दिव्यात वात, तोंडात हात अशी आमच्या मालवणी भाषेत एक म्हण आहे.
याचा अर्थ असा आहे की, जेव्हा दिवेलागणीची वेळ होते, तेव्हा हात तोंडाकडे, तोंडात जावा.
अगदी शब्दशः अर्थ लावू नका हो.
दिवेलागणीची वेळ म्हणजे कातरवेळ.
यावेळी जेवू नये असं जुनी माणसं म्हणतात. तेही काही खोटं नाही.
अगदी त्या कातरवेळी नाही, त्या आधी जेवलं तरी चालतं. पण नंतर अजिबात नको.
आधी पोटोबा मग विठोबा.
आधी स्वार्थ मग परमार्थ.
या पण म्हणी याचीच आठवण करून देणार्या आहेत.
आधी जेवावे, नंतर बाकीचे उद्योग. हे खरं.
आमच्या लहानपणी आम्ही शाळेतून आलो की, थोडं खेळणं वगैरे झालं की, हातपाय धुवुन शुभंकरोती झाली की लगेचच जेवायला बसायचं. साडेआठ, नऊला डाराडूर.
तेव्हा इडीयट बाॅक्स (टीव्ही) नव्हता आणि वाॅटसप त्याहून नाही.
लवकर निजे लवकर ऊठे
त्यासी धन आरोग्य संपदा मिळे.
असं सुभाषित शाळेत कितीवेळा फळ्यावर लिहून झालंय.
पण आता या पुराणातल्या गोष्टी झाल्या ना ! .
” आम्ही फार ऊशीर करत नाही हो हल्ली झोपायला, बारा साडेबारालाच झोपतो.”
असं आता सातवी आठवीतली पोट्टी सांगू लागली आहेत.
त्यापेक्षा मोठ्या कार्ट्यांचं म्या पामर काय सांगणार ?
चादऽर पांघरूनी,
पोरगंशांत झोपले ? हे,
घेऊन आत मोबाऽईल
पाहतो विचित्र चित्रे
चादऽर पांघरूनी ।।
या पिढीचं झोपणं म्हणजे आमची मध्यरात्रच !
कसं व्हायचं एवढ्या अन्नाचं पचन ?
मग अॅसिडीटी वाढते……
जाऊदेना.
समजवण्याच्या पलीकडची आहेत ही.
आपलं तेच खरं करणार.
जेवणं आणि झोपणं यात निदान तीन तासाचं अंतर हवं.
सायंकाळी सात वाजता जेवलो तर, दहा वाजता किंवा दहा वाजल्यानंतर सहज झोपू शकतो. अन्नपचनाला पुरेसा वेळ मिळतो.
म्हणजे पित्त पण वाढणार नाही.
तसं समजा, दुपारी बारा वाजता आपण जेवलो तर सणसणीत भूक किती वाजता लागते ?
साधारणपणे रात्रौ आठ वाजता.
आणि रात्री आठ वाजता पोटभर जेवलो तर परत चरचरीत भूक किती वाजता लागते ?
दुपारी बारा वाजता.
बरोबर ना !
आता मोजा.
दुपारचं पचायला किती वेळ लागला आणि रात्रीचं पचायला किती वेळ लागला.
दिवसा जेवलेलं अन्न पचवायला फक्त आठतास लागले.
तर रात्री जेवलेलं अन्न पचवायला किती तास खर्च पडतात ?
तब्बल सोळा तास ! ! !
म्हणजे दिवसाचे अन्न पचायला फक्त आठ तास लागतात आणि रात्रीचे अन्न पचायला ???
तब्बल सोळा तास !!!
दिवसाचे अन्न आठ तासात संपून जाते, तर रात्रीचे अन्न किमान चौदा ते सोळा तास आत रहाते.
म्हणून बारा बारा तासांचे दोन समान भाग दिवस आणि रात्र केले तर ? अन्नालाही पचायला समान वेळ मिळेल. नैसर्गिक रीत्या पचन पूर्ण. कुठलेही खास पथ्य नाही की विशिष्ट बंधन नाही.
बारा तास खायचे.
बारा तास पचवायला द्यायचे !
पण एक प्रश्न शिल्लक राहिलाच.
रात्रौचे अन्नपचन व्हायला एवढा जास्त वेळ का लागतो ?
उत्तर एकच असेल.
सूर्य नसतो म्हणून…
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021
08.08.2016
Leave a Reply