मी पाचवीत असताना ‘आम्ही जातो अमुच्या गावा’ हा चित्रपट विजय टाॅकीजला लागला होता. या चित्रपटातील ‘देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा..उघड दार, देवा आता, उघड दार देवा…’ हे गाणं फारच गाजलेलं होतं. रेडिओवर ते भक्तीगीतांत नेहमी लागायचं.
आम्ही घरातील सर्वांनी विजय टाॅकीजमध्ये जाऊन तो चित्रपट पाहिला. तेव्हा पहिल्यांदा श्रीकांत मोघेंना नायकाच्या भूमिकेत पाहिलं. चित्रपटातील सर्वच गाणी अप्रतिम होती. त्यामध्ये आमच्या शेजारी राहणाऱ्या माई भिडेंनी काम केले होते.
२००० साली काॅम्प्युटर घेतल्यानंतर कधीही पाहता यावा, म्हणून ‘आम्ही जातो..’ ची सीडी घेऊन ठेवली. त्यातील उमा सोबतचे ‘स्वप्नात रंगले मी..’ हे अवीट गोडीचं गाणं कितीही वेळा पाहिलं तरी समाधान होत नाही. जगदीश खेबूडकरांचे शब्द, आशा भोसले व सुधीर फडके यांच्या आवाज आणि संगीतातील हे गाणं सर्वोत्कृष्ट आहे.
श्रीकांत मोघे यांचा १९६१ साली प्रदर्शित झालेला ‘प्रपंच’ हा चित्रपट मी गणपतीच्या दिवसांत खजिना विहीर चौकात पाहिलेला आहे. मधुकर पाठक यांचं दिग्दर्शन, गदिमांनी लिहिलेली गीतं, सुधीर फडके यांचं अप्रतिम संगीत असलेला चित्रपट मी कधीही विसरू शकत नाही. सुलोचना, सीमा, श्रीकांत मोघे आणि इतर कलाकारांनी साकारलेला कुटुंब नियोजनावरील हा एक वास्तवदर्शी चित्रपट आहे. यातील ‘गाडीवान दादा…’ हे गाणं अप्रतिम आहे. जेव्हा महाराष्ट्र सरकारने मराठी चित्रपटांना पुरस्कार द्यायला सुरुवात केली, त्या पहिल्या वर्षी सर्वाधिक पुरस्कारासह राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘प्रपंच’ हाच आहे!
राजदत्त यांच्या दिग्दर्शनाचा पहिला चित्रपट ‘मधुचंद्र’ हा मी गणपतीच्या दिवसांत पाहिला. काशिनाथ घाणेकर, उमा व श्रीकांत मोघे यांचा हा विनोदी चित्रपट अविस्मरणीय असाच आहे.
पूर्वी रेडिओवरती रात्री नभोनाट्य लागत असे. त्यामध्ये ‘अशी पाखरे येती’ हे नभोनाट्य ऐकल्याचे मला आठवतेय. त्यातील श्रीकांत मोघे यांचा आवाज अजूनही कानात साठवलेला आहे.
‘दोन्ही घरचा पाहुणा’ नावाचा विनोदी कृष्ण-धवल चित्रपट नटराज टाॅकीजला लागला होता. अशोक सराफची भूमिका असलेला तो पहिला चित्रपट होता. श्रीकांत मोघे, आशा पोतदार, दर्शना असे त्यात कलाकार होते.
काॅलेजच्या दिवसात मोघेंना ‘सिंहासन’ मध्ये पाहिलं. ‘सूत्रधार’ चित्रपट पाहिला.
रणजित देसाई यांच्या ‘स्वामी’ कादंबरीवर आधारित ‘रमा माधव’ या मालिकेचे चित्रीकरण पुण्यातील विश्रामबागवाड्यात केले होते. दिग्दर्शक होते गजानन जहागीरदार. त्यातील श्रीकांत मोघे यांनी केलेली राघोबादादांची भूमिका फार गाजली.
श्रीकांत मोघे थोरले, धाकटे सुधीर मोघे… दोघंही बंधू ग्रेट! सुधीर मोघेंनी लिहिलेली चित्रपट गीतं अजरामर आहेत. ‘तुझ्या वाचून करमेना’ चित्रपटातील ‘जरा विसावू या वळणावर…’ हे माझं सर्वात आवडतं गाणं आहे. सुधीर आधी गेले, श्रीकांत यांनी काल ‘एक्झिट’ घेतली.
आमचे मित्र, एकपात्री कलाकार प्रभाकर निलेगावकर यांनी ‘पुलं च्या व्यक्ती, वल्ली आणि गणगोत’ कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला श्रीकांत मोघे यांना बोलावले होते. मोघे सर व्हिलचेअर होते, ते आपल्या भाषणात भरभरून बोलत होते. मी मात्र त्यांना अशा अवस्थेत पाहताना ‘प्रपंच’च्या सुवर्णकाळात गेलो होतो….
श्रीकांत मोघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
७-३-२१.
Leave a Reply