२००९ साली माझ्या फार्मवर पहिली गाय आणली गेली. नंदिनी तिचे नांव. खिलार जातीची , देखण्या लांब शिंगांची, शुभ्र पांढरी , उंच , निळ्या डोळ्यांची आणि फार डौलदार. फार्मची शान होती ती. अत्यंत रागीट. प्रथम प्रथम असं वाटलं की सातारा परिसरातून आलेल्या तिला इथले वातावरण आवडलेले नसावे. फार्म सांभाळणाऱ्या मामांशिवाय ती कुणाला जुमानत नसे. मात्र त्यांच्या शब्दांच्या इशाऱ्याप्रमाणे मुकाट वागत असे. तिला अगदी हरणा सारखी अंगावर दुसऱ्या कोणत्याही रंगाचा ठिपकाही नसलेली शुभ्र पांढरी शुभ्र कालवड झाली. दुपारची वेळ. मी व्हऱ्यांड्यात आराम खुर्चीत वाचत बसलो होतो. हे वासरू जेमतेम ३ दिवसांचे असेल. भिंती नसलेल्या पक्क्या शेडवजा गोठ्यात बांधलेले. नंदिनी फार्मच्या दुसऱ्या टोकाला चरत होती. तिची दोरी तिच्या पाठीवर टाकून मामा दुसरे काम करत होते. अचानक नंदिनी गोठ्याकडे चौखूर धावत सुटली. मामाही तिच्यामागे धावले. मीही कोड्यात पडलो. काही जनावर वगैरे पायाखाली तर नाहीं आलं! काही क्षणातच ती वासराजवळ गोठ्यात पोचली. माझे तिकडे लक्ष होतेच. तिचे पिल्लू कोणत्यातरी भीतीने अक्षरशः थरथरत होते . नंदिनी गायीने मानेनेच त्याला जवळ ओढून घेतले होते. ती त्याच सर्वांग चाटत होती. हळू हळू वासराची थरथर कमी झाली.
मला अचानक उलगडा झाला. फार्मच्या मागे असलेल्या वाडीत त्या वेळी पाच सात कुत्र्यांचा कोलाहल सुरू होता. कुत्र्यांचे भुंकणे तेही असे कर्णकर्कश्य त्या वासराने प्रथमच ऐकले आहे आणि ते घाबरले असेल हे त्या आईने क्षणात ताडले आणि तिने त्याच्याकडे धाव घेतली होती . वासरू शांत झाले. खाली बसले. त्याची भीती गेली आहे याची पूर्ण खात्री करून त्याची आई पुन्हा चरायला गेली. आई ती आईच.
अजित देशमुख
(नि) अप्पर पोलीस उपायुक्त,
9892944007
ajitdeshmukh70@yahoo.in
Leave a Reply