पुढे पडणाऱ्या प्रत्येक पावलाला एक लयबद्ध ताल आहे
जाणिवेच्या तेवत्या ज्योतीला भावनेचं संतत तेल आहे
जीवनाच्या अभंगाला, मनाच्या मृदुंगाला आईचा स्पर्श आहे
हरएक श्वासात, प्रत्येक निश्वासात आईचा आभास आहे
मनाच्या पापुद्रयांना जपणारा नितांत विश्वास आहे
हृदयाच्या स्पंदनांना, काळजाच्या वेदनांना, आईचा स्पर्श आहे.
आयुष्याच्या विवंचनांची, विटंबनांची, कुचंबणांची चढाओढ आहे
निर्ढावलेल्या पाषाणशिळांना उद्धाराची आतुर ओढ आहे
आश्वस्त मनांना, जीवनाच्या कणाकणांना आईचा स्पर्श आहे
आईच्या बोटाने आखलेली आयुष्याची दिशा आहे
आधारवडाच्या पारंब्यांना नित पालवणारी आशा आहे
जीवनाच्या पतंगाला, दिशाबद्ध विहंगाला आईचा स्पर्श आहे
हर आव्हानाला भिडण्याची, जिंकण्याची पैजा, आस दुर्धर आहे
विजयी उन्मादपण नि पराभूत मन सामावणारे मायेचे पदर आहेत
खदखदत्या हास्यांना, गदगदत्या हुंदक्यांना आईचा स्पर्श आहे
भावविश्वांना पेलणारे, हलतेझुलते असंख्य पूल आहेत
गर्भारमातीत फोफावणारी मनोरम स्वप्नांची हूल आहे
भावनांच्या कढांना, घशातल्या आवंढ्यांना आईचा स्पर्श आहे
काचेच्या देव्हाऱ्यात जतन जीवनमूल्यांचं जीवापाड आहे
महत्वाकांक्षेला बांध आहे सत्याचा नि न्यायाचीही चाड आहे
आमच्या आयुष्याला, मानवी अस्तित्वाला आईचा स्पर्श आहे.
-यतीन सामंत
Leave a Reply