बालकांसाठी मातृस्तन्य सर्वोत्तम. आईचे नसेल तर दायीचे. नसेल तर गाईचे ! त्याच्यापुढे जाऊन म्हैशीचे दूध प्यायले तर कफ आणखीनच वाढेल. म्हणजे तेही नको.
अजूनही काहीजणांना नेमकेपणाने कळले नाही. दूध प्यावे की नाही ? प्यावेतर दूध कधी प्यावे ?
खरं सांगायचं तर आयुर्वेदीय दिनचर्येमधे तर सकाळी चहा पण नाही आणि दूध पण नको. दिनान्ते म्हणजे सायंकाळी चालेल. पण मग जेवणार कधी ? रात्री झोपतानासुद्धा दूध पिऊ नये. असा स्पष्ट कुठेही उल्लेख नाही. असल्यास लक्षात आणून द्यावा.
काल सांगितलेल्या खाण्याच्या भरगच्च ‘शेड्युलमधे’ दुध प्यायला योग्य वेळ उरतच नाही. म्हणून शहरात रहाणाऱ्यांनी दुधाच्या फंदात न पडलेलेच बरे. त्यांनी सुटीच्या दिवशी तरी धारोष्ण दूध जिथे मिळेल अशा गोशाळेत पूर्ण दिवस जाऊन रहावे. गाईची सेवा करावी. सहवास मिळवावा. गाईच्या पाठी धावावे. त्यांचे शेण गोळा करावे. ग्रंथामधे तर इतके स्पष्ट वर्णन मिळते की, गाईला जव खायला घालावेत. आणि शेणातून पडणारे जव गोळा करावेत. आणि फक्त तेवढेच आहार म्हणून खावेत. पाण्याच्या ऐवजी गोमूत्र प्यावे. प्रमेहामधे गाईचे दूध औषध नाही. उलट मधुमेह वाढतो. एवढे लक्षात ठेवले तरी पुरेल. प्रमेहाच्या सर्व रूग्णांनी आपल्या खाण्यापिण्यातून दुधापासून बनवलेले सर्व पदार्थ( साखर न घालतासुद्धा ) आणि दही बंद करावेत, आणि तीन महिन्यानंतर अनुभव घ्यावा.
आता मधुमेह न झालेल्या लोकांच्या लोकभावना लक्षात घेऊन, दूध कधी प्यायचे हे सांगायचे झाल्यास सकाळी धारोष्ण प्यावे. किंवा सायंकाळी धारोष्ण प्यावे. पण कटाक्षाने पोट रिकामे हवे. त्याआधी किमान दोन ते तीन तास तरी पोटात काही गेलेले नसावे. किंवा दूध प्यायल्यावर पुढे दोन तास काही खाऊ नये. अगदी धारोष्ण नाही मिळाल्यास गरम करून घ्यावे.
जेवणाच्या वेळी दूध घेतले तर पोट भरून जाईल. आणि पुनः विरूद्धान्नाचा दोष लागणारच. रात्रौच्या वेळी प्यायचे तर अग्नि नसताना पिणार म्हणजे पुनः पचनक्रियेवर ताण. तो पण दोष उत्पन्न होतो.
शहरातून विकत मिळणारे दूध हे अनेक गाईंचे एकत्र केलेले, किमान चार ते पाच दिवसापूर्वीचे शिळे, प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवलेले, अतीशीत केलेले असते.
तबेल्यात असणाऱ्या सर्व गाई निरोगी असतीलच, त्या कोणता चारा खात असतील, किती फिरत असतील, याची खात्रीदेखील देता येत नाही. आपल्याला जर निरोगी रहायचे असेल, तर आपण जे खाणार पिणार ते उत्तम प्रतीचे असायला नको का ?
समजलं नसेल तर परत एकदा सांगतो, दूध पचायला जड असते. कफ वाढवणारे असते. पटकन नासणारे असते. म्हणून दूध हे आहारीय द्रव्य म्हणून नको. पण औषधी म्हणून वैद्य सल्ल्यानुसार चालेल. मधुमेह असणाऱ्यांनी दूध पिणे नकोच.
इतरांनी दूध प्यायचेच असेल तर धारोष्ण किंवा सुखोष्ण. थंड फ्रीजमधले तर अजिबातच नको. अॅसिडीटी वाढल्यावर घेतले तर तात्पुरते बरे वाटेलही, पण अॅसिडीटी होऊ नये म्हणून नियमाने असे दूध पित असाल तर भविष्यात कफ आणि वात नक्की वाढणार.
ज्यांना दूध सहजपणे पचते, ज्यांना मनापासून आवडते, त्यांना दूध प्यायचे असेल तर ते हळद, सुंठ, धने, जिरे असे काहीतरी पाचक मसाले घालून प्यावे. जेवण आणि दूध यामधे किमान तीन तासाचे तरी अंतर हवे. नाहीतर पोटात राडा ठरलेला.
इति प्रमेहरोगांतर्गत दुग्धविषय समाप्तः ।
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
24.01.2017
Leave a Reply