आपल्या आहारातील काही अत्यंत महत्वाच्या पदार्थाविषयी किंवा प्रमुख सूत्राविषयी आपण आता चर्चा करूया.
आहार हेच औषध आहे. हा आहार जर युक्ती वापरून बनवला तर वेगळ्या औषधांची आपल्याला गरजच पडू नये. शास्त्रीय स्पष्टीकरण देण्यापेक्षा जास्तीतजास्त व्यावहारिक स्तरावरून आहार अभ्यासला पाहिजे.
देशानुसार आहार विचार करावा. म्हणजे आपण ज्या प्रदेशात राहातो, त्या प्रदेशात उगवणारे अन्नधान्य आपल्याला हितकर असते. उगाचच कोणत्या तरी कंपनीच्या अहवालानुसार, कोणत्या तरी प्रयोगशाळेचा दाखला देऊन, काही अन्न पदार्थ आपल्या पोटी मारले जातात. आपणही कोणताही विचार न करता ते पदार्थ जणुकाही आपल्यासाठीच बनवले आहेत, अशारितीने त्यांना अंगिकारतो.
एवढं सांगताहेत, ते आधी वापरून तर बघू, पासून सुरू होत जाणारी आमची गुलामगिरी आमच्या रक्तात एवढी भिनते की नंतर ते आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनून जातात, मग त्या पदार्थातील दोष दिसेनासे होतात. पण ते पदार्थ मात्र आपला प्रभाव आतून दाखवतच असतात.
जसे सोयाबीन. मुळात डुकरांना माजवण्यासाठी पाश्चात्य देशात या सोयाचा वापर केला जायचा. याची तशी काही आवश्यकता आहे, असे अजिबात नाही. पण भ्रष्टाचार कोणत्याही स्तरावरून केला जाऊ लागला. आणि भारतातील मोठ्या प्रमाणात असलेल्या कुपोषितांच्या सोईसाठी या सोयाची आयात केली गेली. त्याच्या शेतीसाठी अनुदान देणे सुरू झाले. जिथे सोयाची शेती केली जाते, तिथे अन्य पिके कुपोषित राहातात. तेथील जमिनीतील पाण्याचा स्तर इतर जमिनीपेक्षा अधिक खाली जातो. पण लक्षात घेतो कोण ?
मुळात अभारतीय असलेला हा धान्य प्रकार आमच्या स्वयंपाकघरात असा काही घुसवला गेला आहे, की आमचे पूर्वजांनी हे सोयाबीन आम्हाला न दिल्यामुळे आमचे अतोनात नुकसान झाले आहे, असे काही वेळा वाटते. नेहमीच्या पोळीच्या पीठात एक मुठ करता करता सोयाच्या दुधापर्यंत, आणि चंक्सच्या रूपात, गरीबांचे चिकन इथपर्यंत त्याची घुसखोरी झालेली आहे.
त्याला सक्षमपणे पर्याय असणारे उडीद, मसूर, चवळी, राजमा सारखे भारतीय पर्याय उपलब्ध असताना या सोयाचे मिडीयाने एवढे कौतुक केले की, स्वतःच्या पोटच्या गोळ्यापेक्षा, सवतीचे पोर आम्हाला आमचेच वाटू लागले.
सोयाबीन हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अश्या कितीतरी अभारतीय गोष्टी आम्ही सहजपणे स्विकारल्या आहेत.
मुळात मेकाॅलेच्या विचारसरणीचा आमच्यावर एवढा प्रभाव पडत चालला आहे, की भल्या भल्यांना देखील आपण दिवसेंदिवस अभारतीय होत चाललो आहोत, हे लक्षातही येत नाही. आमच्या मनातील भारतीयत्व पद्धतशीरपणे विसरायला भाग पाडणारा तो दुष्ट मेकाॅले आमच्या शिक्षणपद्धतीतून अजुनही जिवंत आहे.
स्वत्व गमावल्यामुळे सर्वस्व जाण्याची वेळ लवकरच येते, या न्यायाने आपण जर वेळीच जागे होऊन भारतीय पद्धतीने विचार करणे सुरू केले नाही तर आपण कृतीच्या स्तरावर पण अभारतीय होत जाऊ, अशी प्रामाणिक भीती वाटते.
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
17.01.2017
Leave a Reply