विसरले जाणे येणे
विसरले गणगोता
माझिया सोनुल्याची
फक्त आजी आहे आता ।। माझिया…..
दिन उगवतो माझा
त्याच्याच आवाजाने
दिन मावळे रात्रीला
त्याची अंगाई गाता गाता ।। माझिया…..
आठ वाजले का बाई
झाली दूधाची गं वेळ
जीव होई कासावीस
वेळेवरी आटोपता ।। माझिया…..
दहा वाजले जाहली
आंघोळीची त्याची वेळ
आता वाजणार भोंगा
जरा साबण लावता ।। माझिया…..
बारा वाजता अचूक
जेवणाची त्याची वेळ
कधी चुकणार नाही
तुम्ही चुकाल घड्याळ
बाळकृष्णाचे दर्शन
दही भात भरविता ।। माझिया…..
भर दूपार टळली
आता पुरे झाला खेळ,
डोळे मिटू मिटू होती
मांडीवर थोपटता ।। माझिया…..
संध्याकाळ फुलपंखी
येई नटून थटून
टिका मिका करूनिया
बाळ खेळते अंगणी
त्याला पाहता पाहता
दिनमणी जाई अस्ता ।। माझिया…..
त्याच्या बाळ मुठीमध्ये
माझे बंदिस्त अस्तित्व
त्याच्या हासूत असूत
माझे सामावले विश्व
बोबडे बोल त्याचे
माझी गाथा माझी गीता ।। माझिया…..
Leave a Reply