नवीन लेखन...

आम्हा नित्य दिवाळी

बँकरसाठी रोजच दिवाळी असते. माणसांची, स्वभावांची, अनुभवांची नात्यांची.

जगण्याच्या तर्‍हा अनुभवायच्या असतील तर लोकसंपर्काच्या जागी असण्यासारखे दुसरे भाग्य नाही. वयाप्रमाणे, मानसिकतेप्रमाणे, सोशल-स्टेटसप्रमाणे, आर्थिक स्थितीप्रमाणे बदलत जाणारा ग्राहक आणि प्रत्येक दिवशी नवे जगणे सांगून जाणारा नवीनतम दिवस.

अशिक्षित ग्राहकाला ‘सिस्टम बंध है’, ‘कनेक्टीव्हीटी नही है’, ‘अकाऊंट इनऑपरेटीव्ह हो गया’, एखादी गोष्ट ऍक्टिव्हेट करून घे असे सांगण्यापेक्षा ‘थोडी देर के लिये मशीन बंद है, बहोत दिनसे इस्तेमाल नही किया इसलिये खाता अभी रुका हुवा है’ वगैरे ‘त्यांच्या’ भाषेत सांगितल्या तर त्या सोप्या वाटतात. बँकेचे नियम कार्यपद्धती युक्तीने मांडाव्या लागतात.

एक वयस्कर ग्राहक माउली आली. खात्यात किती पैसे आहेत, व्याज किती मिळाले या चौकशा केल्या. खात्यात साठ और चार चौसठ रुपये आहेत असं सोपं करून सांगितलं. ती म्हणाली, ‘या पैशाचं काय करू?’ मग तिच्या गरजा काय वगैरे विचारून थोडे पैसे फिक्स्डमध्ये टाकण्याचा सल्ला दिला. आधीची तिची सव्वा लाखाची रिसीप्ट मला स्क्रीनवर दिसत होती. कुठेच नॉमिनेशन नाही. तिला सांगायचे तर होते, परंतु माउलीचे वय सेन्सिटिव्ह.  मुळात नॉमिनेशन म्हणजे ‘तुम्ही गेल्यानंतर तुमचे पैसे कोणाला मिळतील’ हे सांगणे. ऐकायला सोपे वाटते. परंतु त्यांचा शारीरिक, मानसिक अवस्थेचा विचार करता ते त्यांच्या गळी उतरवणे अवघड. आपण गेल्यानंतर काय, हा विचार खरं तर प्रत्येकाच्या मनात असतो, पण जणू तो बोलून दाखवल्याने ‘तो’ नकोसा क्षण लगेचच येऊन उभा ठाकेल, अशी भीती दबा धरून बसलेली असते. काही विचारी लोक वगळता ‘काय घाई आहे’ म्हणणारेच अधिक. मी नेहमीप्रमाणे स्वतःचे उदाहरण देत, माझे पैसे कुछ घरवालेके नाम, कुछ बच्चोके नाम कसे ठेवते ते गप्पांचा नादात तिला सांगितले. तिच्या दृष्टीने मी तरुणच होते. म्हणजेच जर ही बँकवाली बाई या वयात ते ‘मेरे बाद क्या’वालं लिहून ठेवू शकते तर आपण सांगायला काहीच हरकत नाही. आणि तिने चटकन मुलीच्या नावाच्या नॉमिनेशन फोर्मवर सह्या केल्या. वर म्हणाली, ‘हां ना बेटा, इन्सान का क्या भरोसा. आज है कल कुछ भी हो सकता है।’ चला माझा निशाणा बरोबर लागला होता. मग थोड्या घरगुती चौकशा करून तिला रिलॅक्स केलं. हेच जर ‘आप मरने के बाद आपका पैसा किसको देना है’ विचारले असते तर आजीबाई सैरभैर झाली असती.

असेच एक रिटायर्ड आजोबा. काही पैसे मुलांना वाटून टाकले; येणारे काही पैसे पण देऊन टाकणार असं म्हणाले. पुन्हा एकदा थेट सल्ला न देता माझे स्वतःचे उदाहरण देत म्हटलं, ‘आमच्या आईचे आलेले पैसे ती आम्हा भावंडांना देत होती, पण आम्हीच म्हटलं हे पैसे तुझ्यासाठी ठेव. हवं तर आमच्या नावाने नॉमिनेशन कर कारण या रिसीप्टचा आधार काय असतो हे ती रिसीप्ट लांब गेल्यावर कळते.’

आजोबांनी माझी मुलं अशी नाहीतच मुळी असे काहीसे भाव दर्शवले, मात्र पुढच्या महिन्यात येऊन चक्क नॉमिनेशन करून गेले. भरभरून दुवा देऊन गेले. अशा बऱ्याच आजी-आजोबांच्या प्रेमळ दुवा आजवर मिळाल्या आहेत.

छोटीछोटी काम करणारे कामगार/कारागीर अगदी छोट्या रकमा जमा करतात. ते शंभर, पाचशे रुपये किती मोठे आहेत ते बँकरने त्यांना जाणवून द्यायचं असतं. करोडोच्या गिर्‍हाईकांपाठी धावायला मोठी फौज असते, पण छोट्या ग्राहकांसाठी कोणी नसतं. यांच्या पैशाची क्रयशक्ती बाजारात फार नसली तरी जगण्यासाठी लागणारी पॉवर त्यात ठासून भरलेली असते.

मानवीमनाचा नातेसंबंधांचा विचार करत पगाराच्या पलीकडे जात बँकिंग करायचे असते. ग्राहक पैशाचे व्यवहार करण्यासाठी बँकेत येत असला तरीही त्या प्रत्येक पै सोबत जोडलेले भावनिक व्यवहार समजून घेणे, ग्राहकाच्या मानसिकतेचा विचार करणे प्रत्येक बँकरचे कर्तव्य आहे. आणि हे केले तर प्रत्येक दिवस दिवाळीदसरा होऊन येतो.

स्मिता जोगळेकर

(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..