आहार आणि वय, आहार आणि देश, तसच आहाराचा शरीरबलाशी मनोबलाशी संबंध असतो.
बल म्हणजे ताकद, क्षमता. ही प्रत्येकाची वेगवेगळी असते.
सर्वसाधारण तरूण वयाची पोटात अन्न सामावून घेण्याची क्षमता जास्तीत जास्त 350 ते 400 ग्रॅम असते. आग्रहाने जरी जेवले तरी यापेक्षा जास्त अन्न पोटात राहू शकत नाही. जर जबरदस्तीने ठूस ठूस के भरण्याचा प्रयत्न केला तर उलटी होईल, नाहीतर जुलाब.
पण आपण वजन करून कधी जेवत नाही. मग कळणार कसे किती ग्रॅम जेवलोय.???
यासाठीच त्याने आपल्याला जसं नैसर्गिक घड्याळ ( biological clock ) दिलं आहे, तसंच नैसर्गिक वजनकाटा (biological weighing machine ) पण दिलं आहे. आपोआपच कळतं. पोट आता भरलं. आता जेवायचं नाही.
अगदी नवजात तान्ह्या बाळालापण कळतं. आपलं पोट भरलं आहे की नाही ते. पण प्रत्येक आईला मात्र कळत नाही. तिला वाटतं, अजून पोर उपाशी आहे. पोराचं पोट भरलंच नाही काय? कालच्यापेक्षा आज ते बारीक दिसतंय, वगैरे आपल्या पोराचं पोट भरलंच नाहीये, असं तिच्या मातृत्वामुळे, ममत्वामुळे वाटणं साहजिक आहे. आणि जर पोटच्या पोराच्या पोटापेक्षा आईचं हे ममत्व मोठं झालं की पोराचं पोट बिघडलंच म्हणून समजा.
जसं आपल्याला पोट दिलंय, पोट भरल्याची जाणीव दिलीय, तसंच प्रत्येकाला ती आहे. या जाणीवेची जाणीव मुलांना जर झालीच नाही, तर आईवर मुलं एवढी अवलंबून रहातात की आपलं पोट भरलंय की नाही हे सुद्धा त्यांना कळत नाही. आणि मग जेव्हा आईच भरवणं थांबतं, तेव्हा त्याला समजत, आता आपलं पोट भरलंय.
एवढं मुलांना परावलंबी बनवू नका. ही अतिशयोक्ती अजिबात नाही. असे अनेक आईमेड रूग्ण बघायला मिळतात.
आईला वाटतं,
मी बाळाला भरवतेय…
मान्य.
पण गिळायला कोणी शिकवलं.?
मी बाळाला भरवतेय…
मान्य.
पण ओकायला कोणी शिकवलं. ?
मी बाळाचं पोट भरतेय….
मान्य.
पण आता नको म्हणायला कोणी शिकवलं ??
मी बाळाचं पोट भरतेय….
मान्य.
पण शीशुला शी आणि शु करायला कोणी शिकवलं ???
त्याच्यावर थोडा विश्वास ठेवला की असं विकतच, आपणच आपल्या बाळावर ओढवून आणलेलं आजारपण येणार नाही.
कधी थांबायचं, कुठे थांबायचं आणि कोणी थांबवायचं हे फक्त समजलं पाहिजे.
— वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग 9673938021
13.08.2016
Leave a Reply