नवीन लेखन...

आजारपण.. नको रे देवा !

काही जुने किस्से सांगणार होते; पण फ्रेश स्टॉकसुद्धा तयार झालाय! …म्हणजे काय.. तर कोरोनातून अगदीच उठतोय आम्ही..!

हा आजारपणाचा अनुभव माझ्या मुलींसाठी खास होता. गेली दोन वर्षे घरात सुरक्षित राहून साधा सर्दी खोकला सुद्धा मुळी नव्हता, आणि आता झालं ते एकदम सगळंच! शिशुवर्गांत जायला लागल्यापासून अगदी नेमाने २-३ महिन्यांतून एकदा दोघी किंवा दोघींपैकी एक, कसलंसं इन्फेक्शन घेऊन यायची, आणि मग सगळं घर झोपायचं..! …सांगते! 🙂

जी इन्फेक्टेड आहे तिला क्वचित डायरेक्ट ताप यायचा, किंवा नाक गळू लागलंय, पोट बिघडलंय, यापैकी काहीतरी असायचं. मग तिला घरी आणि दुसरी पासून वेगळं ठेवायचं. दुसरी शाळेत, बाहेर क्लाससाठी किंवा खेळायला आपली आपण जायला तयार नसायची. पण तिला शिकविण्याची हीच संधी आहे, हे लक्षात घेऊन, “तू किती शूर आहे! एकटीने खेळायला, नव्या लोकांशी बोलायला, मैत्री करायला, तुला आवडतंच! शिवाय ही आता झोपूनच आहे, तू शाळेत जाऊन शिकून ये, म्हणजे आपल्याला हिला शिकवता येईल..” अशा कल्पनांनी (कोणत्याही नकारात्मक शब्दाचा उच्चारही न करता) तिची तयारी करायची. ती मनापासून बाहेर गेली की मग संपूर्णपणे आजारी बाळाकडे लक्ष द्यायचं. हे साधारण २-३ दिवस चालतं. कारण कितीही जपलं तरी तोवर दुसरीला इन्फेक्शन मिळतंच. पहिलीचा ताप वगैरे उतरू लागेपर्यंत दुसरीची गाडी बरोब्बर तिथूनच सुरू होते. प्रकृती प्रमाणे काही लक्षणं वेगळी असतात, पण मूळ आजार तोच असल्याने तेच सगळं होतं. पाच वर्षांपर्यंत अजून एक अवघड गोष्ट व्हायची ती म्हणजे, रात्री त्यांना नीट झोप यायची नाही. कदाचित सुरक्षित वाटत नसावं, त्यामुळे मला त्यांना उभं धरून फेऱ्या मारायला लागायच्या, किंवा रात्रभर माझ्या मांडीत बसून मला धरून त्या झोपायच्या. त्यामुळे पाहिले चार दिवस एक आणि मग दुसरी, असे आठ दिवस रात्रभर बसून बसून माझी पाठ नि कंबर मोडून जायची. झोपेचं काय, दुपारी त्यांच्याच बरोबर झोपून पुरी करत असे. पण दुसरी बरी होईतोवर मात्र व्हायरसनी माझाही ताबा घेतलेला असे. आणि नेमकं तोपर्यंत पहिलीची recovery phase सुरू झालेली असायची! त्यामुळे आजारपणात जे अन्न-पाणी नको नको असायचं, ते आता दुपटी-तिपटीने आणि दरवेळी वेगवेगळं लागायचं! एकसारखी एवढी विविधता आणायची कुठून, तेही आपलं डोकं-हात-पाय चालत नसताना! एक मात्र मी याही वेळीं करत राहिले, ते म्हणजे त्यांच्याशी बोलत राहाणे! खोकल्यासाठीचं चाटण करताना सांगायचं, “मी हे काय करतेय, का करतेय, तू बघ हं मी यात काय काय घालतेय.. वास घ्यायला लावायचा.. एकेका पदार्थाची चव घ्यायला द्यायची..” ते आपण ढवळत राहातो तेव्हा त्याचं texture, रंग कसे बदलतात, ते बघायला आवडतंच मुलांना! “चिमटीने घाल, चमच्यात थोडं थोडं घेऊन वाटीत घाल, हळूहळू ढवळ,” हे करूही द्यावं थोडं थोडं.. किरकिर विसरून जातात त्या नादात.. आणि मग छोट्याशा वाटीत एक वेळेपुरतं घालून चाटू द्यावं बसून! त्यांचा वेळ जातो आणि आपली १-२ कामं होतात. हेच इतर कोणताही खाऊ बनवताना, फळं, सॅलड कापून देताना आजारी नसतानासुद्धा करता येतं.

जुळ्या मुलांना, एकट्याने (constructively) वेळ घालवायला आपल्याला शिकवावं लागतं. जुळीच कशाला, घरात एकेकटं मूल जेव्हा वाढत असतं, तेव्हा खास करून त्या घरातल्या आजी-आजोबांना मुलाला एकटं ठेवणं, एकट्याने खेळू देणं अपराधीपणाचं वाटतं. जे करणं खरं तर त्याच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे; कारण आपण सगळ्यांनी कायम त्याला protection द्यायचं नसून, उद्या त्याला स्वतंत्रपणे जगण्यासाठी तयार करायचं आहे.

जुळ्यांना वाढवताना पालक म्हणून आपला स्वातंत्र्य काळ कायमचा संपून गेला की काय, असं राहून राहून मनात येत राहातं; काही पालक डिप्रेशनचे सुद्धा बळी होतात. साधारणपणे दीड-दोन वर्षापासून (म्हणजे मुलं प्ले स्कूल किंवा डे केअरमधे जायला लागल्यापासून) घरात आजारपणाची मालिका सुरू झाली की पाच-सात वर्षांपर्यंत तरी थांबत नाहीत. आडवी मुलं उभी राहू लागली, स्वतंत्रपणे भूक झोप सांगू लागली, म्हणेपर्यंत या आजारपणांनी नाकी नऊ येतात! यांतून आपली कधीतरी सुटका होणार आहे की नाही, असं वाटत राहातं. घरात मदतीला अधिक माणसं असतील तर काम सोपं होतं असं वरवर वाटतं खरं, पण जेवढी माणसं तेवढीच प्रत्येकाची संगोपनाबाबतीतली मतभिन्नता, झाल्यास त्यावरून वादविवाद; आणि मुख्यत्वे प्रत्येकाच्या तब्येतीचा हालहवाल राखण्यात एकूण पाढे पंचावन्नच होतात. त्यामुळे by default पहिली काही वर्षे संपूर्णपणे मुलांसाठीच द्यावीच लागतात. हे करताना मात्र मुलांना स्वतंत्र बनविण्याचं उद्दिष्ट समोर असेल, तर बरीच कामं सोपी होतात. साधं उदाहरण द्यायचं तर पिण्याचं पाणी घेणे. अनेक घरांमध्ये अगदी १२-१३ वर्षांच्या मुलाला देखिल आईने हातात पाणी आणून द्यायची सवय लावलेली असते. ‘फिल्टर हाताशी नाही, किंवा ओतून घेताना सांडेल’, या सबबींवर उत्तरादाखल पर्याय आपण शोधून काढायचे. जेवढ्या लौकर आपण सवयी लावू तेवढ्या लौकर त्या अंगवळणी पडतात हे लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर कितीही वय झालं तरी ‘कोणत्याही बाळाला’ मनापासून मोठं व्हायची इच्छा (आपली कामं आपण करायची) असतेच कुठे! आपण आजारपणातलं एक उदाहरण देते. माझ्या मुलींना दुसऱ्यांदा सर्दी झालेली तेव्हा, म्हणजे १० महिन्यांच्या आसपास (जेव्हा चिमटीत वस्तू पकडण्याची क्षमता नीट विकसित झालेली असते, तेव्हा) मी त्यांना आपलंआपण नाक पुसायला शिकवलं होतं. मुलांचं नाक गळत असताना मी नेहमी तिथे असेनच असं नाही. आणि नाक वाहाणं ही सामान्य गोष्ट असली तरी स्वच्छतेचे अशा प्रकारचे अनेक बेसिक धडे इतक्या लहान वयात देता येऊ शकतात, हे माझं निरीक्षण आहे. आमच्याकडे गंमत म्हणजे कधीकधी दोघी एकमेकींची नाक पुसायची चिंधी पण शोधून हातात नेऊन द्यायच्या, आणि सांगायच्या एकदा अशाच दोघी खेळत असताना एकीने कुठून तरी चिंधी शोधून आणली. इकडे तिकडे पाहिलं, मी दिसले नाही, तशी तिने चिंधी दुसरीच्या हातात सरकवली आणि म्हणाली, “पूssश..” तिच्या दोन्ही हातात ठोकळे होते, तिला सुचेना काय करायचं. तिने एका हातातला ठोकळा फेकून दिला, हिच्या हातातली चिंधी घेतली आणि आपल्या नाकाला लावून पुसून दाखवत म्हणाली, “अशंss पूश!” हाहा.. आणि मग दोघी एकमेकांच्या हातातून ती घाणेरडी चिंधी ओढून खेळत राहिल्या. हे एकत्र खेळणं देखिल पहिल्या काही आठवणींपैकी होतं. हो! त्यांना काही जन्मजात एकमेकांशी खेळता येत नाही काही! एकमेकांशी खेळायला शिकवावं लागतं. आणि अगदी वर्ष-दीड वर्षापर्यंतच काय कधी कधी चांगली दोन वर्षांची होईपर्यंत सुद्धा या मुलांच्या लक्षात येत नाही की शेजारी असलेली आपली प्रतिकृती ही खरंतर आपल्या हक्काची खेळगडी आहे! आहे की नाही गंमत? यावर पुढच्या लेखात सविस्तर सांगेन..

तूर्तास आजारपणाबद्दल बोलतोय, तर ही जुनी आजारपणं आठवता, यावेळी सगळं खूप सुखकर होतं. एकमेकींना इन्फेक्शन दिलंच आम्ही, पण किमान यावेळी दोघी माझ्या अंगावर नव्हत्या! Steamer आपल्या आपण चालू करून समोर बसायच्या (आपल्या आपण त्या वाफ घेऊ लागल्या की मला जाम धडधडायचं, फक्त ते त्यांना कळू नाही दिलं, आणि दोघेही लक्ष ठेवून जवळपास असायचो), गुळण्या करायला पाणी दिलं की कधी गाण्यातले अलंकार, कधी कुठले श्लोक, यांच्या चालीवर तोंडात पाणी धरून शर्यत लावत! औषध घेऊनही अंग तापलेलं असताना मी गार पाण्याने अंग पुसू लागले की त्यांची चिडचिड व्हायची, झोप disturb होते म्हणून रडुरडू यायचं अगदी; पण समजूतदार तरी किती.. सगळं करून घ्यायच्या.. आपला आवाज मोठा आला तर दुसरीला जाग येईल, हे खूप खूप पूर्वी सांगितलेलं.. ते अजूनही मनात पक्कं धरून ठेवलं असेल का…?

– प्रज्ञा वझे घारपुरे

3 Comments on आजारपण.. नको रे देवा !

  1. Aai ga ase Ri Ra la zoplele kadhich pahile nahiye…
    Khup sundar lihile aahes Pradnya ??… pratyaksha drushya ubhe rahile ..kharach Ajarpan nako konalach… khup mast describe kela aahes prasang…. Ri Ra kharach khup guni ani samazdar aahet lahanpana pasun…. Asech sundar sundar blogs lihit raha and keep sharing… Best wishes to you always…

  2. Khup sundar lihile aahes Pradnya ??… pratyaksha drushya ubhe rahile ..kharach Ajarpan nako konalach… khup mast describe kela aahes prasang…. Ri Ra kharach khup guni ani samazdar aahet lahanpana pasun…. Asech sundar sundar blogs lihit raha and keep sharing… Best wishes to you always…

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..