नवीन लेखन...

प्रमुख आहार सूत्र – भाग ६

केवळ दुधच नव्हे तर दुधाचे सर्व पदार्थ प्रमेह होऊ नयेत म्हणून कमी करावेत. खरवस, पेढा, खवा, कुंदा, बासुंदी, रबडी, रसमलाई, पनीर, चीज, बटर हे सर्व पदार्थ जे थेट दुधापासून बनवले जातात, ते तर प्रमेहाचे निमंत्रकच !

दुधापासून बनविलेले हे सर्व पदार्थ पचायला जड आहेत. थोडक्यात बंगाली मिठाई अति खाई तो प्रमेही होई. असे म्हणायला काही हरकत नाही. मग बंगालमधे प्रमेहाचे प्रमाण जास्ती असेल का ? शोधावे लागेल, पण बंगाल या प्रांतात परंपरेने दुधाचे रोशगुल्ले, पनीर इ.पदार्थ वंशपरंपरेने खाल्ले जात असल्यामुळे ते तिथे सात्म्य झाले असावेत.

या पदार्थांमधे वापरली जाणारी साखर ही पण प्रमेहाची सख्खी मैत्रिणच जणु ! आज आधुनिक विज्ञान पण तेच सांगते, साखर हे पांढरे विषच आहे. त्याच्या फारसे पाठी न लागलेले बरे !

अर्थात एकदा हे पदार्थ खाऊन प्रमेह होणार नाही, पण दिवसातून एकदा खाल्ले तर मात्र नक्कीच होईल. त्यातून कफाची प्रकृती आणि पाणथळ दलदलयुक्त प्रदेशी रहाणाऱ्यांना अधिकच सावध रहायला हवे. त्यात भूक कमी असली तर बघायलाच नको. त्यामुळे सावध तो सुखी हेच खरे. सावधपणा पण एवढा नको की मनातून खूप घाबरत घाबरत खाल्ले जात आहे. तरीसुद्धा साखर वाढलेलीच राहाते.

दूध हे मधुर रसाचे वर्णन केले आहे. मधुर रसाच्या गुणांचे वर्णन करताना वाग्भटजींनी सूत्रस्थान अध्याय दहामधे, मधुर रस अति सेवन करणाऱ्या मंडळींना सावधपणे प्रमेहाचा धोका असतो, असा उल्लेख पण करून ठेवलेला आहे.

सद्यो शुक्रकरःपयम् म्हणजे अंतिम धातु (जो शुक्र) उत्पत्ती करणाऱ्या पदार्थात दूध हे सर्व श्रेष्ठ सांगितलेले आहे. उत्तम तर्पक, रसधातुपोषक, वातपित्त कमी करणारे पण कफ दोष वाढवणारे, शीत गुणाचे आणि पचायला जड असते. निरसे दूध, म्हणजे तापवायच्या अगोदरचे दूध पचायला अत्यंत जड असून, अभिष्यंद म्हणजे कफाचा स्राव निर्माण करणारे असते. पण दूध काढल्या काढल्या( म्हणजे धारोष्ण ) घेतल्यास अमृताप्रमाणे असते. पण खूप तापवले असता, पचायला जड होते. (उदा. बासुंदी) हे नीट लक्षात ठेवले पाहिजे. अग्निचा संस्कार बदलला की गुण बदलतात. इतर सर्व पदार्थ अग्निने पचायला हलके होतात तर दूध मात्र अग्निच्या संस्काराने जाड होत जाते, परिणामी पचायला जड होते. बासुंदीचे उदाहरण लक्षात ठेवावे. जसजसे दूध तापवत जावे, तसतसे, ते आटते. घट्ट होते. शेवट खवा बनतो, त्यात आणखी साखर घातली तर पेढा ! त्याच्याही पुढे संस्कार करून दुधाची पावडर बनवतात. आणि नंतर चाॅकलेट आणि मिठाया बनतात. म्हणजे हे अंतिम पदार्थ पचायला किती जड होत जातील याची कल्पना करावी. एका चाॅकलेट बारने काय होणार आहे असे म्हणून, एखादे जरी तोंडात टाकले तरी तो सारा ऐवज, लिटरभर दुधाचा असू शकतो.

पोटावर अत्याचार करणे, म्हणजे यापेक्षा वेगळे काही नाही.

वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021

22.01.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..