लहानपणी मुलं जेव्हा चित्र काढू लागतात, तेव्हा पहिलं चित्र असतं ते गणपतीचं व दुसरं पवनपुत्र हनुमानाचं! गणपतीचं चित्र काढताना त्यामध्ये मोठे दोन कान व सोंड ही महत्त्वाची असते तशीच हनुमानाच्या चित्रात उजव्या हातात द्रोणागिरी पर्वत, डाव्या हातात गदा व मागे मोठे शेपूट हमखास दाखवले जाते. आमच्या पिढीने अशा चित्रांतूनच चित्रकलेचा श्रीगणेशा केलेला आहे…
लहानपणी आम्ही सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिराजवळ, पावन मारुती चौकातच रहात होतो. त्यामुळे येताजाता हनुमानाचं दर्शन घडायचं. दर शनिवारी आई न चुकता मारुतीला तेलवात वाटीत घालून माझ्या हातात द्यायची. ती वात लावून आल्यावरच आम्ही जेवायला बसायचो.
हनुमान जन्मोत्सवाच्या आधी चार दिवस पावन मारुती मंदिर रंगवले जायचे. शेडगे आळीतील हनुमानभक्त डी. कदम हे किराणा व भाजी दुकानदार दरवर्षी न चुकता हे रंगकाम करवून घ्यायचे. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी केळीचे खुंट लावून, मंडप घालून पहाटे सहा वाजल्यापासून सोहळा साजरा होत असे. साठीतल्या शारदाबाई दिवसभर मंदिराशी बसून भक्तांना तीर्थप्रसाद देत रहायच्या.
न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड या शाळेत मी पाचवीत असताना दर शनिवारी मारुतीच्या फ्रेमपुढे नारळ फोडून सर्व वर्गाला प्रसाद वाटला जात असे. हे सहावी, सातवीपर्यंत नियमित चालू होतं.
आत्ताच्या इंग्रजी माध्यमातील मुलांना हनुमान म्हणजे परदेशी ‘सुपरमॅन’ किंवा अॅव्हेंजर्समधील ‘हल्क’ वाटेल…
पुण्यात मारुतीची मंदिरं शंभराहून अधिकच असतील. त्यातील काही तर पेशवेकालीनही आहेत. पुणे तसं गणपतीच्या व मारुतीच्या असंख्य मंदिरामुळे बुद्धिमान व बलशाली आहे. पेठापेठांतून तालमी दिसतात, तालीम आली की, पहेलवानांचं दैवत मारुती मंदिर हे ओघानं येतच.
थोडक्यात आढावा घ्यायचाच झाला तर पहा… जिलब्या मारुती, पत्र्या मारुती, पावन मारुती, पोटसुळ्या मारुती, पंचमुखी मारुती, पिंपळेश्वर मारुती, सोन्या मारुती, उंटाडे मारुती, शकुनी मारुती, भिकारदास मारुती, दास मारुती, जुळ्या मारुती, दक्षिणमुखी मारुती, इत्यादी. अनेक ठिकाणी शनी-मारुती मंदिरंही आहेत.
मारुती मंदिराचं महत्त्व भारतीय रूढी परंपरेमध्ये देखील आहे. लग्नाच्या आधी नवऱ्या मुलाला मारुती मंदिरात जाऊन त्याचं दर्शन घेऊन यावं लागतं. स्वतः मारुती जरी ब्रह्मचारी असला तरी लग्नप्रसंगी त्याचा आशीर्वाद हा महत्त्वाचा असतो.
प्रत्येक खेडेगावात एक तरी मारुतीचं मंदिर असतंच. तेही शक्यतो गावाच्या वेशीजवळ. आमच्या सोनापूर गावीही मारुती मंदिर आहे. मी लहानपणी जेव्हा गावी जात असे तेव्हा या मारुती मंदिरात शाळा भरलेली पाहिली आहे. नंतर ती शाळा माळावर गेली.
आमच्या मारुती मंदिराची पंचक्रोशीत एका कारणासाठी ख्याती होती. ती म्हणजे रानावनात फिरताना कुणाला जर सर्पदंश झाला, तर त्या व्यक्तीला ताबडतोब मारुती मंदिरात उचलून आणले जात असे. मंदिराच्या समोर एका मोठ्या दगडावर त्याला बसवले जायचे. गावातील गुरव मारुतीला पानांचा कौल लावून त्या सर्पदंश झालेल्या व्यक्तीचे विष उतरविण्यासाठी देवाला कौल मागत असे. यावेळी एखाद्याने त्या माणसाला पाठीवर घेऊन मारुतीला प्रदक्षिणा घालावी लागे. थोड्याच वेळात मारुती उजवा कौल देत असे व त्या सर्पदंश झालेल्या माणसाचा पुनर्जन्म होत असे. या सत्यघटना मी अनेकदा पाहिलेल्या आहेत.
असे चमत्कार १९७५ पर्यंत होत होते. नंतर तो गुरव वार्धक्याने गेला. मारुती मंदिरात फक्त शनिवारीच गावकरी जाऊ लागले. एरवी गावातील रिकामटेकडे पत्ते खेळू लागले. दुपारी व रात्री झोपण्यासाठी मंदिराचा उपयोग होऊ लागला.
दहा वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने मारुती मंदिराचा जीर्णोद्धार केला. आता मंदिर सुशोभित झालेलं आहे. गुरव रोज मंदिरात येऊन दिवा लावतो. शनिवारी हनुमानाची आरती होते. प्रसाद वाटला जातो.
हनुमान जन्मोत्सवाच्या आदल्या रात्री कीर्तन असते. सकाळी भंडारा असतो. मंदिरात हनुमान भक्तांची गर्दी असते.
आता संपूर्ण मंदिराचा कायापालट झाला आहे. मात्र या कोरोनाने गेल्या व या वर्षी हनुमान जन्मोत्सव होऊ दिला नाही.
मला खात्री आहे, हनुमान या संकटातून लवकरच आपणा सर्वांची सुटका करतील व दरवर्षी प्रमाणे पुढच्या वर्षी हनुमान जन्मोत्सव थाटामाटात साजरा होईल…
© – सुरेश नावडकर
मोबाईल ९७३००३४२८४
२७-४-२१.
Leave a Reply