मला लहाणपणापासूनच आकाश कंदीलाचं आकर्षण वाटत आलं आहे. सदाशिव पेठेत असताना मोठा भाऊ, अण्णा हा घरीच आकाश कंदील करीत असे. दहा वर्षांचा मी, तो तयार होताना तन्मयतेने पहात राही. मी पाचवीत असताना आम्ही सगळे दिवाळीच्या सुट्टीत गावी गेलो होतो. अण्णाने खूप कष्ट घेऊन विमानाच्या आकाराचा आकाश कंदील तयार केला. आमचं जुनं घर व माडीचं नवं घर, शेजारी शेजारीच होतं. जुन्या घराला एक बांबू उभा करून नव्या घराच्या माडीवरुन एक दोरी लावली व ते विमान मागे पुढे ओढण्याची व्यवस्था केली. रंगीत कागद लावून आकाशकंदीलाचे आकर्षक विमान एकदाचे तयार झाले. त्याकाळी गावात वीज नसल्याने अंधार पडल्यावर त्यात दिवा म्हणून एक मेणबत्ती पेटवून उभी ठेवली. ते विमान पहायला मुला-माणसांची ही गर्दी जमली. अण्णाने दोरी ओढून विमान जुन्या घराकडे आणले. एवढ्यात जोराचा वारा आला आणि विमान हेलकावे खाऊ लागले. क्षणार्धात ते उलटे झाले व त्याने पेट घेतला. रंगीत कागद जळून गेले व विमानाचा फक्त सांगाडाच राहिला. अण्णासह पहाणाऱ्या सर्वांना हळहळ वाटली. त्यानंतरच्या प्रत्येक दिवाळीला त्या आकाशकंदीलाची आठवण येतच राहिली.
आकाश कंदील
त्यानंतर अण्णा काॅलेजला, नोकरीला जाऊ लागल्यावर आकाशकंदील करण्याची जबाबदारी आम्हा दोघांवर पडली. दसरा होऊन गेल्यावर मंडईच्या मागे असलेल्या बांबूवाल्यांकडून मी आकाशकंदीलासाठी लागणाऱ्या ३२ काड्या आणण्यासाठी जात असे. त्या घेऊन आल्यावर पेरुगेट शेजारील विविध भांडार नावाच्या दुकानातून रंगीत जिलेटीन पेपर व सोनेरी पेपर विकत आणत असे.
रात्री जेवण झाल्यावर त्या काड्यांपासून आठ चौकोन तयार करीत असे. ते एकमेकांना बांधण्यासाठी दोऱ्याचा वापर करावा लागत असे. एकदा का सांगाडा तयार झाला की, निम्मं काम झाल्याचा आनंद होई. मग गव्हाच्या पीठाची खळ करुन जिलेटीन पेपर त्या सांगाड्यावर चढविला जात असे. लाल, पिवळा, निळ्या रंगाने आकाशकंदील छान दिसू लागे. आता त्यावर सोनेरी पेपर कात्रीने कलाकुसरीने कापून चिकटवला की, ९०टक्के काम पूर्ण! शेवटी दीड फुटी लांबीच्या झिरमिळ्या लावल्या की, आमचा कंदील तयार! जिलेटीन पेपर ताणून बसण्यासाठी ओल्या पाण्याचा बोळा त्याच्यावरुन फिरविला की, आकाशकंदील टकाटक दिसू लागे.
वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस! मग रात्रीच ओट्यावर स्टुल उभं करुन दाराच्या वरुन एक काठी बांघून आकाशकंदील लावला जात असे. त्यात चाळीसचा बल्ब सोडून बटन चालू केले की, दिवाळीला प्रारंभ झाल्याचा आनंद मिळत असे.
आमचा आकाशकंदील पाहून शेजारील जय भारत स्टोअर्समध्ये बाबुलाल शेठजींकडे कामाला असणारे, दगडूशेठ घरी आले व त्यांनी आकाशकंदीलासाठी येणारा खर्च विचारला. मी प्रामाणिकपणे जो खर्च आला तो त्यांना सांगितला. त्यांनी त्वरीत ती रक्कम खिशातून काढून माझ्या हातावर ठेवली व आकाशकंदील तयार करायला सांगितलं. मी तो दोन दिवसांत करुन दिला. पुढे दरवर्षी ते तेवढेच पैसे देऊन आकाशकंदील घेऊन जाऊ लागले. तीन वर्षांनंतर मी त्यांनी दिलेल्या रकमेतून एक तयार आकाशकंदील त्यांना आणून दिला, त्यानंतर त्यांनी कधीही आकाशकंदील करायला मला सांगितले नाही.
काॅलेज आणि नंतर व्यवसायात पडल्यावर बाजारातून तयार आकाशकंदील आणू लागलो. रंगीत प्लॅस्टीकचे फोल्डींग करता येणारे आकाशकंदील पुन्हा पुन्हा वापरता येऊ लागले. थर्माकोलची भरपूर व्हरायटी मिळू लागली. यामध्ये जिलेटीन पेपरचा आकाशकंदील विस्मृतीत गेला.
आता मुलगा मोठा झाला. शिक्षणानंतर नोकरीला लागला. त्याचं लग्न झालं. आता आकाशकंदीलाची जबाबदारी त्यांच्याकडे गेलेली आहे. त्यांनी कालच दोन गोलाकार आकाशकंदील व लाईटच्या माळा लावून रोषणाई केलेली आहे.
काळ बदलला, तरी संस्कृती तीच आहे. जुने आकाशकंदील जाऊन सुटसुटीत नवीन आकाशकंदील दिपोत्सवात रोषणाईची भर घालीत आहेत. सर्व आसमंत त्यांच्या तेजाने उजळलेला आहे…
माझ्या सर्व रसिक वाचकांना ही दीपावली आनंदाची, सुखसमृद्धीची व भरभराटीची जावो ही शुभेच्छा!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१२-११-२०.
Leave a Reply