दुध उत्तम प्रतीच्या उत्तम गाईचे जरी असले तरी ते पचवायला प्रकृती आणि भूक तेवढीच उत्तम लागते. पुनः आवडायला हवे. आणि अन्य अन्नाची त्यात भेसळ नको.
बालकांची गोष्ट वेगळी. त्यांना अक्कल फुटेपर्यंत आवड निवड तशी कळत नाही. प्रकृती समजत नाही, भूक सणसणीत असते. मातृस्तन्याखेरीज अन्य काही पोटात जात नाही. फक्त दूधच पोटात गेले तरी वय कफाचे असले तरी दूध सात्म्य असते. पचते. पण जसजसे वय वाढू लागते, तशी बालकाची अवस्था बदलते. क्षीराद पासून अन्नाद अवस्था येत जाते. अन्य पदार्थ पोटात जाऊ लागतात. या अन्य पदार्थातील द्रव्यांचा संपर्क दुधाशी येत जातो आणि परिणाम बदलत जातात. जे दूध पचायला सोपे असते, तेच अन्य पदार्थांच्या उपस्थितीमुळे पचायला जड होत जाते. आणि अग्निमांद्य निर्माण होते.
जलोदरासारख्या आजारात, अनुभवी वैद्यांकडून रुग्णाला केवळ गाईच्या दुधावर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. तो याच कारणासाठी. अन्य कोणत्याही स्वरूपाची भेसळ दुधाशी होत नाही. त्यामुळे नुकसान न होता फायदा होतो. पण आज आपल्या खाण्यामधे एवढी भेसळ होत चालली आहे की, दुधाला पचल्यानंतर आपले गुण दाखवण्यापुरतेसुद्धा शुद्ध रहाता येत नाही.
गाईचे दूध अमृततुल्य म्हणजे अमृताप्रमाणे असते. कितीही झाले तरी आईसारखे असणे आणि आई असणे यात फरक आहेच ना ! तसेच गाईचे दूध कितीही अमृतासारखे असले तरीदेखील मीठाच्या चिमटीने अगदी गाईचे दूध सुद्धा नासतेच ना. तसेच आहे.
प्रमेह नावाचा मुख्य आजार. त्याचे वात पित्त कफानुसार वीस प्रकार. त्यातील वाताच्या चार प्रकारापैकी एक मधुमेह. एवढी रोगाची व्याप्ती असताना आज फक्त टाईप ए आणि टाईप बी म्हणून विषय सोडून देऊन चालणार नाही ना.
प्रकृतीनुसार, रोगाच्या लक्षणानुसार, मधुमेहाच्या उपप्रकारानुसार रोग्याचे पथ्यापथ्य आणि औषध बदलत जाते. आणि याचा योग्य निर्णय केवळ वैद्यच घेऊ शकतो.
व्यवहारामधे बालक आणि योगी तपस्वी यांच्या खेरीज इतरांना दूध पूर्णान्न नाही, हे पक्के लक्षात ठेवावे. त्यांना जगण्यासाठी अन्य आहारीय पदार्थांचा समावेश आवश्यक आहे. बुद्धिमान मुले बनवण्यासाठी मुलांच्या इच्छेविरुद्ध त्यांना दूध देऊ नये. आज नको ते फॅड आले आहे. दुध पचायला जड तर आहेच त्यात आणखी बदाम.
म्हणजे गर्भावस्थेत काही पथ्यापथ्य पाळायचे नाही, आणि पोरांच्या पोटावर नंतर अत्याचार करायचे. असो. हा वेगळा विषय होईल.
जर्सी, हाॅस्टीन एचएफ या तर गाईच नव्हेत, तर गाईसारखे दिसणारे जंगली, संकरीत, विदेशी प्राणी आहेत. यांचे दूध पिण्यायोग्य तर नाहीच, चहात सुद्धा नको. एकवेळ म्हैशीचे दूध वापरले तरी चालेल, पण हे जंगली, विदेशी प्राणी कधीच नकोत. म्हैशीचे दूध पचायला जड असतेच. पण त्यात सुंठ, मिरीसारखे पदार्थ घालून उकळले तर दोष थोडे कमी होतात.
एखाद्या शरीरात प्रमेह होण्यासाठी पूरक वातावरण तयार केव्हा आणि कसे होते, ते सांगताना दुधाबद्दल ग्रंथकार म्हणतात, दुध आणि दुधाचे पदार्थ यांना जर शरीराने पचवले नाही तर भविष्यात प्रमेहाचा एखादा प्रकार नक्कीच भेटीला येणार.
गाईना रानात फिरवून आणणे, त्यांना चारा पाणी देणे, आंघोळ घालणे, त्यांचे दूध काढणे, त्यांच्या वासरांना खेळवणे, हे सहजपणाने जे करतात, त्यांना दूध सहज पचते. यांनी दूध प्यायला काहीच हरकत नाही. नव्हे यांनी दूध प्यायलाच हवे.
अतिप्रमाणात ज्यांना दूध प्यायची सवय आहे, आणि काम काहीही करणार नाहीत त्यांनी देशी गाईचेच दूध जरी प्यायले, तरी प्रमेहाने धरलेच म्हणून समजा.
दूध पिणाऱ्यांनी गाईंची सेवा केलीच पाहिजे. सेवा इतरांनी करायची, मी फक्त मेवा खाणार, त्याला प्रमेह नक्की होणार.
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
21.01.2017
Leave a Reply