मावशीचे यजमान मधुमेहानं ग्रस्त होते. रक्तदाबही होता. इतरही बरंच काही होतं. त्यांचे प्रश्न आता आमचे, तर आमचे प्रश्न आता त्यांचे झाले होते. मला पुण्यात एक हक्काचं घर मिळालं होतं; पण थोडंसं निमित्त झालं. मावशीचे यजमान आजारी पडले. खूप उपचार केले; पण त्यातच त्यांचं निधन झालं. पुण्यातील मध्यवस्तीतील घर अन् घरात दोघांशिवाय कोणी नाही. स्वाभाविकपणे काकांच्या अखेरच्या काळात त्यांचे रक्ताचे नातेवाईक येऊ लागले होते. चौकशी करीत. गोड-धोड काही आणत. काळजी व्यक्त करीत. काकांना मावशीची काळजी होती. त्यामुळं त्यांच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी आपलं राहतं घर आपल्या जवळच्या नातेवाइकाला देऊन टाकलं. मावशीची त्यांनी काळजी घ्यावी, एवढी अपेक्षा मात्र होती. काका गेले तेव्हा ही मंडळी त्या घरातच होती. त्यांच्यानंतर त्यांना त्यांच्या छोट्या दीड खोलीच्या घरात जायची वेळ आली नाही. दोन माणसांचं, दोन मोठ्या खोल्यांचं आणि मोठ्या मनानं हे घर भरून गेलं. त्यांचं झालं. मी मावशीकडे आलो की सार्या घरानं कान टवकारले आहेत असं वाटायचं. बोलता यायचं नाही. मावशी तर मूक झाल्या होत्या. इतक्या विषयावर बोलणारी बाई हो-नाही पलीकडे बोलेनाशी झाली. त्यांची प्रकृतीही ढासळल्यासारखी वाटत होती. एकदा रेखानं काही खायला करून दिलं. त्यातले दोन घास खाल्लं. बाकी घरातल्या इतरांना दिलं. दुसर्या भेटीत त्या म्हणाल्या, `छान झालं होतं बरं का; पण माझ्या नशिबात नव्हतं ते.’ खूप दिवसांनी त्या काही बोलल्या होत्या. मी खाण्याचाच विषय चालू ठेवला. बर्याच गप्पानंतर मनातला एक डंख बाहेर आला. म्हणाल्या, `खूप दिवस वाटतंय स्वीट होमची इडली खावी; पण जावं कसं? लोक काय म्हणतील. इथं आणायचं तर या घराच्या चार भिंतीच्या कैदेत आता जीव नकोसा झालाय.’ मावशीला घरातील माणसं माणूस म्हणून स्वीकारायला तयार नव्हती. त्यांना मावशीशिवाय असलेल्या घरात रस होता. स्वतच्या घरात मावशी परकी झाली होती. त्या दिवशी मावशीला मी बळेच बाहेर काढलं. आम्ही दोघच स्वीट होमला गेलो. तर्रीदार इडलीचा रस्सा, इडली आणि शेव-उपमा भरपेट नाश्ता केला. काका गेल्यानंतर मावशीनं प्रथमच मनापासून काही खाल्लं असावं असं वाटत होतं. त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. त्या म्हणाल्या, `मनात आणलं असतं तर इथवर मी एकटीही आले असते; पण त्यात अर्थ नव्हता. आज माझ्या सगळ्या इच्छांना पूर्णविराम मिळाला आहे.’ त्यानंतर काही इच्छा करायला सुमती मावशी जगात राहिलीच नाही. माझ्या जिवाभावाची मैत्रीण गेली; पण एक समाधान होतं, आमची इडली छान जमली होती. मनातलं मनातच ठेवणारी अनेक माणसं आपण पाहतो; पण मनातलं उधळून देणारी माणसं जेव्हा गप्प होतात तेव्हा त्यांच्या मनाचा ठाव घेणं देवाला भेटण्यापेक्षा वेगळं काही नसतं.
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply