काही प्रश्न काही जणांच्या मनात काल उपस्थित झाले………
आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत,
आमचा प्रोटीन्सचा सर्वात मोठा पर्याय म्हणून आम्ही दुधाकडेच पहात होतो,
मग आम्ही असे पौष्टिक दूध पिणे बंद करायचे का ?
असे भावनिक होऊन नाही चालणार ! दूध म्हणजे अमृततुल्य आहे, हे जरी सत्य असले तरी व्यवहार पण लक्षात घ्यावा. दूध पचायला जड असते. टिकाऊ नाही. जरा दुसरा हात लागला तरी नासते, एवढे नाजुक आहे.
लहर आली तर प्यावे. उपास असेल तर प्यावे, भूक चांगली असेल तर प्यावे. पण दूध नियम करून पिऊ नये.
आम्ही सकाळी चहा पिणार, त्यात मैद्याची बिस्किटे बुचकळून खाणार, नंतर भरपेट नाश्ता करणार, दुपारी परत जेवणार, मधे एखाद्या औषधांचा डोस अगर टाॅनिक, अॅण्टी ऑक्सीडंटचा डोस घेणार, आणि विसरलोच, सकाळी चहा अगोदरचा एलोवेरा आवळा करेला ज्युस. दुपारी अगदी वेळेत जेवणार. जेवणानंतर तांब्याभर पाणी पिणार. जेवणानंतर घ्यायच्या औषधी. पुनः त्याच्या बरोबर भांडभर पाणी. नंतर तासभर झोपणार. परत तीन चार वाजता फक्त कपभर चहा. अधे मधे चहा होतो तो वेगळाच. त्यावेळी पुनः म्हणे शुगर फ्री मारी नाहीतर एखादी खारी. दर तीन चार तासांनी खाल्ले नाहीतर म्हणे अॅसिडीटीच वाढते, असं डाॅक्टरनीच बजावून सांगितले आहे, म्हणून सायंकाळी सहा वाजता परत काहीतरी लाईट नाश्ता. मधल्या वेळेचा औषधांचा डोस असतोच. पुनः बाजारात गेलो तर एखादा दाट लस्सीचा ग्लास. नशीब या ग्लासबरोबर अजून तरी चकना नाही . भूक लागल्याशिवाय जेवायचे नाही. हा नियम आम्ही हटकून पाळतो, त्यामुळे भूक लागेपर्यंत रात्रीचे दहा वाजलेले असतात. म्हणून जेवण होते दहा वाजता.! आणि आयुर्वेदात रात्री झोपताना म्हणे दूध प्यायला सांगितले आहे. म्हणून परत झोपताना एखादा ग्लास दूध घेतले जाते. सकाळी उठल्यापासून पोटाचे मशीन चालूच. त्यात फळे भरणे, सॅलेडचा कचरा, हाय प्रोटीनच्या नावाखाली गिळलेले मांस, चवीला छान म्हणून मासे, डब्याची सोय म्हणून गव्हाची चपाती, आणि भरपूर पाणी…….
आणि या डब्याच्या मधली जागा भरून काढण्यासाठी पौष्टिक दुध !!!!!??????
किती अत्याचार करायचे ?
तो जागा आहे, म्हणून निदान पचवतोय आणि आपण हिंडतोय फिरतोय ! एखादा दिवस जरी त्याने काम थांबवले की आजार पाठी लागतातच. दूध अत्यंत पौष्टिक आहे. यात वाद नाहीच. पण जे अत्यंत पौष्टिक असते, ते पचवण्यासाठी अग्निदेखील तेवढाच प्रखर लागतो.
आहे उत्तम गुणाचे म्हणून काय सगळं एकदमच खाल्लं पाहिजे काय ?
ग्रंथामधे जे लिहिलेलं असतं, ते अगदी कडक नियम म्हणून नव्हे तर एक आधार म्हणून लिहिले जाते, काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत.
काही सूत्रांचे भावार्थ, (जसे देव ह्रदयात असतो. )
काहींचे लक्षार्थ, ( आम्ही काही अगदी तसे नाही हो )
काहीचे शब्दार्थ ( मेहनत केल्याशिवाय प्रमेह नत होणार नाही. )
तर काहींचे श्लेष लक्षात घ्यावे लागतात,( माहीतीये किती श्याणा आहेस ते !)
नाहीतर क्लेष होतात.
दिनान्ते पिबेत पयम् हा जो श्लोक सांगितला जातो, तो वैद्यकीय सुभाषितामधला असावा. ग्रंथातला नाही. हा नियम देखील सर्वसाधारण सांगितलेला आहे. सर्वासाठी आहे, असे नाही. त्याचे व्यावहारिक उपयोग वैद्य ठरवित असतो.
आज अॅलोपॅथी डाॅक्टरदेखील, दूध पिताना सायीखालचे दूध प्यावे असे सांगतात. पण या प्रयोगाने शरीरातील सर्व स्निग्धत्व संपून जाते. स्नेह विरहित दूध पिऊन नुसते पोट भरेल, पण पोषण होणारच नाही. मग प्यायचेच कशाला ?
दूध प्यायचेच असेल तर केवळ दूधच पिऊन रहावे. त्यावेळी दुसरे काहीही पदार्थ नको. हे कोजागिरी पौर्णिमेला विशेष लक्षात ठेवावे. भेळ भजी खातखात आटीव मसाला दूध प्यायले तर काय होणार ?
पिताना गोड लागणार, पण पोटात जाऊन नासणार !
मग कसे पचणार ?
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
23.01.2017
Leave a Reply