“आत” मध्ये कोलाहल सतत सुरु असतात. दरवेळी नव्या सूर्याच्या स्वागताला बाहेरच्या अंगणात जाणं जमतंच असं नाही. तो सूर्यही तसा झाकोळलेलाच असतो. मागच्या परसदारातील किंचित काळोख्या तुळशीवृंदावनापाशी तिचा संयत सूर सापडतो. काल-परवा घडून गेलेल्या, पुसट न झालेल्या काळाच्या गोधड्या पुकारत असतात आणि त्यांच्या घट्ट उबेत बरंच काही पुनःपुन्हा साचत असतं, सापडतही असतं.
” हसणाऱ्या जखमा ” नामक काव्यात्म नांव घेऊन आलेला चित्रपट बघायलाच पाहिजे या श्रेणीतला त्या काळात वाटला नाही. नवीन निश्चल ( ” व्हिक्टोरिया”, “सावन-भादो” आणि आता आताचा “आ अब लौट चले “) किंवा प्रिया राजवंश (“हकीकत “, “हीर -रांझा” आणि शेवटची उतरणीला लागलेली ” कुदरत ” मध्ये दिसलेली ) ही जोडी अभिनयाच्या दालनात कधीच दिसली नाही. काही निर्मात्या -दिग्दर्शकांच्या मेहेरबानीवर त्यांचे दुकान थोडेफार चालले. बलराज साहनी हा बलदंड सहकलाकार जरूर होता पण तो नेहेमी कोपरा धरून राहणारा- रंगमंचाच्या मध्यभागी सेंटर -लाईट चा झोत त्याच्या वाट्याला क्वचित ! भलेही त्याला चेतन आनंदचा तैय्यार हात लागलेला असो. प्रत्येक लोखंडाचे दरवेळी सोने करणे परिसालाही जमत नाही. तेव्हा “हसते जख्म ” हा चित्रपट केव्हातरी पाहिला तो बघण्यासाठी नाही तर “ऐकण्यासाठी “. त्यांतील आपली जीवापाड आवडती गाणी किती भंगार पद्धतीने ( विशेषतः “आज सोचा तो आंसू भर आए “) चित्रित करण्यात आली आहेत हे बघून डोकं कामातून गेलं. त्याकाळच्या असंख्य वेदनादायी अनुभवातील हा एक – असे बरेच चित्रपट संगीत-गायकीवर तरून गेलेले , पण आतील ऐवज पोकळ )
आयुष्याच्या काठावर बसून मागे डोकावलेलं हे गाणं – किंचित स्थिर आणि भोगलेला स्वर ! तक्रार नाही, पण हातातून बरंच निसटून गेलंय याची नोंद घेणारा . बरं, कोणाला दोषही न देणारा – स्वतःच्या घावांवर स्वतःची हळूवार फुंकर मारणारा ! पण आपण श्रोते अजून त्या नदीच्या पार गेलेलो नाही, ” सुखदुःखें समे ” वाले व्हायला अजून खूप पोहून जायचंय . आपले डोळे दरवेळी ओलावणारच ! तेवढी विश्वासार्हता मदन मोहन , लता आणि कैफी आजमी यांनी कमावलेली – त्यांना कसं खोटं पाडायचं ?
आणखी एक पाऊल पुढे टाकलेला गुलज़ार – ” दिल ढुंढता हैं फिर वही ” वाला आणि शेवटचा निरिच्छ टप्पा मुकेशचा ” जाने कहाँ गये ” ! पुढे काही नाही. पण सगळीकडे “काल” चा शोध ! म्हणजे पुन्हा परसदार, तुळशीवृंदावन आणि उबदार गोधडी !!
हसून खरंच “मुद्दते ” झाली. ज्या सवंगड्यांबरोबर अधाशी हसलो,त्यांनी एकेक पाय काढता घेतला. आता हसायचं कोणासाठी आणि कोणाबरोबर ? हास्य प्रयत्नपूर्वक आणावं लागतं, अश्रू आपोआप येतात. “आज सोचा ” या गाण्यातले तिचे सवंगडी कधीच गेले. मागे राहणाऱ्याचे संचित लता आता भोगतेय.
आयुष्य जगण्याची कारणे शोधताना आपल्याला कदाचित भलीथोरली यादी मिळेल पण त्यांत लताचा स्वर हे एक नक्कीच असेल.
मदन मोहनच्या आयुष्यापेक्षा त्याच्या गीतांचे आयुष्य अधिक ठरले कारण त्यात मदनमोहनने ईश्वरदत्त वेदनेमध्ये स्वतःची वेदना मिसळली. वेदनेचे सूर दैवी असतात हे लतापेक्षा अधिक कोण हुकमी पटवून देणार? मग सगळी दैवी लेणी ल्यालेली मंडळी ( मदनभैय्या, दीदी, कैफी, आणि उस्ताद रईस खान यांची सुरुवातीपासूनची अखेरपर्यंत वाटचाल करणारी सतार) एकत्र आली तर —— ! त्यांत दृष्ट लागू नये म्हणून वर वर्णन केलेली ” मानवी” कलावंत मंडळी सामील झाली एवढेच.
मैफ़ील सोडून आल्यावर मागे वळणे “सहज” असते पण तेथील विषण्ण करणारे चित्र अधिक दुःखदायी – गज़ल हा एकमेव काव्यप्रकार त्याला कवेत घेऊ शकतो. आणि हे दुःख लपवता लपवता पुरेवाट होते. कधीतरी ते अगोचर डोळ्यांचे बांध फोडून बाहेर येते आणि हृदयाच्या “नाजूक ” तारा वेदनेने झंकारत राहतात. ” याद इतना भी ” वर आपली हुकूमत थोडीच असते ?
पूर्वीच्या काळी वस्त्रांचे मूल्य वाढविण्यासाठी सोन्या चांदीची “जर” घातली जायची. पैठणी जीर्ण झाली की, ती जाळून मग हे अमूल्य धातू बाहेर काढले जात. आपल्या वस्त्रांमध्ये लताचे असे जरतारी स्वर जागोजागी लपलेले आहेत. आयुष्य बोहारणीला देण्याच्या लायकीचे झाले की ते कवडीमोलाने विकत घेणारी ती बोहारीणच खूप श्रीमंत होईल कारण असे किती तरी सोन्या चांदीचे धागे तिला आपल्या जीर्ण / कोत्या वस्त्रांमध्ये गाळल्यावर मिळतील. तोवर ही पडझड आतमध्ये निवांत ! एखाद्या Rajendra Modve यांनी खपली काढली तरच मिरवायची अन्यथा……..
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply