जागतिक आळशी समूहाध्यक्ष
मंडळी सप्रे म नमस्कार !
आजचा विषय आहे आळस
आता विषयावर लिहायचं तर विषयाच्या बाजूने किंवा विषयाच्या विरुद्ध असंही लिहिता येतं ! तसं पहायला गेलं तर विरोधी पक्ष खूप सोपा ! समोरचा बोलेल , वागेल , करेल त्याला भंजय पणे विरोधच करायचा ( पक्षी : “आलू से सोना” वालं येडं ! आणि त्याचा पणा म्हणजे “सतत बिनडोक सारखं वागा—बोलायचा पण) — असा हल्ली समज आहे बाॅ ! ( हे जाणवल्यापासून मुळातंच कमी असलेली आमची बुद्धीही “ह ल ली” आहे बाॅ ! ) , पण पूर्वी असं नव्हतं , विरोध करायचा तर समोरच्याचं म्हणणं पूर्ण समजून घेऊन त्यातल्या मुद्यांना सुसंगतवार विरोध करावा लागे ! आमचं लहानपण ( शारीरीक हां ! वैचारीक अन् मानसिक रित्या आम्ही अजूनही बाल च आहोत असं आमचे सगळेच बाल , हे “बच्चे” झाले तरी आमच्या सौभाग्यवती आम्हाला म्हणतात बाॅ ! ) अशाच विचारांच्या लोकांमधे गेल्यामुळे आम्ही लगेच ठरवलं , आपण विषयाच्या बाजूनेच लिहायचं ! काय आहे , देव अक्कल वाटत असताना अस्मादिक संडासला गेलेले ( त्यात ते “लोखंडे!” ) त्यामुळे सगळं आटपून शूचिर्भूत ( मुळातंच रंगरूपाने भूत असणार्या आमच्यासारख्यांना पाठी शूचि: कशाला लावायचं बाॅ ??? ) होऊन देवाकडे जायला उशिर झाला.त्यात चालायचा कंटाळा , एवढ्या लांब जाताना आणि “अक्कल” आणताना भांडं मोठ्ठं कोण carry करणार ? मग हाताला लागेल ते ( त्यातल्या त्यात लहान ! ) भांडं घेऊन निघालो ! पोचलो तोवर देवाकडचा साठा संपत आलेला ! लोकं बरीच आणि माल कमी ! मग अगदी सुरुवातीला आमच्या रांगेत पुढे बरेच असलेले देशमुख , साहित्यप्रेमी “शाह” , देशपांडे , “Full” सुंदर व्यक्तींना भरभरून वाटून झाली की वो म्हणतो मी अक्कल आणि आमच्या वेळी रेशनिंग! मग जी वाट्याला आली ती घेतली चाळणीत ! त्यामुळे ती घेऊन घरी परतेस्तोवर बारीक बारीक अक्कल भोकांतून सांडत गेली ( तेंव्हापासूनंच बारकाईने विचार करण्याचा आम्हाला आळस ! ) आणि घरी पोचल्यावर जी काय उरली ती टक्कुर्यात मातोश्रींनी भसकन ओतली , त्या जीवावर किती उड्या मारणार आम्ही आणि किती लिहिणार ? म्हणून विषयाच्या बाजूनेच लिहायचं ठरवलं….. हुश्श ! एकदाचं विषय सोडून बरळण्याचं भुंकय भाऊत सारखं वागलं की कुणालाही सामोरे जाता येतं !
हां तर आजच्या विषयावर येतो….. ( तरी बरं , वाढदिवस २७ जुलै असल्यामुळे पण साल तेच नसल्यामुळे नांवात आद्याक्षर उ असूनही व पुढे द सामायिक असूनही ध आणि व सोडून आम्ही य जमान पद स्वीकारलं व तेवढे इर साल व जाब साल झालो नाही ! ) जान् द्ये जान् द्ये , मूळ विषय पे गाडी आन् द्ये आन् द्ये ! हां तर….. आळस
आम्ही जन्मजात आळशी ( सोमवारी रात्रीच यायचं नियोजन होतं पण आलो मंगळवारी पहाटे ! बहुदा तेंव्हापासूनंच मातोश्रींना उग्र मंगळ लागू झाला असावा ! ) पुढे आमच्याकडे बघून देवाला पण आळस आला आमचं भवितव्य लिहायचा , मग त्याने जितक्या सावकाश लिहिलं तितक्या सावकाश दैवगतीने पदरात यश पडत गेलं ! नाही म्हणायला सौभाग्यवती चांगली मिळाली व दोन चिरंजीव चांगले उपजले ( नशिब , आई वर गेले ते! ) आता बोलताना पण आम्ही हिंदी सिनेमातल्या असित सेन सारखं ( तोच तो , भरताच्या वांग्यासारखा खरपूस भाजका व काही ठिकाणी साल गेल्यामुळे पिंगट पांढरट राहिलेला चेहेरा ! ) सा s व s का s श बोलायला लागलो , तर लोक मधे मधे पेंगू लागले ( खरं तर मधेच जागे होऊन “याचं अजून बोलणं चालू आहेच का?” याची खात्री करून परत डुलक्या घेऊ लागले ! ) म्हणून आम्ही जलद बोलू लागलो तर आमचा शाह रुक , रुक खान झाला ! तेही कळेना झालं लोकांना ! मग आम्ही बोलणं सोडून लिहायला लागलो ! तर…..
हे येवरं मोठ्ठं लिवल्येलं कोन वाचनार वं ? कं जांलं कं ? येरा कुटला ! येवरं लिवत्यात कं ? न बाला , दोन सबुद खरडाव नं निंगाव तं बसलं लिवत ! आस्सं जालं ! आणि इथे पण आमचं नशिब आळस करून गेलं बघा ! आता वय वर्ष ८ ते १०० कुणालाही ज्या पुस्तकात आपल्या आवडीचं काही ना काही ( तरीच नव्हे हां ! ) तरी सापडेल असं सुविचार , कविता , उखाणे , स्केचेस , पेंटिंग्ज , लेख — व्यक्तिचित्र , ऐतिहासिक लेख , सिनेमावरचे लेख असं सगळं साहित्य तयार आहे ! पण ते पुस्तक छापायला संपादक मिळेना राव ! तो पण आळस करतोय !
एकूण काय, आम्ही केला आ ळस नशिबाचा झाला क ळस देवाला ज्याची कि ळस तो झटकावा आ ळस हे पटलंय हो , पण आता अंगवळणी पडला आळस तर कसे व्हावे तुळस बदलावसं वाटतं पण आळस आडवा येतो , आणि आपलं काही ( तरी ? ) खरं नाही हे जाणून मी पण आडवा होतो ! चला , कमीत कमी लिहावं म्हटलं तर तिथे आळस झाला नाही हे मात्र बरं झालं बाॅ !
कळावे ,
आपला आळशी मित्र, उदय गंगाधर सप्रे
-म —ठाणे
रविवार १३ आॅगस्ट २०२३ सकाळी ९.५२ वा.
Leave a Reply