या मित्रांनो सारे या,
सर्व मिळूनी खेळू या ।।धृ।।
खेळ आमच्या देशाचे
गरिबांसाठी सोईचे ।
मैदान नको मोठे ते
वस्तूही अल्प लागते ।।
खेळांना त्या समजून घ्या – १
— या मित्रांनो सारे या,
हुतुतूचा खेळ बघा
दोन गट, छोटी जागा ।
स्पर्श रेषा ओलांडूनी
ह्तुतू म्हणती तोंडानी ।।
एकाच दमात भिडू मारू या – २
— या मित्रांनो सारे या,
खो खो मध्ये चपळाई
चकमा देण्याची घाई ।
उलट सुलट बसे
एकाच रांगेत दिसे ।।
मिळता खो भिडूला पकडू या – ३
— या मित्रांनो सारे या,
लपंडाव हा खेळ कसा
लपलेल्यांना शोधत बसा ।
राज्य येते त्यावरती
शोध घेई सभोवती ।।
तीक्ष्ण नजर ती ठेऊया – ४
— या मित्रांनो सारे या,
आट्या पाट्या च्या खेळात
कांही घरे आखतात ।
सीमेवरती दक्ष राहती
घरात येण्या ते रोकती ।।
चपळाईने घरात शिरू या – ५
— या मित्रांनो सारे या,
एका पायाची गम्मत
लंगडी आहे माहित? ।
उड्या मारीत पळावे
भिडू सारे पकडावे ।।
आखल्या रेषेतच खेळू या – ६
— या मित्रांनो सारे या,
एक दिलाने खेळू या
आनंद सारा लुटू या ।
निरोगी सदा राही तो
प्रफुल्ल मन बाळगतो ।।
शीण अभ्यासाचा घालवू या – ७
— मित्रांनो सारे या,
— डॉ. भगवान नागापूरकर
9004079850
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply