नवीन लेखन...

आजच घ्या; उद्या सकाळी….?!

‘खाण्यासाठी जन्म आपुला’ ते ‘माझे जीवनखाणे’ असा कित्येकांचा प्रवास सुरु असतो. पोटात अन्न अक्षरश: ठोसल्यावर आधी अपचन आणि नंतर बद्धकोष्ठतेचा खेळ सुरू होतो. मग पोट साफ करण्यासाठी सारी धडपड सुरू होते. कोणाच्या तरी आगंतुक सल्ल्याने त्रिफळा चूर्ण, सुखसारक चूर्ण ते एरंडेल अशी वेगवेगळ्या रेचकांची (पोट साफ करणारी औषधे) रीघ लागण्यास सुरुवात होते. त्यातच आयुर्वेदीय औषधांना साईड इफेक्ट्स नसतात हा आपला लाडका गैरसमज. मग काय? आधी दिवस मग महिने आणि मग वर्षानुवर्षे ही रेचके आपली सोबती होतात.

रेचकांचा प्रदीर्घ काळ वापर केल्याने आतड्यांना शुष्कता येते आणि त्यांची कार्यक्षमता घटते. रेचकांचा प्रभाव कमी होऊ लागतो; स्वाभाविकपणे आपण त्यांचे अधिक मात्रेत सेवन करू लागतो. सहा सहा ग्रॅम इतक्या अधिक मात्रेत रेचक सेवन करूनही पोट साफ न होण्याची तक्रार असलेली मंडळी मी स्वतः पाहिलेली आहेत. ही वाढीव मात्रा अधिक घातक ठरत जाते. बाजारात मिळणाऱ्या जवळपास ९९% रेचक चूर्णात सोनामुखी ही वनस्पती वापरलेली असते. या सोनामुखीच्या प्रदीर्घ वापराने बरेच दुष्परिणाम होतात. विशेषतः ही वनस्पती पित्ताचे त्रास वाढवते. शिवाय सोनामुखीसारख्या वनस्पती गरोदर स्त्री व बाळंतीण यांना देऊ नयेत.

पोट साफ न होणे हे व्यक्तीच्या प्रकृतीबरोबरच आहार आणि पचनक्रिया यांवरही अवलंबून असते. या सगळ्याचा विचार करूनच आपले वैद्य आपल्याला पचन उत्तम होण्यासाठी औषधे आणि पथ्य सांगतात. केवळ पोट साफ होऊन मनाचे समाधान होण्यासाठी नव्हे. शिवाय; कुठल्या व्यक्तीला कोणते रेचक, किती मात्रेत आणि किती काळ द्यावे याचे काटेकोर नियम आयुर्वेदीय वैद्य पाळत असतात. त्यामुळे बद्धकोष्ठासारख्या तक्रारीवर स्वतः किंवा अन्य कोणाही व्यक्तींच्या उपटसुंभ सल्ल्याने औषधे न घेता शुद्ध आयुर्वेदीय उपचार देणाऱ्या वैद्यांचा सल्ला घ्या.

सहज जाता-जाता; आयुर्वेदानुसार अपान वायूवर घेण्याचे औषध हे जेवणांच्या आधी दिले जाते. रात्री झोपण्यापूर्वी दिलेले औषध हे उर्ध्वजत्रु म्हणजे डोक्यावर कार्य करते असे आयुर्वेद सांगतो. आपण वैद्यकीय सल्ल्याविना घेत असलेले रेचक चूर्ण एकीकडे पोट साफ करत असतानाच दुसरीकडे नेमके कुठे कार्य करत असेल याचा विचार (वैद्यांनीही) अवश्य करावा!!

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५ 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..