नवीन लेखन...

आलाप – “समझ गया, नींद आए तो सोही जाना चाहिए !!”

” जंजीर, दिवार, शोले ” च्या ” अँग्री यंग ” प्रतिमेतून हृषीदांना आणि दस्तुरखुद्द अमिताभलाही बाहेर पडावंसं वाटलं असेल , तो क्षण म्हणजे ” आलाप” ! पण दुर्दैवाने हे प्रतिमा -परिवर्तन चाललं नाही. चित्रपटभर त्वेषाने एकही ठोसा न मारणारा, सौम्य गायक अमिताभ चुकीच्या वेळी पडद्यावर आला. तो आणि त्याचे चाहते तोवर प्रगल्भ झाले नव्हते. अशोक सराफवरही पडलेला विनोदी अभिनेत्याचा शिक्का त्याला नीटसा पुसता आला नाही. ” सुशीला ” किंवा अलीकडचा “एक उनाड दिवस ” मध्ये त्याने परीघ ओलांडायचा प्रयत्न जरूर केला पण परत रिंगणात आला.
किंचित संजीव, किंचित फरिदा, मध्यम रेखा आणि बराचसा अमिताभ असा मसाला घेऊन हृषीदांना जे सादर करायचे होते, ते जमले नाही. चक्क जयदेव साथीला असताना त्यांना एकच लडिवाळ रचना करता आली – येसूदासला काखोटीला मारून ” कोई गाता मैं सो जाता ! “
कला आणि कलाकारामधील सनातन नात्याला समर्थपणे गवसणी घालावी अशा इराद्याने हा चित्रपट बनविला असावा. कलेसाठी कलाकार की कलाकारामुळे कला हा चिरकालाचा प्रश्न. वडिलांच्या निर्णयाला झुगारून गायकी मागे लागलेला अमिताभ भेटतो असरानी, रेखा, सरजूबाई या गात्या गळ्यांना ! संजीवकुमार या महाराजांशी त्याचा संबंध येत नाही, पण तेही संगीताचे शौकीन आणि गायनकलेला आसरा देणारे !
त्यातून तो काही फार मोठा/नामवंत गायक वगैरे झालेला दाखविले नाही, पण वडिलांशी पंगा, टांगा चालविणे, आणि आजारग्रस्त होणे असे कामचलाऊ संघर्ष त्याच्या वाट्याला येतात. मध्येच “नया दौर ” टाईप टांगा (बग्गी ) व्हर्सेस बस असा छोटासा लढा येतो पण तोही अनिर्णित !
“आनंद ” दुःखी , ” मिली ” आशादायी आणि नंतर “आलाप ” हा चित्रपटही आशादायी टप्प्यावर संपतो. पण चित्रपट सपक, कोठेही टोकदार वाटत नाही.
(असाच अनुभव “मंझिल ” च्या वेळी आला. तेथेही गायक अमिताभ पचनी पडला नाही. अर्थात खूप रखडल्यामुळे ” मंझिल ” त्यातील चार्म गमावून बसला हेही तितकेच खरे).
प्रगल्भतेचा टप्पा ओलांडल्यावर ” ब्लॅक ” किंवा “पा ” मध्ये अमिताभने त्याच्यातील कलावंत अजून खूप उरलाय हे समर्थपणे दाखविले.
झोप न येण्याच्या महाराजांच्या समस्येवर सरजू बाईंकडे दवा असते- अंगाई ची !
चित्रपटाच्या शेवटी, संपण्याच्या आसपास आलेल्या सरजू बाई साठी महाराज धाव घेतात. तिला साद घालतात. भेटींमधील अंतराची कारणे अर्धोन्मीलित सरजूला (खरंतर स्वतःलाच ) सांगत राहतात आणि तक्रार करत विनवणी करतात –
” मला पुन्हा झोप येत नाहीए गं ! म्हणून तुझ्याकडे परतलोय. अंगाई गा .”
तिला ते शक्य नसते, ओठ पुटपुटायचे प्रयत्न जरूर करतात पण शब्द बाहेर येत नाहीत. ते पाहून समजूतदार संजीव कुमार म्हणतो-
” समझ गया , नींद आए तो सोही जाना चाहिए I “
हे निरोप घेण्याचे क्षण वरपांगी समजूतदार असले तरी त्यातील काहिली फक्त निरोप देणाऱ्याला जाळत असते. झोप येत नाही ,पण दरवेळी अंगाई आणायची कोठून ? अंगाईविना झोपण्याची सवय करायला हवी हे १९७७ साली हृषीदांनी हळुवारपणे सांगितले.
रात्री झोपताना शेजारी पाण्याचे भांडे ठेवतात – चुकून रात्री तहान लागलीच तर पाणी हाताशी असावे म्हणून !
त्या पाण्याबरोबर आजकाल अंगाई पणअसावी – झोप ते काळझोप या प्रवासासाठी !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 
https://en.wikipedia.org/wiki/Alaap
डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..