बेरकी आन धुर्त व्हता.! त्याच्या हातून चार शेंगा जास्त सुटायच्या.त्यालं कुठं,कव्हा आण कसे हात मोकळे सोडायचे,ही कला अवगत व्हती.आवळा देऊन कोव्हळा काढण्याच्या बाबतीत तेव लय पटाईत व्हता.सोंडू पाटलाच्या घरी चोवीस घंटे लक्ष्मी पाणी भरायची.घरची गडगंज संपत्ती,दोन चार वेगळाले धंदे,शेतजमीन,चार पाच बैलगाड्या,दहा पंधरा दुभती जनावरं,संगटच शेतात ट्रॅक्टर,रोटाव्हेटर,थ्रेशर सारखे आधुनिक यंत्रबी दिमतीलं व्हतेच. दोन पोर्‍ह आणि जीव ववाळणारी पाटलीन हे त्याचं विश्व व्हतं. दिलदार मनाचा हा माणूस नावासारखाच रांगडा व्हता.उंच धिप्पाडं शरीर,तुर्रैबाज फेटा,आकडेदार लांब लांब जाड्या मिश्या अन भेदक नजरं असा पाटलाचा रूबाब व्हता.पाहताच क्षणी कोणालंबी जरब बसावी असा हा सोंडू पाटील…!! पंचक्रोशीत एक वजनदार आसामी म्हणून परसिध्द व्हता.तसं तरुणपणातं पाटीलं पंचक्रोशीतला एक नावाजलेला पैलवानं मनून वळखला जायचा.पाटलांनं लय गावचे आखाडे मारले व्हते.शंकरपट,कबड्डी, कुस्तीसारख्या अस्सलं मातीतल्या खेळायबरोबरचं पाटील तमाशाचाबी लयचं नांदिक व्हता.आजबी कुठंपण शंकरपट,कबड्डी,कुस्ती किंवा तमाशाचा फड पडल्याची जराशी जरी खबर कानावर आली की पाटलाची डमनी जुपलीच मनुन समजायचं….! तर आसा हा सोंडू पाटील जेवढा दिलदार तेवढाच बेरकीबी व्हता.

तसं पाह्यलं तं मिसरूड फुटायच्या वयातचं पाटलावरं घर आनं गाव आशी दोहेरी जबाबदारी पडली व्हती.पण पाटील धिरानं उभा राह्यला.पाठफोडून आलेल्या दोन बह्यनींचे लग्नं त्यानं धामधुमीत लावलेचं पण लाहाना भाऊ रंगा यालबी शिकवून त्यानं मास्तर केलं. आपल्याला शिकायलं जमलं नाही पण रंगा जरी शिकला तरी आपल्यालं त्याची मदतच व्हईल असं पाटलालं वाटायचं पण लवकरचं त्याच्या हातातं निराशा आली.लगनं झाल्यावर रंगा तालुक्यालचं घर करून राहायलं लागला व्हता मनुन मंग शेतीची जबाबदारी कायमचं पाटलावरं व्हती ती व्हतीच.पाटलानं तालुक्याच्या ठिकाणी रंगालं चांगला टुमदार बंगलाबी बांधुन देलता.गावं आनं घराची जबाबदारी संबाळता संबाळता तरूनपणातचं थोराडं झालेल्या पाटलालं बाजुच्याच कोळसेवाडीच्या कौतीकराव पाटलाची लेकं धुरपताचं स्थळं सांगुनं आलतं.थोरा मोठ्यायच्या मंधातरीपणात सोयरीक उरकुन लग्न झालं.तव्हापसुन धुरपता पाटलीनीनं सोंडू पाटलाचा संसार संभाळायलं सुरवातं केली ते आजतागायत कायम हे…!

पाटलीनबाई गावातले गावबंधकिचे निम्मे तरी तंटे फिंटे एकहाती मिटवायच्या.त्यामुळं सोंडू पाटलालंबीक आताक्शी जरा टाईम भेटायचा.पाटलीनबाई पाहता पाहता त्याचा आधार झालती. संसाराच्या या धकधकीत पाटलाच्या संसारवेलीवर दोन फुलं उगवले व्हते.पाटील आण पाटलीनं समाधानी झालते. खांदानाचा पायंडा मोडतं पाटलानं सरकारी धोरणानं छोटं कुटूंबं,सुखी कुटूंबचा वसा स्विकारूनं आपली नसबंदी करून घेतली व्हती. तसं पाहिलं तं पाटील जुन्या ईचाराचा व्हता पण जुण्यासंगच नव्या विचारांची पण तो कास धरायचा. ‌पाटलीनीची पाटलालं भक्कम साथ व्हती,कव्हाबी उंबरठ्यालं आलेला माणूस बगर मदत आन चहापाण्याचा गेला नाही.ज्याल कोणालं गावात काही आडचण आसलं त्यो सरळ पाटलाचा उंबरठा गाठायचा.

तिकडं शहरात रंगानं दुसर्‍या जातीतल्या बाईसंग घरोबा केलाता.पाटलालं पह्यल्यांदा लय दुःख झालं,पण त्यानं डोळ्यातले आसु डोळ्यातचं आटवत रंगा आन त्याच्या बायकोलं मोठ्या मनानं घरात घेतलं.त्याच्या बायकोलबी पाटलीनीचाच दर्जा देला.पाहता पाहता पाटलाचे पोरंबी लहानाचे मोठे झाले.संततीच्या बाबतीतं पाटील कमनशीबीचं ठरला.वडाच्या झाडाखाली जसे बांडगुळं वाढतात तसचं पोरायच्या बाबतीतं झालं होतं.बाप जाद्यायची संपत्ती ते मोकळ्या हातानं उधळायचे.टुकार सोपत्यायसंग बुलेटच्या गाड्या घेऊन निस्ते गावभरं हुंदडायचे. कुणीबी “दादा तुम्ही लय मोठे……तुमचा गावातं कोणी नांदचं करू नयं …….”असं म्हणलं की हरभऱ्याच्या झाडावर चढायचे.मंग काय मोकळ्या हातानं संगच्या टुकार कंपनीवर पैसे उधळायचे. तेह्यलं कोणतं व्यसन नव्हतं असं ठाम सांगता यायचचं नाही.शिक्षणाच्या आन व्यवहाराच्या बाबतीत मात्र ते एकदम अक्कलशून्य व्हते.त्यांच्याकडं पाहून पाटलालं लय दुःख व्हयाचं पण सांगाव तरीबिक कोणालं…! आज नं उद्या ताळ्यावर येतील म्हणून पाटीलं जानुनबुजून तेह्यच्या चुकायकडं कानाडोळा करून तो शांत राहायचा.

तिकडं तालुक्यालं रंगा मास्तरं दारूच्या लय आहारी गेलता.आजकाल तं दात घासल्यावर गुळणा करायलंबी त्यो दारूच वापरायचा. महिन्याच्या दहा पंधरा तारखीपर्यंत त्याचा पगार संपायचा अन मंग ते गावाकडं पैशासाठी हजर व्हायचा.रंगाची बायको समिंद्रा लयच खत्रुडं व्हती.तिकडं तालुक्याच्या ठिकाणी राहूनबी सारखी तिची गावाकडल्या घरी चटभट चालायची.आजकाल तं रंगा कोल्हाटणीयच्या अड्ड्यावरबी जायला लागला व्हता.तशी बातमीबी पाटलाच्या कानावर आलती.सोंडू पाटलाच्या कुटुंबालं आता उतरती कळा लागली व्हती.भावाचं आन पोर्‍हायचे परताप पाहून त्यालं दु:ख व्हायचं. आपला चिरेबंदी वाडा ढेपाळतो का काय असं त्यालं कव्हा कव्हा वाटायचं.एवढा रांगडा गडी असूनबी खाजगीत मात्र पाटलीनीच्या मांडीवर डोस्कं ठुवून आसवा़चं टिप गाळायचा.आपल्यानंतर हे गावगाडा भाऊ आण पोरं संभाळतील का याचीच त्यालं चिंता लागून राहायची.

तसा तरुणपणातच गाव गाड्यांचा कारभार अंगावर पडल्यामुळे अनुभवानं पाटीलं चांगलाचं मुरला व्हता.‌राजकारणात त्याच्यासारखा धूर्त माणूस गावात दुसरा नव्हता त्यामुळे कायमच ग्रामपंचायतचा ताबा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाटलाकडचं राहायचा एकदा असंच झालं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा गावात निवडणुकांचा बिगुलं वाजला व्हता.गावातील बाकीची माणसं साधी भोळी व्हती. पण पाटलालं मात्र पक्क गणीत आसायचं की,पॅनल उभा करतानी कोणाच्या भावकीतल्या कोणालं उभं करायचं;कोणाच्या मागं किती मतदान हाये,याचा लेखाजोखा त्याच्या डोस्क्यात पक्का आसायचा.पाटलांनं पह्यल्या निवडणुकीलं तं गावात कोणालचं खबर लागू देली नवती. निवडणुकीची नोटीसचं गावापस्तोरं येवू देली नाही.परस्पर तहसीलचे माणसं हाताशी धरून तिकडल्या तिकडचं गावातल्या पाच सात माणसांच्या पंच मनुन सह्या मारूनं निवडणुकीची नोटीस परस्परच गाहाळ केली व्हती. गावात विरोधी गटालं खबरच लागली नाही.आजूबाजूच्या गावायचं पाहून फॉर्म भरायलं विरोधकांयचा पॅनल तालुक्यालं गेला अन् इकडं पाटलाच्या पॅनलवर विजयाचा गुलालबी उधळला गेला.विरोधक हवालदिलपणे हात हलवतच राह्यले.असा हा पाटील राजकारणाच्या मैदानातबी लयचं तरबेज व्हता.आता यंदाच्यासाली निवडणुका लागल्या व्हत्या.लोकं आता पहिल्यासारके साधे-भोळे राह्यले नवते.मागच्या चाळीस वर्षापासून ग्रामपंचायतीवर पाटलाची एक हाती सत्ता असायची पण आताशा निवडणुकायचा डावबीक लय आवघडं झालता.रातच्यालं एका गटात असणारी माणसं दिवसा दुसऱ्याच गटात दिसायचे.त्यामुळं माणसं संबाळनंबी लय जिकरीचं झालतं.आताच्या मतदारायचं वागनं मंजे आसं झालतं की, एकाच खायचं प्यायचं, दुसऱ्याचं पैसं घ्यायचं,अन् तिसर्‍यालचं मतदान करायचं असं झालं व्हतं. निवडणुकीचा अंदाज घ्यायलं
पाटलाच्या शेतात भैमुंग काढायची लगबग चालली व्हती.इकडं भैमुंगाच्या आडून पाटिल राजकारणाचा खेळ खेळतं व्हता.पाटलाच्या गड्यायची पहाट पासून लगबग चालली व्हती.पाटलांन अख्खा एक भलामोठा बोकड्या गावासाटी कापून शेतात गावातल्या माणसायसाठी गावबंद डाव्हरा ठुला व्हता. तं गावचे तलाठी,ग्रामसेवक,शेतकीचे सायबं,शाळेतले मास्तंरं आन काही दुसरे अधिकारी,कर्मचारी,व आधीपासूनच हेरलेले गावातले वेगवेगळ्या भावकीच्या खुटावरचे परमुखं मानसं याह्यच्यासाठी स्पेशलं एक ठेवणीतला गुबगुबीत,स्पेशलं खुराकावाला बोकुड कापला व्हता.देशी विदेशी दारू,यांची तजवीज तं केलतीचं संगटचं रातच्यालं आखाड्यावरं काही निवडक मर्जीतल्या लोकायसाठी पाटलानं शेचारच्या गावावून कोल्हाटनीयचा तमाशाबी बलवलां व्हता.पाटलाच्या आखाड्यावर डाव्हर्‍याची तयारी जोमातं व्हती.आचारी मसाले बणवण्यातं तं सयपाकी बाया चपात्या आनं भाकर्‍या भाजण्यात गुतल्या व्हत्या.सगळीकडं मसाल्याचा घमघमाट सुटला व्हता.डोक्यावर तुर्रेबाज फेटा घालून पाटील आंब्याच्या झाडाखाली लोडालं टेकून गादिवर ऐटीतं बसला व्हता.भवताल त्याचे गावातले बगल बच्चे अनं तलाठी, ग्रामसेवक,मास्तरं,ईतर कर्मचारी अन नवे जुने पुढारी,गावातले प्रतिष्ठित येह्यचा गप्पायचा फड चांगलाच रंगला व्हता.यंदाबी ग्रामपंचायत आपलीच राहील पण ती कशी निवडून आणायची याचे डावपेच आखले जात व्हते.

भैमुंगाच्या शेतालं लागूनच पाटलाची चारकशे आंबे, दोन तीनशे पेरू,सीताफळ, जांभळी अशी भलीमोठी फळबाग होती.सगळेजनं भैमुंग सोंगण्यात गुंतलेले आसतानी तिकडं पाटलाच्या आमराईत वानरायनं धुमाकूळ घातला व्हता.त्याचे गडी वानरायलं तीन-तीनदा हाकलायचे पण गड्यायची पाठ फिरताचं आसपास दुसरीकडं झाडं नसल्यानं ते वानरं परत यायचे….

इकडं गावातून पाटलाची पोर्‍हं आपल्या बुलेटच्या कानकिटाळ्या फटऽऽ फटऽऽ आवाजात ऐटीतं राजेशाही थाटात शेताकडं आले व्हते.तेह्यच्यासंग तेह्यची लाळघोटी टुकार कंपणी व्हतीचं.पोर्‍हायनं आंब्याजवळच गाड्या लावल्या अन जवळच्या वडाच्या झाडाकडं मोर्चा वळवला.पाटलाची अन पोरांची नजरा नजर झालती तसं पाटलांनं सनकितचं तोंड फिरवलं व्हतं. पाटलालं पोर्‍हायची मित्र कंपनी पसंद नाही हे त्याच्या चेहर्‍यावून दिसत होतं.तसं पोर्‍ह गावात कितीबीक टुकारपणा करत आसले तरीबी पाटलापुढं मातर चळचळ कापायचे.तसं तं वरीस वरीसभर पोर्‍हायचा शेतालं पाय लागायचा नाही.डाव्हर्‍याच्या निमतानं आज पाटलाचे पोर्‍ह आन तेह्यची टुकार गॅंग ऐटीत शेतात आवतरली व्हती. आंब्याच्या झाडापासूनच थोड्याचं अंतरावर वडाचं भलमोठं झाड होतं. पाटलाच्या कित्येक पिढ्यांना साक्षीदार असलेलं ते वडाचं झाड पाटलाच्या आजच्या दोन पिढ्यायमधलं आंतर ठळकपणे पाहातं व्हतं. त्या वडाच्या झाडावर एक सात आठ पोळ्याचं भलं मोठं आसं आग्यामव्हळाचं पोळं व्हतं.लाहाण्या पाटलायनं आपल्या गोतावळ्यासंग वडाखाली मैफील सजवली.तिथं उथळ पांचट विनोद आनं आंबट गप्पायमुळं हासन्या खिदळण्यालं उतं आलता.त्यातल्या एकानं बाचकभरून भैमुंगाच्या शेंगायचा भारा आनला.भैमुंगाच्या झाडालं धरून भाजायलं सोप्प जातं मणून त्यांनी पाल्यासगट बाचकं आनलं व्हतं.त्या शेंगा भाजायच्याआंधी तेह्यनं संगट आनलेल्या हातभट्टीच्या मालावर वडाच्या आडुश्यालं जाऊन हातं साफ केलता.आता शेंगा भाजायसाठी ती टुकार गॅंग वडाच्या पुढ्यात येवून बसली.गडबडीत गटागट हातभट्टी पिल्यानं तशी तेह्यलं लवकरच ब्रह्मानंदी टाळी लागली व्हती. तेंच्या डोक्यात आता झिंग चढल्यानं त्येंनला आजुबाजुचं कायबी भान राह्यलं नवतं.त्या पोर्‍हायनं बाजूच्याचं धुर्‍यावून भैमुंगाच्या शेंगा भाजायसाठी आयचन आणलं व्हतं.ते जरा वलबटच व्हतं.पण त्या पेताडाईच्या ते काय लक्षात आलं नाही.तेंनी वडाखालचा जराक्सा काडीकचरा गोळा केला आन आग पेटवली.वलबट आयचणानं आग पेटतं नवती तशातच तेह्यनं वरतुन पाल्यासंगटच शेंगाबीक भाजायलं टाकल्या. त्यामुळं भलमोठं धुपट झाल.वडावर महुळं हाये हे तेह्यलं माईतच नव्हतं.खाली जाळ पेटवल्यानं वलबटामुळं निस्तं धुपट झालतं.त्या धुपटामुळं झाडावरचं ते आग्यामव्हुळं चौताळलं.गांगरलेल्या मधमाश्या पोळ्याहून उठून जिकडं तिकडं जिवाच्या आकांतानं भिरभीर उडाया लागल्या आन दिसलं त्यालं दणके देऊ लागल्या. आग्यामव्हुळं उठल्याची वावरात आवई पव्हचेपर्यंत चौकडं मव्हळाच्या माश्या पसरल्या व्हत्या. सगळेजण सैरभैर पळू लागले. आग्यामव्हुळच्या माश्या दिसल त्याला दनादन चावत होत्या. सगळीकडं निस्ता आरडा वरडा आन चिरकाळ्या ऐकू येत होत्या. झाडाखालचे सरपंच, ग्रामसेवक,तलाठी,मास्तर आन इतर कर्मचारी आणि स्वयंपाकी बाया माणसं याह्यच्यावरतीबी आग्या मव्हळाच्या माश्यायनं हल्ला केला.तिकडं रातच्या तमाशाच्या तयारीलं लागलेल्या बाया आन तमासगीर माणसं हे पण मधमाशांच्या खौपानं सैरभैर पळायलं लागले.मधमाश्यायनं कोणालचं सोडलं नाही.पाटील आणि गावातली दोन-चार मथारे खोडं येह्यलं मायीतं व्हतं कि बा जमिनीवर आडव निपचीतं पडलं की मधमाश्या चावत नाहीत मणून…! ते शांतपणे जमिनीवर निपचीतं पडले. त्यामुळं ते मधमाश्यायच्या कोपापसून वाचले.मधमाशांच्या रस्त्यात जे कोणी येत होतं त्या सगळ्यांना मधमाशांनी चांगलाच परसाद देला व्हता.घंट्याकभरानं सगळं शांत झालं.मव्हळाच्या माशा आता परत पोळाकडं वळल्या व्हत्या.इकडं माणसायचा कल्हमा ऐकून तिकडं पाटलाच्या आमराईत घुसलेले वानरबी भांबावले.वरडण्या चिरकण्यामुळं ते बिथरून सैरावैरा पळाया लागले. आवाजामुळे ते बी पिसाळल्यावाणी माणसायतं शिरले. या पळापळीत पाटलाच्या बागचं लयं नुकसानं झालं व्हतं.माकडायनं आता माकडचाळे करायलं सुरवातं केलती.कोणी शेंगा तोडू लागलं तर कोणी कायबी उचलुन इकडं तिकडं पळू लागलं.त्यातल्या एका भल्या मोठ्या जंताळ्या वानेरानं आपला मोरचा वडाकडं वळवला. वडाखाली पाटलाची पोरं आणि तेह्यची मित्र कंपनी दारू आन वरतुन आग्यामव्हळाच्या माश्यायच्या ईखारी डंखामुळं पेताडून धुंद पडले व्हते.तेह्यलं कशाचीचं सुद नवती.त्यातलं एक दोन तं तिथचं उलटी करून पडलं व्हतं.आरधी उलटी तोंडातं तं आरधी खाली जमीनीवर आसंबी किळसवाणं दृष्य तिथं दिसतं व्हतं.एकतं चक्क पयेजमातचं मुतलं व्हतं.तेव जंताळ्या तीथं आला. सगळेच बेशुद्ध पडले होते.त्या जंताळ्यानं ईकडं तिकडं पाहूणं तिथं पडलेली एक हातभट्टीची बाटली उचलली आणि पाणी म्हणून ती गटागट पिली.थोड्याच येळात हातभट्टीनं परताप दाखवायलं सुरुवात केली. जंताळ्या वानेरं आता लईच पिसाळल्यावाणी करू लागलं.कचाकच….कचाकच दात खाऊ लागलं…भुंऽऽमप भुंऽऽमप आसा आवाज काढु लागलं.त्यामुळे तिथं ध्यानावर असलेल्या समद्यायची फाटारली व्हती.त्या जंताळ्यानं पाटलावरच हल्ला करतं पाटलाचा फेटा हिसकुन घेऊन आपल्या डोस्क्यात घातला अन हातातली छडी घेऊन दिसल त्यालं त्या छडीनं मारू लागला.पह्यलं मव्हळाच्या माशांयनं आन आता वानरायनं सगळ्यायलं सळो कि पळो करून सोडलं व्हतं.तेवढ्यात त्या जंताळ्याचं ध्यान आचार्‍यायनं केलेल्या सैपाकाकडं गेलं.त्याच्या डोस्क्यात हातभट्टी गरगर फिरत व्हती.नशेच्या धुंदीत त्यानं त्या भल्यामोठ्या मटणाच्या कढया उलथून सांडल्या.आता बाकीच्या वानरायचबी ध्यानं तिथल्ल्या भाकरी व पोळ्यायकडं गेलं.तेह्यनं पोळ्या उचलून पळायलं सुरुवात केली.एकाचं दोन अन दोनाचे चार असे पाहता पाहता सगळ्या वानरायनं जमुन तिथल्या पोळ्या,भाकरी उचलून पोबारा केला.

इकडं पाटलाच्या वावरात जे-ते जिकडं रस्ता दिसलं तिकडं पळत व्हतं. कुणालं काहीच सुदरत नव्हतं.असं करता करता ‌.आचानक धडकलेलं हे वादळ थोड्यावेळानं शांत झालं.वानरंबी पळून गेले व्हते अन आग्यामव्हळाच्या माश्याबी वापस पोळ्यावर जाऊन बसल्या व्हत्या.पाटलाच्या वावरात भैमुंगाच्या शेंगा इतस्ताहा पसरल्या गेल्या व्हत्या,तं सगळ्या सयपाकाचीबी नासाडी झाली व्हती.

गावातल्या लोकायसाठी ठेवलेला कार्यक्रम अशा प्रकारे उधळल्या गेलता.मधमाश्या चावल्यानं कोणीच कोणालं वळखू येईनं गेलतं. मनभर वजनाचे माणसं दीड मनाचे दिसू लागले. सगळेच जणं सुजले व्हते.आता सगळं सामसुम झाल्यामुळं सुटकेचा निःश्वास सोडून परत्येकजनं एक दुसऱ्याच्या अंगावरचे मधमाशायनं टोचलेले काटे काढत व्हते. अशा प्रकारे पाटलाची पार्टी आन भैमुंगाची काढणी याची पाटलाच्या बेअक्कलं पोर्‍हायमुळं दानादान उडाली व्हती. तिकडे गावात पाटलाच्या पार्टीची आन भैमुंग सोंगणीच्या तारांबळीची लोकं पुढचे कित्येक दिस चघळणं करत व्हते.आताशीक पाटलालंबीक आपल्या गादीच्या वारसाचं भवितव्य वळखलं व्हतं

©गोडाती बबनराव काळे
मो.नं.9405807079

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..