आहाराचा किती सूक्ष्म विचार उपनिषदांमधे केलाय.
उपनिषदकार म्हणतात,
जसे घुसळलेल्या दह्याचा सूक्ष्म भाग म्हणजे लोणी
भक्षण केलेल्या तेजाचा एक भाग म्हणजे वाणी,
प्राशन केलेल्या जलाचा सूक्ष्म भाग म्हणजे प्राण,
आणि भक्षण केलेल्या आहाराचा सूक्ष्म भाग म्हणजे मन.
याला पुरावा काय ?
असा तिरकस प्रश्न विचारू नये.
भारतीय दर्शन शास्त्रे, हीच पुरावा आहेत. हेच आप्तवचन आहे.
आप्त म्हणजे, ज्ञानाने, अनुभवाने आणि वयाने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ.
त्यांनी सांगितलेले आम्ही ऐकायचे. पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने !
हीच भारतीय परंपरा.
हा.
अनुभव जरूर घ्यावा. हाच पुरावा.
आपण जेवलेल्या अन्नातील स्थूल भागाचे पचन पूर्ण झाले की त्यातून मल मूत्र इ. तयार होतात. जे टाकावू असतात. बाहेर काढून टाकले जातात.
आहाराचा मध्यम भाग यामुळे शरीरारातील रस, रक्त, मांस, मेद, हाडे, मज्जा, शुक्र यांची निर्मिती तसेच अनेक अवयवांचे पोषण होत असते.
आणि आहाराच्या सूक्ष्म भागापासून मनाचे पोषण होत असते.
जैसा अन्न खाईये वैसा मन होय, असे आपल्या दोह्यातही कबीरजी सांगतात.
या सूक्ष्म भागातील उत्तमापासून सत्व गुण तयार होतो.
सूक्ष्मातील मध्यम भागापासून रज गुण आणि सूक्ष्मातील हीन गुणापासून तम गुण तयार होतो.
आयुर्वेदात आरोग्याचे तीन उपस्तंभ सांगितले आहेत.
1.आहार 2 निद्रा 3 ब्रह्मचर्य
यांचाही मनाशी संबंध आहे.
निद्रा तमोगुणी
आहार रजोगुणी
तर ब्रह्मचर्य सत्वगुणी मानले जाते.
हे सत्व रज तम मनाचे गुण आहेत.
म्हणजेच आपल्या आहाराची परिणती पुढे कशी कशी होत जाते, याचा किती सूक्ष्म विचार भारतीय शास्त्रांमधे केला आहे, याची ही छोटीसी झलक आहे.
अन्न हेच ब्रह्मस्वरूप आहे,
जसे विश्व ब्रह्मातून उत्पन्न होते, ब्रह्मावरच जगते, आणि शेवटी ब्रह्मातच विलीन होते, तसेच सर्व प्राणीमात्र अन्नापासूनच उत्पन्न होतात, अन्नावरच जगतात, आणि अन्नातच विलीन होतात.
आपण आहार घेतो त्यापासून काही घटक बनत जातात. त्याचा सर्वात शेवटचा अविष्कार काय असेल ?
शक्ती – उर्जा – चैतन्य – समाधान आणि आनंद
सत् चित आनंद !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
31.08.2016
Leave a Reply