काल सकाळी मी शिवाजी रोडने नेहरु चौकाकडे येत होतो. तिथे रिकाम्या बसस्टाॅपवर एक मध्यमवयीन माणूस आलेपाकच्या वड्या विकत बसला होता. तुरळक येणारा जाणारांना तो ‘आलेपाक घ्या’ असं विनवत होता. मी त्याच्या जवळ गेलो, पत्र्याच्या गोलाकार डब्यामध्ये आलेपाकची दहावीस पॅकेट्स होती. मी त्याला दहा रुपये देत असताना त्याने ते डब्यातच ठेवून आलेपाक घेण्याची खूण केली. मी पैसे ठेवून, आलेपाक घेऊन चालू लागलो.
चालताना आठवत होतो, तो भूतकाळ. एकोणीसशे सत्तरमध्ये सदाशिव पेठेत असताना लहानपणी मी रस्त्यावरुन आलेपाक विकणारा माणूस पाहिल्याचे चित्र हळूहळू मनःपटलावर स्पष्ट होत होतं.. खाकी शर्ट व खाकीच हाफ पॅन्ट घातलेला एक पन्नाशीच्या माणूस अशाच पत्र्याच्या पसरट डब्यात आलेपाक घेऊन विकत असायचा. त्यावेळी आलेपाक दहा पैशाला मिळत असे. ती चौकोनी जाड वडी ‘जय भारत’ असे लाल रंगात छापलेल्या कागदी वेष्टनात मिळत असे. कधीतरी आईकडे हट्ट करुन ती आलेपाकची वडी मी विकत घेत असे.
वर्ष भरभर जात होती.. कधी डेक्कनला फिरायला गेलो की, लकडी पुलावर एखादा वयस्कर माणूस पोतं टाकून पत्र्याच्याच डब्यात आलेपाक विकताना दिसत असे. त्याच्याकडे पाहून माझा हात खिशात जात असे. आलेपाकची ती वडी चघळत मी पुढे चालायला लागत असे.
कधी डेक्कनच्या बस स्टॅण्डवर, नव्या पुलावर, पुणे स्टेशनवर तर कधी स्वारगेट एसटी स्टँडवर लहान मुलं आलेपाक विकताना दिसायची. प्रवासात उलटीचा त्रास होऊ नये म्हणून वडील आमच्यासाठी आवर्जून आलेपाक घ्यायचे.
लग्नानंतर आम्ही दोघे मुलाला घेऊन पेशवे पार्क, सारसबाग, संभाजी पार्कला गेल्यावर एखादा शाळकरी मुलगा जवळ येऊन आलेपाक घेण्यासाठी गळ घालत असे. अशावेळी त्याच्या स्वावलंबी जीवनाला प्रोत्साहन म्हणून आलेपाक खरेदी करीत असे.
कधी मंडईला जाताना शनिपार चौकात किंवा सिटीपोस्ट चौकात हमखास आलेपाक विकणारे दिसायचे. तिन्ही ऋतूंमध्ये बाराही महिने आलेपाक विकला जाताना मी पाहिलेला आहे. मात्र त्या विक्रेत्यांचं वैशिष्ट्य एकच होतं, ते म्हणजे आलेपाकचा डबा हा पत्र्याचाच असायचा.
साखर आणि आल्याच्या रसापासून केलेले ही वडी बहुगुणी औषधी आहे. पाचक व पित्तनाशक आहे. सर्दी खोकल्यावर गुणकारी आहे. इतकं स्वस्त औषध उपलब्ध असताना आपण सर्रास महागडी आकर्षक पॅकींगमधली सीरप खरेदी करतो. मेडिकलच्या दुकानात देखील आलेपाक आकर्षक वेष्टनात मिळतो. मात्र तोच या गरजू विक्रेत्यांकडून घेतला तर त्यांनाही एक प्रकारची आर्थिक मदत होऊ शकते.
ही आलेपाकची वडी करणारी कंपनी मी लहानपणापासून पहातोय, अद्यापही तीच आहे. ‘जय भारत आलेपाक’ची निर्मिती करणारे आहेत, राणा बंधू. गुरूवार पेठ, पुणे ४२. असा त्या छोट्या पिशवीवर पत्ता आहे. त्यावर इंग्रजीमध्ये Ginger Toffee असंही लिहिलं आहे. एका वडीची किंमत फक्त पाच रुपये. इतक्या कमी किंमतीत आपण आपले आरोग्य सांभाळून एखाद्याला मदत करण्याची संधी कधीही सोडू नये असं मला वाटतं.
आताच्या या कोरोनाच्या काळात आलेपाकसारखं दुसरं उत्तम आयुर्वेदिक औषध नाही. कधीही तुम्हाला असा आलेपाक विकणारा मुलगा, माणूस दिसला तर त्याला या कोरोनाच्या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी, किमान दोन तरी आलेपाकच्या वड्या खरेदी करुन त्याला हात द्या. त्यामुळे तुमच्या तोंडाला चव तर येईलच शिवाय कोरोनाला हद्दपार करण्याची ‘देशप्रेमी शक्ती’ देखील निर्माण होईल.
‘जय भारत’ आलेपाक!!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
८-४-२१.
Leave a Reply