नवीन लेखन...

आजी आजोबांचे आरोग्य – भाग १

कॅनडा मधील डॉक्टर विल्यम ऑस्लर (१८४९ – १९१९) हे नाव जागतिक वैद्यकीय क्षेत्रात अतिशय आदराने घेतले जाते. त्यांनी मांडलेला एक विचार “One of the first duties of the physician is to educate the masses not to take medicine” अर्थात जनतेला औषध न घेण्याचे प्रबोधन करणे हे डॉक्टरांचे सर्वात पहिले कर्तव्य समजावे. या तत्वज्ञानाचा मतितार्थ उतारवयातल्या आजी आजोबांसाठी जास्त महत्वाचा आहे. कारण औषध सेवनाने शरीरात दोन प्रकारच्या प्रक्रिया घडतात. एक म्हणजे शरीर औषधाला प्रतिसाद (response) देते आणि दुसरे औषधाचा प्रतिकार (reaction) करते. प्रतिसाद म्हणजे औषधाचे अपेक्षित कार्य होणे आणि प्रतिकार म्हणजे त्याचे दुष्परिणाम किंवा प्रतिकूल परिणाम होणे. उतार वयात शरीराची औषधाची प्रतिसाद देण्याची क्षमता (responding mechanism) कमी होते आणि प्रतिकार यंत्रणा (reacting mechanism) अधिक बळावते. शरीर आणि शरीरातील सर्वच यंत्रणा वयानुसार दुर्बल होतात आणि त्यामुळे योग्य मात्रेत आणि नेमके औषध दिले तरी बरेचदा ते लागू पडत नाही उलट त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसू लागतात. म्हणून वृद्धांसाठी कोणतीही औषधयोजना अतिशय विचारपूर्वक करावी लागते. “जखमेवर मीठ चोळणे” ही म्हण याठिकाणी समजून घ्यायला पाहिजे. वृद्ध शरीर हे जणू जीर्ण किंवा दुर्बल झाले असते आणि त्यावर कसलाही स्पर्श झाला तरी आग होण्याची भीती जास्त असते. त्यादृष्टीने रासायनिक औषधे देणे तर टाळावेच. गरज लागलीच तर आयुर्वेदिक वनस्पतीजन्य औषधेही सौम्य स्वरूपाची आणि अत्यंत माफक मात्रेत द्यावीत. याच महान डॉक्टरांचे आणखीन एक वाक्य या निमित्ताने आठवले “The person who takes medicine must recover twice, once from the disease and once from the medicine.” या वाक्याचा अर्थ “जो व्यक्ती औषध घेतो त्याची दोनवेळा सुटका व्हावी लागते, एकदा रोगाच्या विळख्यातून आणि एकदा औषधाच्या दुष्परिणामांपासून”. त्यामुळे शक्यतो आहारातील आणि दैनंदिन जीवनशैलीत काही बदल करून आजारांची चिकित्सा कशी करता येईल हे समजून घ्यावे. मुळात शरीरातल्या सर्व पेशी आणि यंत्रणा आपल्या अहरातूनच तयार होत असतात. त्यामुळे त्यात काही दोष निर्माण झाला तर आपला आहार किंवा दिनचर्या काही अंशी त्याला जबाबदार असतो हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीने माझ्या अनुभवातून आणि वडिलोपार्जित शिकवणीतून निष्पन्न झालेल्या आणि अतिशय प्रभावी गोष्टी याठिकाणी देतो.

आयुर्वेदानुसार वयाचे तीन गट पडतात. बालवय, तारुण्य आणि वार्धक्य. बाल वयात कफ, तरुण वयात पित्त आणि वार्धक्यात वात दोषाचे प्राबल्य असते त्यामुळे उतार वयात वातरोग होण्याची शक्यता जास्त असते. वातरोग म्हणजे नेमकं काय? पोटात गॅस होणे म्हणजे वातरोग असा बऱ्याच लोकांचा समज असतो. अर्थात हा देखील एक प्रकारचा वातच आहे पण हा अपचनातून तयार होणारा वात अर्थात गॅस आहे, याला वतरोग म्हणता येणार नाही. वातरोग समजायला प्रथम वताचे गुणधर्म माहिती असायला हवेत. रुक्षता, हलकेपणा, थंडावा, खरखरीतपणा, सूक्ष्म, अस्थिरता हे वाताचे गुण आहेत. वयाचा वातकाळ सुरू झाल्यावर याप्रकरची लक्षणे शरीरातील सर्व यंत्रणांमध्ये दिसू लागतात. त्वचेला रुक्षता, वजन कमी होणे, हातापायांमध्ये कंप, शरीराचा तोल जाणे अशी लक्षणे होतात. अगदी शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर पेशींची विभाजनक्षमता कमी होत जाते, स्नायूंचा लवचिकपणा कमी होऊन ते ताठर होतात, ज्ञानेंद्रियांची क्षमता कमी होते, शरीरातला द्रवांश कमी होतो, प्रथिनांचे संतुलन बिघडते. वार्धक्य ही अशी स्थिति असते की त्यात होणारे बदल समजतात पण ते कोणत्याही औषधाने पूर्ववत करता येत नाहीत. माझ्या बोलण्यात अनेकदा एक वाक्य येतं “You can look young but you can not become young”. अर्थात केस रंगवले, सुरकुत्या घालवणारे काही क्रीम किंवा मलम लावले, तरुणांना शोभतील असे कपडे घातले, चष्म्याऐवजी कॉन्टॅक्ट लेन्स लावले तर तुम्ही तरुण दिसाल पण तरुण होणार नाही. वयानुसार होणारे शारीरिक बदल होऊन शरीर हे क्षीण होणारच. फरक फक्त एवढाच की आहार, दिनचर्या, व्यायाम, सद्वृत्त पालन, निर्व्यसनी राहणे अशा गोष्टींमुळे वार्धक्यातले आजार चार हात लांब ठेवता येतात आणि त्यातून आजार झालेच तर त्यांच्या लक्षणांचे गांभीर्य तुलनेने सौम्य असते. विशिष्ट कुटुंबामध्ये मधुमेहासारखे आजार आनुवंशिकतेमुळे होतात. आहार आणि दिनचर्येचे पालन केल्यास असे आजार लहान वयात न होता उशिरा होतात. उत्पत्ती – स्थिती – लय हे निसर्गाचे नियम आहेत आणि ते अटळ आहेत. त्यामुळे अमुक गोष्टी केल्यामुळे आपण अमर काही होणार नाही पण आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी खाली दिलेल्या नियमांचे पालन केले तर नक्कीच फायदा होईल आणि काही आजार झालाच तर गंभीर लक्षणे होणार नाहीत.

-डॉ. संतोष जळूकर

वैयक्तिक सल्ल्याकरिता फोन +91 7208777773

क्रमशः 

Avatar
About डॉ. संतोष जळूकर 34 Articles
डॉ. संतोष जळूकर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते आयुर्वेदिक औषधनिर्मितीच्या व्यवसायात आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..