१९९६ ला महेश मांजरेकरचा ‘आई’ चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाची कथा ही भावनाप्रधान असल्यामुळे प्रेक्षकांना तो फार आवडला. आमच्या पिढीमध्ये ‘श्यामची आई’ने आम्हाला रडवलं होतं. चार पिढ्यांच्या नंतर आलेल्या या ‘आई’ने विचार करायला लावले.
आई मात्र तशीच प्रेमळ राहिलेली होती, बदलला होता…श्याम!
त्याचं असं झालं, सदाशिव पेठेत असताना मी माझ्या मित्राच्या मानलेल्या बहिणीकडे त्याच्या बरोबर नारायणपेठेत जात असे. ती एका जुन्या वाड्यात रहात असे. ती प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने मॅट्रीक झाली. टायपिंगचा क्लास लावून त्यामध्ये तिनं प्राविण्य मिळवले. एम्प्लाॅयमेंट एक्सचेंज मध्ये नाव नोंदविल्यामुळे तिला सरकारी नोकरीसाठी लगेच काॅल आला. नोकरी लागली आणि तिची गाडी रुळावर आली.
तिच्या नातेवाईकांनी चांगलं स्थळ पाहून तिचं लग्न लावून दिलं. राजा राणीचा संसार सुरू झाला. नवराही सरकारी नोकरीतच होता. हिने काटकसरीने संसार करताना बचत करीत राहिली. भाड्याच्या घरात राहताना तिने स्वतःच्या सुंदर घराचं स्वप्न पाहिलं.
लग्नानंतर दोन वर्षांतच श्यामचा जन्म झाला. तिच्या जीवनाला पूर्तता आली. त्याचं बालपण अनुभवताना ती नोकरी करीत राहिली. प्रसंगी पाळणाघरात ठेवून तिने नोकरीला प्राधान्य दिले.
तिच्या पतीच्या शहरातल्या जवळपास बदल्या होत होत्या. घर आणि श्यामला सांभाळून ती सुखी संसाराची स्वप्ने पहात होती. श्याम हुशार असल्याने त्याचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण यशस्वीपणे पार पडलं.
श्यामच्या आई वडीलांनी बचतीतून जागा घेऊन घर बांधायचे ठरवले. त्यासाठी कर्ज काढून बांधकाम सुरु केले. वर्षांतच छान बैठं घर तयार झाले. तिघंही तिथं आनंदाने राहू लागले.
आता प्रश्र्न होता श्यामच्या पुढील शिक्षणाचा! त्याने इंजिनिअरिंगला जायचं ठरविले. पुन्हा पैशांची जुळवाजुळव करुन त्याला काॅलेजला घातले. श्यामला त्याच्या मेरिटमुळे स्काॅलरशिप मिळाली. त्याने चिकाटीने आपले शिक्षण पूर्ण केले. श्यामच्या आई वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
श्याम जात्याच हुशार असल्यामुळे त्याने इंजिनिअरिंगचे क्लासेस घेणं सुरु केलं. घरातील हाॅलमध्ये तो विद्यार्थ्यांना शिकवू लागला. शिवाय अनुभवासाठी तो नोकरीही करु लागला. दरम्यान त्याच्या आईची दुसऱ्या शहरात दोन वर्षांसाठी बदली झाली.
त्याच्या क्लासला येणाऱ्या विद्यार्थ्यांमथून एका सुंदर मुलीने श्यामचे ‘लक्ष’ वेधून घेतले. काही दिवसांतच श्याम त्या राधेमध्ये गुंतून गेला. क्लासनंतर राधा श्यामचा ‘क्लास’ घेऊ लागली. वडिलांना याची काहीएक कल्पना नव्हती.
आई परत येईपर्यंत श्याम आणि राधाने लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. आईने श्यामविषयी जी स्वप्नं पाहिली होती, त्याचा चक्काचूर झाला. ती आजारी पडली. श्याम काही मागे हटायला तयार नव्हता. ती आजारी असतानाच त्याने रजिस्टर लग्न केले. मनाविरुध्द सून आणल्यामुळे दोघंही नाराज झाले.
श्यामने परदेशातील नोकरीचा प्रयत्न केला, लगेचच ती त्याला मिळालीही. आई वडिलांनी पैसे उभे केल्यावर दोघं नवपरिणीत जोडपं पंख पसरून निघून गेलं. हा श्याम आधुनिक पिढीतील असल्याने ‘प्रॅक्टिकल’ होता. त्याला आई वडिलांना सोडून जाताना काहीएक वाटले नाही. कर्तव्य, जाण, श्रद्धा, कृतज्ञता हे शब्द त्याच्या शब्दकोशात नव्हतेच…
भारतात हे दोघंही वर्षभर श्यामची वाट बघत रहायचे, तेव्हा कुठे आठ दिवसांसाठी श्याम पत्नीसह यायचा. राधा माहेरीच रहायची. श्यामच्या आईला खूप वाईट वाटायचं, पण ती मूकपणे सर्वकाही सहन करीत राहिली.
वर्ष एकापाठोपाठ एक जात होती. श्यामने परदेशातील नोकरीमध्ये भरपूर पैसे कमविले. मोठं घर, गाडी, इ. सर्व सुखं ‘विकत’ घेऊन तो आता श्रीमंत झाला. श्याम व राधेला मुलगा झाला. तिघांनाही परदेशातीलच नागरिकत्व मिळालं.
नातू झाल्याचं श्यामच्या आईला समजलं, पण तिला आजीपण काही मिरवता आलं नाही. श्यामचे वडील निवृत्त झाले. आईनं व्हीआरएस घेतली. दोघं एकमेकांना समजून घेत उरलेलं ‘उत्तरायण’ जगत राहिले..
वर्षातून एकदाच येणाऱ्या श्यामसाठी त्याची आई दिवस मोजत राहिली. श्यामचे वडील वरचेवर आजारी पडू लागले. एकदोनदा हाॅस्पिटल झालं. श्यामचं अशावेळी जवळ असणं महत्त्वाचं होतं, पण राधा ते होऊ देत नव्हती. तिने या कालावधीत आई, वडिल, भाऊ, बहिणीला परदेशात आपल्या सोबत ठेवले. श्याम तिच्या निर्णयापुढे काहीही बोलू शकत नव्हता.
एक दिवस श्यामच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. श्याम निर्विकारपणे आला, कार्य पार पाडलं आणि निघून गेला. आईला आता त्या घरात करमेनासं झालं. तिनं ते घर विकण्याचा निर्णय घेतला. त्या घराची आलेली मोठी रक्कम तिनं बॅंकेत ठेवली व भाड्याने घर घेऊन ती राहू लागली…
आज श्याम परदेशात कुटुंबासह रमलेला आहे. त्याची आई अजूनही तो परदेशातील नोकरी सोडून कायम स्वरुपी भारतात येईल या समजूतीत दिवस काढते आहे…
सुरुवातीला ‘आई’ चित्रपटाचं उदाहरण अशासाठी दिलं की, श्यामला, स्वतः मातृभक्त नसताना हा चित्रपट फार आवडला. त्यामध्ये ‘आई’ची भूमिका करणारी नीना कुळकर्णी त्याला जवळची वाटली. तिची करारी भूमिका त्याच्या मनावर ठसली. मित्राने माझी श्यामशी ओळख करुन दिली व ‘आई’ चित्रपटाचं मी काम केल्याचं सांगितलं. त्यावरुन श्याम मला विनंती करु लागला, ‘काका, मला नीना कुळकर्णीला भेटायचंय.’ त्यावेळी ‘ध्यानीमनी’ या नीनाच्या नाटकाचे प्रयोग लागत होते. मी बालगंधर्वांला प्रयोग असताना श्यामला घेऊन गेलो. मध्यंतरात श्यामची व नीनाशी भेट घालून दिली.
श्यामने तिची ‘आई’मधील भूमिकेबद्दल भरपूर स्तुती केली व एकदा घरी पाहुणचारासाठी येण्याचा तिला आग्रह केला. नीनाने मात्र नम्रपणे श्यामला नकार दिला…
जणूकाही तिला श्यामचा खोटेपणा अंतर्ज्ञानाने कळला होता…जो आपल्या ‘सख्या आईला’ सोडून पडद्यावरील आभासी आईला ‘आपुलकी’ दाखवत होता….
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२९-९-२०.
Leave a Reply