नवीन लेखन...

आणखी एक गुड्डी

सन १९७६ मध्ये मी कुलाबा पोलीस स्टेशनला नेमणुकीस असतानाची गोष्ट आहे. बहुदा एप्रिल महिन्याची ९ किंवा १० तारीख होती. त्या दिवशी मी सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत स्टेशन हाउस ड्युटीला होतो. संध्याकाळी साधारण सहाच्या सुमारास गेटवे ला फेरीचा व्यवसाय करणारी एक सह्रिदय कुब्जा जिला आम्ही अम्मी या नावाने ओळखत होतो, माझ्या पुढ्यात येऊन उभी राहिली. तिचा भेसूर चेहरा हेच तिचे भांडवल होते. त्यामुळेच तिला भयपटात कामे मिळत असत. तिच्या सोबत तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेली १५-१६ वर्षांची एक अतिशय सुरेखं व अल्लड अशी मुलगी होती.

अम्मीने सांगण्यास सुरवात केली. ही नताशा. ही मुलगी सकाळी साधारण ९ च्या सुमारास एकटीच गेटवे ला आली होती. तिच्या जवळ बऱ्यापैकी पैसे होते. ती तेथील लहान-लहान फेरीवाल्या मुलींबरोबर खेळू लागली. तिच्या बोलण्यावरून ती त्यावेळच्या प्रसिद्ध व देखणा सिनेकलाकार धर्मेंद्रची चाहती होती. त्याला भेटण्यासाठी ती घरच्यांना न सांगता मद्रासहून मुंबईला रेल्वेने आली होती. तिच्या बरोबर खेळणाऱ्या मुलींकडून अम्मा सिनेमात काम करते असे समजल्यावरून तिने अम्मीशी ओळख करून घेतली. त्या दोघींची सिनेमा वरून चांगलीच गट्टी जमली. अम्मा तिला सिनेमातल्या गमती-जमती सांगू लागली. नताशा अम्मिला धर्मेन्द्र बद्दल अनेक प्रश्न विचारीत होती. त्याच्या बद्दल जाणून घेण्यातच तिला अधिक रुची होती. अशाच तिच्याशी गप्पा मारताना संध्याकाळ कधी झाली ते समजलेच नाही. अचानक अम्मीला या नाताशाचे आता काय करावे ही चिंता भेडसावू लागली. त्यामुळे ती तिला तिच्या सुरक्षेसाठी पोलीस स्टेशन ला घेउन आली.

ही हकीकत ऐकताच मी प्रथम अम्मीचे आभार मानले. कुलाब्या सारख्या ठिकाणी अशी ही सुंदरी एकटीच आहे असे कळल्यावर तिचे काय झाले असते याची कल्पनाही करवत नव्हती. मी ताबडतोब खिशातून १० रुपयाची नोट काढून तिला बक्षिस दिली. खरेतर तिने बजावलेली कामगिरी अनमोल होती. मी पुन: एकदा तिचे आभार मानले व नताशास ताब्यात घेउन तिला तिच्या जबाबदारीतून सोडवले.

नताशापाशी विचारपूस करता तिने तिचे नाव नताशा * * * * * * असे सांगितले. तिच्या कडून कळले की तिचे वडील मद्रास शहरातील एक प्रख्यात असे उद्योगपती असून मरीना बीच वरील एका भव्य प्रसादात ते राहतात. ती ख्रिस्ती धर्माची असून तिने नुकतीच दहावीची परीक्षा दिलेली होती. तिला इंग्रजी तसेंच हिंदी चांगले बोलता येत होते. ती धर्मेंद्र या प्रख्यात कलाकाराची चाहती होती. त्याच्या भेटी साठी ती वेडी होती. तिचे धर्मेंद्र यास कसेही करून भेटायचे हेच तिचे त्य वेळचे स्वप्न होते. तिच्याकडून मी तिच्या वडिलांचा पत्ता घेतला व त्या पत्त्यावर नताशा मुंबई येथील कुलाबा पोलीस स्टेशनला सुखरूप असल्याची व तिला घेउन जाण्यास तिच्या घरच्यांना कळविण्यास मद्रास पोलीस कंट्रोलरुम ला बिन-तरी संदेश दिला.

नताशा फार लोभसवाणी व बोलघेवडी होती. ती माझ्यापाशी तिची धर्मेंद्रशी गाठ घालून देण्याचा हट्ट धरून बसली. तिचा वेडेपणा पाहून मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिने धर्मेंद्र्शी गाठ घालून द्या हा एकच ठेका धरला.

मला त्यावर एक युक्ती सुचली. माझ्या टेबलावर एक फोन होता तसेंच दुसऱ्या खोलीत ज्यास आम्ही रायटर ची खोली म्हणून संबोधित असू, तेथे एक फोन होता. नताशा तिची हकीकत सांगत असताना तेथे माझा एक सहकारी देखील उपस्थित होता. त्यास मी त्या दुसऱ्या खोलीत जाऊन फोन घेण्यास खुणावले. तो तेथे गेल्यावर मी माझ्या टेबल वरील फोन वरून रायटर च्या खोलीत फोन लावला. माझ्या सहकार्याने तो उचलताच मी मोठ्या अदबीने म्हणालो ‘क्या मै धर्मेंद्र्जीसे बात कार सकता हू? अच्छा! धर्मेद्र साहब आपही हो! गुड इव्हिनिंग सर्, मै कुलाबा पोलीस स्टेशनसे ड्यूटी ऑफिसर बोल रहा हू. मेरे सामने १५-१६ साल की एक कन्या है. वह मद्रास से यहा आपसे मिलने आयी है. क्या आप उससे बात करोगे? अगर आप उससे बात करोगे तो उसे बहोत प्रसन्नता होगी’. असे म्हणून मी फोन तिच्या हाती दिला व धर्मेद्रजीसे बात करो असे सांगितले. तिला क्षण भर काहीच सुचेना. आपणाशी प्रत्यक्ष धर्मेंद्रजी बोलणार या कल्पनेनेच ती भारावून गेली. तिचा तिच्यावरच विश्वास बसेना. तिने थरथरत्या हातानेच रिसिव्हर जवळ घेतला, पण तिच्या ओठातून शब्दच फुटत नव्हता. माझा सहकारी धर्मेंद्रची भूमिका चोख वठवत होता. त्याने तिला बोलते केले व तिला मद्रासला आल्यावर भेटण्याचे अश्वासन दिले. तिनेही मोठ्या हिरहिरीने तिचा पत्ता दिला आणी संभाषण संपले.

तिला धर्मेंद्रशी प्रत्यक्ष बोलण्यास मिळाल्याने तिचा आनंद गगनात मावत नव्हता. तिचा त्या वेळचा आनंद आणी चेहऱ्या वरचे भाव अवर्णनीय होते.

मी नताशास आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसमोर उभे केले व त्यांना सर्व सविस्तर घटना सांगितली. त्यांनी देखील तिच्याकडे काही चौकशी केली. या वेळेपर्यंत मद्रास शहर पोलीस कंट्रोल रुम मधून नताशाचे वडील दुसरे दिवशी सकाळीच विमानाने निघत असल्याचा संदेश मिळाला होता. आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी त्यांचे वरिष्ठांशी संपर्क साधून त्यांचेशी सल्ला-मसलत करून असे ठरले की तिला रात्रीची बालसुधारगृहात न पाठवता पोलीस नियंत्रण कक्षातून दोन महिला पोलीस मागवून त्यांच्या देखरेखीखाली पोलीस ठाण्यातच ठेवायचे. सकाळी तिचे वडील आल्या नंतर कायदेशीर बाबी पूर्ण करून त्यांच्या ताब्यात तिला द्यावयाचे.

मला दुसरे दिवशी वरळीला बंदोबस्तास सकाळी ८ वाजता जावयाचे होते.

दुसरे दिवशी सकाळी साधारण ११:३० च्या सुमारास बंदोबस्ताच्या ठिकाणी नताशा आली. तिच्या बरोबर मध्यम वयाचे व रुबाबदार व्यक्तिमत्वाचे एक गृहस्थ देखील होते. नताशाने त्यांची ओळख तिचे पप्पा म्हणून करून दिली. भारदस्त व्यक्तिमत्वाच्या त्या गृहस्थांनी अचानक पणे अक्षरश: माझे पाय धरले. मला ते फार अवघड वाटले. मी ओशाळून त्यांना तसे ना करण्याबद्दल विनवले. ते पुन: पुन्हा माझे आभार मानू लागले. मी त्यांना नम्र पणे सांगितले की जर त्यांना आभार मानायचेच असले तर त्या ‘अम्मा’ चे माना. तिने खरोखरच आपल्या सर्वांवर अनंत उपकार केले आहेत. नताशाला सांभाळून योग्य ठिकाणी पाठविणे हे तर माझे कर्तव्यच होते. ते फक्त मी पार पाडले. त्यांनी माझा हात हलकेच दाबला. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव ओथंबलेले होते. त्यांनी मला स्वत:चे भेट कार्ड देऊन माझे कोणतेही व कोठेही काम असले तरी नि:संकोचपणे सांगण्याची विंती केली. मी त्यांना शक्य असल्यास नताशाची अन धर्मेद्र्जींची एकदा तरी भेट घालून द्या असे सांगितले. त्यांच्या सदभावा बद्दल मी त्यांचे आभार मानले. जाता जाता मुंबई पोलिसांचा आता पर्यंत केवळ लौकिकच ऐकला होता पण आता त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेउन त्याची प्रचीती आली हे सांगण्यास विसरले नाहीत.

माझ्या ३५ वर्ष्याच्या प्रदीर्घ पोलीस सेवेत असंख्य बक्षिसे व प्रशस्ती पत्रे मिळाली पण नताशाच्या वडिलांनी कृतज्ञतेचे गाळलेले दोन अश्रुंचे मोल त्या सर्वांहून माझ्यासाठी फार मोठे आहे.

—  अविनाश यशवंत गद्रे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..