आयुष्यभर औषधे घ्यावी लागू नयेत, असं प्रत्येकालाच वाटतं. पण त्यासाठी जे करावं लागतं ते करायची तयारी मात्र नसते.
आणि असा समज करून दिला जातो, की एकदा डायबेटीस झाला की कायमचा चिकटला. ही निराशा मनातून काढून टाकली पाहिजे. हा आजार जर मनोशारिरीक असेल तर औषध फक्त शरीरात जाऊन काय करणार ? जर रोगाचे एक मूळ मनात असेल तर तिथपर्यंत पोचायला नको का ?
मन कुठे आहे ते अजून माॅडर्न (?) मेडीसीनला समजलेलंच नाही. मन ह्रदयात आहे. आणि आज शोधलं जातंय मेंदूमधे. कसं सापडणार ?
जाऊदे !
प्रमेह होण्याचं मुख्य कारण दूध, दही, पाणी, अति, गोड, कफ वाढवणारे पदार्थ खाणे, हे तर आहेच पण यापेक्षादेखील खाल्लेलं पचवता न येणं किंवा पचवण्यासाठी काहीही कष्ट न करणे हे प्रमुख कारण आहे. मेहनत करा. म्हणजे मेह म्हणजे प्रमेह म्हणजे मधुमेह नत म्हणजे नाहीसा होईल.
प्रमेह वाढण्याचं मुख्य कारण बदललेली जीवनशैली आहे. बैठे काम वाढलंय, सुखाचा अतिरेक झालाय. आम्ही खातोय खूप. खाऊन खाऊनच अशक्तपणा येतोय. मग पचवणार कधी ? त्यात कफ वाढवणारे सर्व पदार्थ निसर्गनियमाने मधुर रसाचे आणि पचायला जड असणारेच असतात.
आमची वृत्तीच अशी झालीय की, आता दूध बंद करायचं, मग अशक्तपणा येणार, त्यासाठी परत टाॅनिक घ्यायला हवं. म्हणजे प्रत्येक वेळी आपण असा विचार करू लागलोय, की अमुक पदार्थ खाल्ल्याशिवाय माझं रक्त वाढणारच नाहीये, तमुक पदार्थ खाल्ल्याशिवाय प्रोटीन्स मिळणारच नाहीत. कॅल्शियमसाठी हे खाल्लंच पाहिजे. ह्रदयासाठी हे, किडनीसाठी ते. असा विचार करणं योग्य नाही.
शरीराचे तुकडे करून तपासणारी वैद्यकीय यंत्रणा कार्यरत असल्यावर प्रश्न पडतो. संपूर्ण शरीराचा, मन आत्मा, इंद्रियासह विचार कोण डाॅक्टर किंवा वैद्य कधी करणार ? पायाला काटा लागल्यावर डोळ्यातून पाणी येणारं आपलं शरीर, प्रत्येक डाॅक्टरनी शरीर असं काही वाटून घेतलं आहे की, काही वर्षांनी वरच्या कवळीचा डेंटिस्ट वेगळा आणि खालच्या कवळीचा डेंटिस्ट वेगळा शोधावा लागेल. उजवा डोळा एक जण तपासेल, तर डावा डोळा दुसराच !
जोक अपार्ट. चिकित्सा करताना संपूर्ण शरीराचा विचार करावा, असं आयुर्वेद मानतो.
एवढे व्हिटॅमिन्स हवेतच, एवढे कॅल्शियम हवेच, हे नियम बनवले की कायदे आले. कायदा बनला की, पुरावे आले. पुरावे दाखवायची वेळ आली तर मन कसं दाखवणार ? आणि इंद्रियांचं काय करणार ? मग त्याला कोण विचारणार ? त्याला म्हणजे आत्म्याला !
आयुर्वेद शास्त्र शरीराचे असे तुकडे पाडून विचार करतच नाही. अखंड शरीर, मन, इंद्रिय आणि आत्म्यासह चिकित्सा करण्यासाठी घ्यावे, असे शास्त्रकार म्हणतात.
ही प्राथमिक माहिती समजल्याशिवाय प्रमेहाविषयी आयुर्वेदात सांगितलेली सूत्रे नीट लक्षात येणार नाहीत, म्हणून हे आधी आणि परत परत सांगावे लागत आहे. कारण आज आरोग्य हे चौकटीतल्या नियमांना बांधले गेले आहे. रक्तदाब एवढाच पाहिजे. रक्तातील साखर एवढीच हवी. वजन एवढेच हवे, कॅल्शियम एवढे हवेच ! कमी पडत असेल तर सरळ लेबल चिकटवले जाते, तू रोगी !
……. आणि आयुर्वेद म्हणतो…..
…….. इथे प्रत्येकाचे नियम वेगळे !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
27.01.2017
Leave a Reply