नवीन लेखन...

आज सचिन ४४ चा झाला…

सचिन च्या १०० व्या शंभरीनंतर माझ्यासारख्याच सचिनप्रेमी मित्राने, प्रशांत कुलकर्णींनी लिहिलेला हा लेख….. आज सचिन ४४ चा झाला यानिमित्त…..


सचिन,

खरेतर   पत्राचा मायना लिहिल्यानंतर अ, उ .आ. किंवा  सप्रेम नमस्कार असे लिहिण्याची प्रथा आहे.पण तुला  अ.उ.आ. लिहिण्याचा आमचा अधिकार नाही  आणि सप्रेम नमस्कार लिहिण्याची  औपचारिकता देखील वाटत नाही.तसेच जर असेल तर तू आज ज्या ठिकाणी आहेस त्याचा विचार केला तर पत्राची सुरुवातच खरी तीर्थरूप सचिन अशी उपाधी देऊनच  करायला हवी आणि तुला अहो जाहो करायला हवे. पण तुला माहितीच असेल कि मराठी माणसाची एक खोड आहे कि ज्यांच्या कर्तृत्वा विषयी मनात अपरंपार आदर,श्रद्धा आहे आणि मनात भक्ती आहे त्यांचा उल्लेख ओठांवर एकेरीच येतो.म्हणूनच लता आपली,सुनील आपला आणि सचिनही आपलाच(आम्ही उगाच  अरे पृथ्वीराज व अरे शरद म्हणायला जाणार नाही !)  हे पत्र तुझ्या पर्यंत पोहोचणार नाही हे मला माहित आहे.अरे ,देवाचेच उदाहरण घे न,आपण केलेली प्रार्थना त्याच्या पर्यंत कशी पोहोचते हे माहिती नाही तरीपण आपण प्रार्थना करतोच ना?त्याला तर आम्ही पहिले देखील नाही.

पण उसका कोई गम नाही.कमीत कमी क्रिकेट च्या या देवताला निदान आम्ही खेळताना पाहिले  तरी आहे.नुसते पाहिले  नाही तर तुझी अक्खी कारकीर्द आमच्या डोळ्यासमोर घडली आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सचिन, खरेतर तू खेळतच राहावे असे वाटते.मधल्या काळात तू जेव्हा दुखापतीने संघात नसायचा ना तेव्हा आईशप्पत match  बघावाश्या वाटायच्या नाहीत.निवृत्त होण्याचा  निर्णय तू योग्यवेळी घेशील याची खात्री आहे.पण कधीही हातात bat न  घेतलेले जेव्हा  तुला सल्ला देतात ना तेव्हा राग नाही येत पण त्यांची कींव  करावीशी वाटते .पण आपल्या कारकिर्दीची शेवटची दोन वर्षे फक्त रिचर्ड hadlee चा विक्रम मोडण्यासाठी खेळत राहणारे  कपिल देव सारखे खेळाडू जेव्हा तू  वर्ल्डकप नंतर निवृत  व्हायला पाहिजे होते असे म्हणतात तेव्हा मात्र दुखं  होतं  रे! १९८९ साली तू सर्वप्रथम आंतर राष्ट्रीय क्रिकेट खेळलास .त्याला उणीपुरी २३ वर्ष झाली. या तेवीस वर्षात जगात किती घडामोडी झाल्या रे? बर्लिन ची भिंत पडून दोन्ही जर्मनी एकत्र आले(Nov १९८९). तर तिकडे सोविअत युनियन चे विघटन होऊन पंधरा नवीन राष्ट्रे  जन्माला आली.

अमेरिकेमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर वर  हल्ला झाला. जगाचे जाऊन दे.भारताचे उदाहरण घे.आपल्या देशातच किती बदल झाले.तुझी कारकीर्द सुरु झाली ती राजीव गांधी यांच्या काळात.नन्तर वी.पी,सिंघ.नरसिंहराव ,अटल बिहारी वाजपेयी  ,मनमोहन सिंघ पर्यंत पंतप्रधान होऊन गेले .९२ ला बाबरी मस्जिद पाडल्या गेली त्याचे पर्यवसान मुंबई दंगलीत झाले.त्यानंतरच्या मार्च मध्ये मुंबई मध्ये बॉम्बस्फोट झाले,कारगिल घडले,मुंबई वर पुन्हा अतिरेकी हल्ला झाला (त्यावेळच्या तुझ्या शतकाने देशवासीयांच्या जखमांवर थोडी तरी फुंकर घातल्याचे समाधान मिळाले होते ).देशात mobile ,इंटरनेट क्रांती झाली  तरी पण तू आपला खेळतोच आहेस.तुझा पहिला सामना दूरदर्शन वर बघणारे आणि कानाला transistar लावून कॉमेंट्री ऐकणारे  आम्ही आज ipad वर तुला खेळताना पाहिजे तिथून पाहू शकतो.तीही सोय नसेल तर बॉल टू बॉल  कॉमेंट्री बघू शकतो.बाय द वे ,तुझ्या त्या पहिल्या सामन्याच्या च्या क्लिप्स कुठे बघायला मिळतील का?दूरदर्शनने  त्या सांभाळून ठेवल्या असण्याची सुतराम शक्यता नाही.(मागे आपल्या वसंतराव देशपांडे यांचे” कट्यार काळजात घुसली” हे अजरामर नाटक दूरदर्शन वर दाखवले होते पण वसंतरावांच्या निधनानंतर त्याविषयी चौकशी केली असता त्या नाटकाच्या टेप वर दुसरा कार्यक्रम टेप केल्याचे ऐकल्यावर आम्ही असेच हळहळलो  होतो ) .तुझ्या बरोबर क्रिकेट  खेळलेले श्रीकांत,वेंगसरकर,किरण मोरे  निवड समितीचे अध्यक्ष झाले.

रवी शास्त्री ,संजय मांजरेकर,नवजोत सिंघ सिद्धू   सारख्यांनी आपली सोय कॉमेंट्री box   मध्ये केली.काहीजण निवड समितीवर गेले.सुंदर दास,रमेश,आकाश चोप्रा हे तुझ्या समकालीन खेळाडू आठवतात का हा प्रश्न मी तुला विचारणार नाही….नाहीतर ती लिस्ट फार मोठी आहे.आमच्या वैयक्तिक आयुष्यात सांगायचे झाले तर  अगदी क्रांतिकारी जरी  नाही तरी आम्ही  तारुण्यातून  पदार्पण करून,लग्न,संसार मुलेबाळे असा सर्वसामान्या  सारखा प्रवास झाला तरी पण तू आपला खेळतोच आहेस. एक काळ असा होता कि सुनील गावस्कर नंतर कोण हा प्रश्न आम्हाला  पडला होता.(आम्हाला सतत प्रश्नच पडत असतात उत्तरे तुम्ही शोधायची असतात !.) पण तू आलास आणि आमचे भावविश्वाच  बदलून टाकलेस .क्रिकेट कशासाठी बघायचे तर सचिन साठी असा विश्वास निर्माण केलास.तुझी प्रत्येक खेळी डोळ्यात साठवून ठेवली आहे.मैदानावरचे तुझे अस्तित्व आमच्या साठी पुरेसे असायचे.

२३ वर्षात तुझ्याही आयुष्यात अनेक चढ उतार आले पण तू  प्रत्येक वेळी त्यातून तावून सुल्खाउन बाहेर पडलास.तुझ्यावर टीका झाली पण तू वायफळ बडबड करून कधीही उत्तर दिले नाहीस.तुझ्या प्रत्येक खेळीने आमच्या अपेक्षा वाढवल्यास आणि कधी कधी जेव्हां तू खेळून जिंकून द्यावे असे वाटत होते (तसे प्रत्येक वेळीच  वाटायचे)तेव्हा तू आउट  झालास कि आम्ही निराश व्यायचो.ही निराशा फक्त तू निर्माण केली होतीस.बाकीचे १० जण  असताना फक्त तू खेळावेस ,तुझे शतक व्हावे ,तू भारताला जिंकून द्यावे,शेवटचा विजयी फटका तू मारावास,तुझ्या   golden  आर्म  मधून प्रतिस स्पर्ध्याची जोडी फोडावी .ह्या सर्व सवयी तू आम्हाला लावल्यास. आता तुझा निवृत्तीचा क्षण जवळ येऊन ठेपलाय.योग्यवेळी तू निर्णय घेशीलच. जशी एव्हढे वर्षे तुझ्या असण्याची सवय होती तशी नसण्याची पण होईल.पण खरे सांगतो ज्या क्षणी मैदानावरून तू निरोप घेशील तेव्हा आमच्यासारखे तुझ्यावर प्रेम करणारे लाखो ,करोडो चाहते यांचे  परत सचिन मैदानावर दिसणार नाही  केवळ ह्या कल्पनेनेच  डोळे पाणावलेले असतील.भारतीय क्रिकेट ला तू जे काही भरभरून दिले आहेस ते सर्व ज्ञात आहे पण आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यात तू  अनेक आनंदाचे क्षण दिले आहेस,आमची दुखे विसरायला एक बहाणा दिला आहेस .

संकटसमयी खचून जायचे नाही आणि आनंदाच्या  जल्लोषात चढून जायचे नाही हे तू आम्हाला शिकवलेस.ज्याने आमचे आयुष्य समृद्ध झाले आहे.तुझे इतरांशी आदरयुक्त  वागणे ,विनम्र स्वभाव,विचापूर्वक बोलणे,संयमित प्रतिक्रिया व्यक्त करणे,खेळाप्रती निष्ठा,गर्वाचा लवलेशही नसणे,कुटुंबाप्रती प्रेम या सर्व गोष्टीने तुला आभाळा एव्हढा मोठे केले आहे.तुझ्या नंतरही क्रिकेट चालू राहिल.नवीन चांगले खेळाडू येतील.भारताला जिंकून देतील.पण दुसरा सचिन होणे नाही.तुझी उणीव हि कायम भासत राहणार.

वर्ल्ड कप जिंकणे हे केवळ तुझेच स्वप्न नव्हतं तर सारया  भारतीयांचं ते स्वप्न होतं.पण तो वर्ल्ड कप  फक्त सचिनच  आणू शकतो वा  सचिननेच  तो आणावा अशीच  त्यांची इच्छा होती .२००३ साली साउथ  आफ्रिके मधील अंतिम फेरी पर्यंत पोहोचून हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याचे शल्य तुझ्याप्रमाणे आम्हालाही होते .(अशी किती शल्य उराशी बाळगायची? तुझ्या कप्तानी मध्ये वेस्ट इंडीज मध्ये दुसऱ्या डावात जिंकायला केवळ १२० धावा हव्या असताना आपला ८० धावत खुर्दा उडाला ते की  पाकिस्तान विरुद्ध चेपॉक वर तुझी झुंजार खेळी केवळ १२ धावांनी  कमी पडली आणि आपण ती कसोटी हरलो ती !) पण वर्ल्डकप भारताला फक्त सचिनच मिळवून देऊ शकतो हा त्यांचा तुझ्या प्रती असलेला स्नेहपूर्ण विश्वास होता.गेल्यावर्षी तू तो मिळवून दिलास.

भारताला अंतिम फेरी पर्यंत पोह्चोवण्याचे काम तू केलेस नि मग युवराज,गंभीर,धोनी ने पुढील कामगिरी फत्ते करत तुझ्या वर्षानुवर्षे उरी बाळगलेल्या स्वप्नांची पूर्तता केली.त्यादिवशी प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने,गर्वाने ताठ उभी होती आणि आम्ही जगाला सांगत होतो की होय आम्ही विश्वविजेते आहोत. गेली २३ वर्षे करोडो भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे तू आपल्या खांद्यावरून वाहिले आहेस.पण या  प्रवासात सर्वात जास्त ओझ्याचा भार वाटला असेल तर तो तुझ्या शतकांच्या  शतकाचा ! जवळ जवळ वर्षभर तू हे ओझे वाहत होतास.चार पाच वेळा तिथपर्यंत पोहोचूनही शतकाची वेस ओलांडू शकला  नाही.सचिन संपला,सचिनने आता निवृत व्हावे असे (बे)सूर निघायला लागले पण तू तुझ्या फॉर्म च्या बाबतीत ठाम होतास,चेंडू व्यवस्थित bat वर मिडल होत होता,पायाच्या हालचाली पण व्यवस्थित होत होत्या फक्त नशीब साथ देत नव्हते.हे सर्व योग परवा बांगला देश मध्ये जुळून आले आणि मिरपूर ला तुझ्या शतकांचे शतक झळकले.भारतात खुशीची लहर झूम उठी.प्रणवदांचा अर्थसंकल्प बाजूला पडला.

टीकाकार भाट बनून गोडवे गायला लागले.तसे बघायला गेले तर दरवर्षी येणाऱ्या पावसा सारखा हा अर्थसंकल्प.ज्याने आमच्या आयुष्यात करवाढी शिवाय फारसा फरक पडत नाही.पण  महागाई च्या झळांनी अगोदरच होरपळून निघालेल्या सामान्य जनतेच्या चेहऱ्यावर एखादी तरी स्मितरेषा तुझ्या शतकाने मात्र  जरूर उमटली असेल.घरात गोड धोड करायला ,सेलिब्रेशन साठी एक कारण मिळाले.तुझ्या bat च्या भात्यातून निघणाऱ्या प्रत्येक फटक्यातून धाव होताना आम्ही मनात देवाची प्रार्थना करत होतो,’देवा ,आता यावेळी तरी होऊ दे रे.परत पुढच्या match   मध्ये पहिल्यापासून नको रे ! जीव जातो त्याचा आणि आमचा ! तुझ्या शतकाने  आमच्या जगण्याला एक बहाणा मिळाला आहे.

सचिन नावाच्या गारुड्याची  मोहिनी आम्हा भारतीयांच्या मनावर निरंतर राहणार आहे. आणखी शंभर वर्षांनी कोणाला सांगितले तर विश्वास बसणार नाही की २१ व्या शतकात सचिन रमेश तेंडूलकर नावाचे वादळ भारतीय क्रिकेट विश्वात घोंगावले होते…………कारण शतकातून एखादाच  असा शतकवीर सचिन जन्माला येतो.

लेखक : प्रशांत कुलकर्णी – अबुधाबी

संकलन : शेखर आगासकर 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..