अमुक रोग ‘कमी करण्यासाठी’ आयुर्वेदात काय औषध सांगितले आहे, असा प्रश्न विचारायला लागू नये, यासाठी, रोग होऊच नये यासाठी आयुर्वेद नीट समजून घेणे आवश्यक आहे.
आयुर्वेदात सांगितलेले उपाय हे प्राधान्याने रोग होऊ नयेत, यासाठी सांगितलेले आहेत, हे आधी लक्षात घ्यावे. केवळ रोगाची लक्षणे कमी केले की झाले असे नव्हे तर, जो रोग समूळ नष्ट व्हायला हवा, तो योग्य औषधोपचार आणि विशिष्ट पथ्य सांभाळले की झाले. त्यासाठी औषधे कायमची कशाला घ्यायची ?
आयुर्वेद ही एक जीवनशैली आहे. त्यामुळे जीवन कसे जगावे, जीवन म्हणजे काय, त्याचा उद्देश काय आहे, हे अगदी सुरवातीलाच स्पष्टपणे ग्रंथकार सांगतात.
प्रमेहासारखे रोग होऊ नयेत, यासाठी ही जीवनपद्धती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आयुर्वेद म्हणजे कोणतीही ‘पॅथी’ नाही. किंवा हे सांगण्यात सुद्धा कोणताही अहंकार नाही. सुदैवाने आपल्या या संपूर्ण स्वदेशी शास्त्राचा अभ्यास करता आला, हे माझे सद्भाग्य. घेतलेल्या शिक्षणपद्धतीचा परिणाम म्हणून काही जणाना आयुर्वेद नाही शिकता आला, म्हणून वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नाही. फक्त तो नीट समजून घ्यावा. वाग्भटजीनी आपल्या ग्रंथाची सुरवातच एका छान श्लोकाने केली आहे. त्यात ते म्हणतात, हे शास्त्रीय ज्ञान मिळवण्यासाठी राग, अहंकार, अभिनिवेश, गर्व, आदि बाजूला ठेवावे. तरच ग्रंथ नीट समजून शिकता येईल. त्यासाठी पूर्वग्रह दूषित दृष्टी बदलायला हवी. अजूनही काही डाॅक्टर आयुर्वेद म्हणजे बोगसगिरी असे ( अज्ञानाने ) म्हणतात.
“देवा, त्यांना क्षमा कर, ते काय बोलत आहेत, ते त्यांचे त्यांनाच कळत नाहीये.”
आणि आयुर्वेदाचे काही (ज्ञानी ) पदवीधर सुद्धा आयुर्वेदाचीच थट्टा करतात, त्यांची तर किव करावीशी वाटते.
असो.
काल परवा काही जणांनी वैयक्तिकरीत्या विचारलेल्या शंकाना सार्वजनिकरीत्या उत्तर द्यावेसे वाटले. म्हणून लिहिले.
प्रमेहामधे दही नको. या कायद्याला पळवाटीची युक्ती कशी शोधावी हे आपण पाहिले.
काही वेळा असे सांगितले जाते, की एवढी वर्षे आम्ही दही खातोय, आम्हाला काय सुद्धा धाड भरली नाही.? हे कसे ?”
प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. एखाद्या व्यक्तीची काहीवेळा मानसिक ताकद जास्त असते. काहीवेळा आध्यात्मिक शक्ती त्याला मदत करत असतात, त्यामुळे रोग लगेच होत नाहीत. पण जेव्हा यापैकी एखादी ताकद कमी होते, तेव्हा लगेच किंवा कालांतराने त्रास संभवू शकतात. जे शारिरीक त्रास आज मला होत नाहीत, किंवा लक्षणे दिसत नाहीत, ते आजार किंवा रोग भविष्यात होणारच नाहीत, यासारख्या भ्रमात कोणी राहू नये. तसेच प्रमेहासारख्या रोगात कायमस्वरुपी औषध घ्यायलाच लागते, या गैरसमजात देखील कुणी राहू नये.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
30.01.2017
Leave a Reply