जसा देश तसा वेश, जशी प्रकृती तसा आहार या सूत्रानुसार, प्रकृतीनुसार आहार घ्यावा, तसा कामाप्रमाणे, आणि प्रदेशानुसार आपला आहार आपण बदलावा.
आपल्या परंपरेप्रमाणे जो आहार आपण लहानपणापासून घेत आलोय, तो आहार शक्यतो, प्रदेश बदलला नाही तर, बदलू नये.
जसे लहानपणी जेव्हा पहिला घास भाकरीचा असेल तर भाकरी पचवण्याची ताकद तेव्हा पासूनच वाढवली जाते.
जर पहिला घास पावाचा असेल, तर पाव सहज पचू लागतो.
जर पहिला घास इडली डोश्याचा असेल तर आंबवलेले पदार्थ सुपाच्य होतात. फार त्रास देणार नाहीत.
तसे पहिल्यापासून मांसाहार करायची सवय असेल तर तो कसा पचवायचा, हे शरीराला माहीत असते.
म्हणजे नाॅनव्हेज खाणे बंद करायची आवश्यकता नाही. आयुर्वेदात मांसाहार करूच नका, असे म्हटलेले नाही. मांसाहाराचे वर्णन करणारा एक स्वतंत्र अध्यायच वर्णन केला आहे.
वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस पचायला कसे असते, चवीला कसे असते, कच्चे खाल्ले तर काय होईल, शिजवून खाल्ले तर काय होईल, पचले नाही तर काय लक्षणे दिसतील, ते पचवण्यासाठी काय बदल केले पाहिजेत, अमुक पदार्थाबरोबर खाल्ले तर काय होईल, कोणत्या पदार्थाबरोबर आवर्जून खावे, अमुक मांस कोणता परिणाम घडवणारे असते, इ. वर्णन केले आहे. तयार केलेल्या नवीन पदार्थांचे गुण काय असतील याचेही वर्णन आहे.
हे पण सांगितले आहे की आहे कि मांसाहार रज आणि तम गुण वाढवतो. जेव्हा रज आणि तम गुण वाढणे आवश्यक असेल तेव्हा तो वाढविण्यासाठी मांसाहार केलाच पाहिजे.
जसे, देशाच्या रक्षणासाठी आपला जीवही अर्पण करणार् या जवानाना, त्यांचे शरीरबल वाढवणे, मनोबल वाढवणे, प्रसंगी शत्रूचा म्हणजे चालत्या बोलत्या, आपल्याच सारख्या एका माणसाचा जीवही घेणे, आवश्यक असते. काही वेळा ही क्रूरता अंगी मुरवावी लागते.
पण कोणाला ?
ज्याच्या हातात सतत बंदुक असते, ज्याला सतत हिंसेसंबंधी विचार करावे लागतात त्याला.
दोन वेळा मस्त जेवून, मोबाईलवर लढाईचा गेम खेळणार् यला, आणि पांघरूण घेऊन, निवांत घरी झोपणार् याला नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग 9673938021.
Leave a Reply