आले लहरी पावसोजींच्या मना
सुट्टीत जावे मामाच्या गावा,
फोनवरून झालं बोलणं
दिवस ठरला एकदाचा,
गाड्या सगळ्या फुल झाल्या
पेच पडला तिकिटाचा !
पाऊसोजी म्हणाले आईला
काळजी नसावी, आपले आहेना ‘मेघ’ विमान,
आई म्हणाली पावसोजीला
प्रवास खूप दूरचा, सांभाळून चालव वाहान !
ठेव जवळ जलाचा साठा
वाटेत लागली तहान जर
जलाचा आहे तुटवडा
ऐकले होते वसुंधरेवर !
झाला होता प्रवास बरेच तास
लागली होती भुकेची आस,
सगळी धरणी झाली तप्त
हवामान नव्हते वाहन उतरवण्या रास्त !
प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य
पावसोजी कधी येऊन करी आम्हां तृप्त,
झाले अनकूल हवामान
पावसोजीने मामाच्या अंगणात उतरविले विमान !
आनंदली आजोळची मंडळी
विचारती, वाटेत झाला नाही ना त्रास,
भेटली मामा-मामी आणि आप्त
म्हणती मुक्काम ठेव काही महिने निवांत !
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply