सकाळचा गोंधळ संपल्यावर मी सुटकेचा निश्वास टाकला. मला सोमवारी कळणार होते की, मी कुठे जाणार होते, तरीही आता एक दिलासा होता की जर का आपल्याला कम्फर्टेबल वाटले नाही तर आपल्याला कोणीही जबरदस्ती दुसरीकडे शिफ्ट करणार नाही.
त्यामुळे शांतपणे सकाळचे आवरून नाष्टा- जेवण उरकेपर्यंत आम्हाला दोन वाजले. आम्ही परेशची वाट बघत होतो. तो सुद्धा आमच्याबरोबर साईट सिइंगला येणार होता. त्यानेही जास्त काही पाहिले नव्हते.
मला लंडन मध्ये येऊन आता तीन आठवडे झाले होते आणि मी अजून एकही पर्यटन स्थळाला भेट दिली नव्हती. लंडनला यायचे जेव्हा ठरले, तेव्हाच माझी ‘मस्ट वॉच’ लिस्ट तयार होती.
‘ कोहिनूर हिरा’, ‘ शिवाजीची महाराजांची भवानी तलवार’, ‘क्रिकेटची पंढरी – लॉर्ड्स’ आणि टेनिस ची काशी ‘विम्बल्डन – सेंटर कोर्ट’ या चार गोष्टी मी न बघता आले असते तर मी लंडनला गेलेच नाही, असे मला वाटले असते.
माझ्याप्रमाणेच उमेशची ही यादी तयार होती. पहिले दोन स्पॉट तर आमचे कॉमन होते. त्याच्या बाकीच्या लिस्टमध्ये ‘मादाम तुसाद म्युझियम’, ‘ग्रीनिच’ ,’टॉवर ब्रिज’ अशा काही गोष्टी होत्या.
‘कोहिनूर’ हे आमचे सर्वात प्रमुख आकर्षण होते आणि तो हिरा ‘टॉवर ऑफ लंडन’ मध्ये असल्याचे आम्हाला माहिती होते. त्यामुळे आम्ही पहिला पसंती ‘टॉवर ऑफ लंडन’ ला दिली.
‘प्लेसेस टू व्हिजिट’ मध्ये दिल्याप्रमाणे, आम्ही सेंट्रल लाईन स्टेशनला जायचे आणि बँक स्टेशनहून डिस्ट्रिक्ट लाईन घेऊन ‘टॉवर हिल’ स्टेशनला उतरायचे असे ठरवले.
परेश आल्याबरोबर आम्हीं लगेच स्टेशन कडे कूच केले. बरोबर, ट्रेनचा पास, मला एअरपोर्टवर मिळालेले कॅटलॉग, पैसे आणि पाण्याची बाटली, बिस्कीटचे पुडे असे जवळ ठेवले.
आम्ही अगदी भर दुपारच्या चांदण्यात म्हणजे अडीच वाजता निघालो होतो. पण हे उन लंडनचे असल्यामुळे तेवढेच शितल होते.
ठरवल्याप्रमाणे टॉवर हिल स्टेशन ला उतरलो. स्टेशनच्या बाहेर आलो, तर बाहेर जत्रा भरल्या सारखे वातावरण होते. हा समर सीझन असल्यामुळे बहुतेक यात्रेकरू याच सीझनमध्ये लंडनला व्हिजिट करतात. त्यामुळे खूप छान वातावरण तयार झाले होते. ठीक ठिकाणी खाण्यापिण्याचे स्टॉल्स होते. एवढी गर्दी असूनही कुठेही कचरा नव्हता. सगळीकडे स्वच्छ रस्ते होते. आम्हीही आता त्या जत्रेचा एक भाग बनलो.
बाहेर एक सावली वर चालणारे घड्याळ होते. आम्ही तिथे उभे राहून फोटो काढले. आजूबाजूला सुंदर नजारा होता. लंडनमध्ये आत्तापर्यंत मी दोन किंवा तीन मजली कन्स्ट्रक्शन पाहिली होती. पण आसपास नजर टाकल्यावर त्यामानाने उंच कंस्ट्रक्शन, चर्चे आकाशात घुसलेले उंच सुळके , नवीन -जुन्या बांधणीचा सुरेख संगम असे दृश्य दिसत होते.
एका कोपऱ्यात मला एका कालव्यासारखे काहीतरी दिसले. त्या कालव्याचा दुसरा काठ ही लगेच दिसत होता. मी विचार केला, हीच का ती फेमस ‘थेम्स’ नदी? छोटीच तर दिसतेय आणि त्याचं किती कौतुक? त्यापेक्षा आमच्याकडे गंगा, नर्मदा, कृष्णा, कोयना येऊन बघा!
नदीच्या किनारी हे ‘टॉवर ऑफ लंडन’ वसलेले होते. तो एक पूर्वीचा किल्ला होता. किल्ल्याच्या भोवती पूर्ण तटबंदी होती. हा किल्ला मला तर आपल्या दिवाळीच्या किल्ल्यां सारखा वाटला. आपल्या रायगड, राजगड अशा किल्ल्यांपुढे हा फारच फिका वाटत होता. ब्रिटिशर म्हणूनच आपल्या गडकिल्ल्यां मध्ये इतकी वर्ष अडकून पडले असणार!
पण या किल्ल्यात आपला ‘कोहिनूर’ होता ना, त्यामुळे जीवावर उदार होऊन साडेतेरा पौंडाचे तिकीट काढले.
आम्ही आता किल्ल्याच्या आत शिरलो. तिथे दोन तीन वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन्स होत्या. त्यातलेच एक ‘ज्वेल हाऊस’ होते. त्यात हिरा होता असे आम्हाला तिथल्या कॅटलॉग वरून कळले. तिथे एका जुन्या बांधणीच्या किल्ल्याबाहेर एक गार्ड उभा होता. त्या इंग्लिश गार्ड बरोबर उभे राहून सर्वजण फोटो घेत होते. त्याने टिपिकल ब्रिटिश रॉयल गार्डचा वेश परिधान केला होता. काळी उंच फरची कॅप, लाल लांब बाह्यांचा डगला आणि काळी तुमान. सभोवतालच्या हिरवळीवर आणि मागच्या व्हाईट बॅकग्राऊंडवर तो खूप उठून दिसत होता. त्याच्या गोऱ्या रंगाला ही तो खूप सूट होत होता.
आम्ही त्याच्याबरोबर फोटो घेतले. सगळे त्याच्याबरोबर फोटो घेत होते. पण तो इतका शांत उभा होता, की त्याच्या चेहऱ्यावरची माशी पण हलत नव्हती.
कशी हलणार? माशा कुठे होत्या लंडन मध्ये? तीन आठवड्याच्या मुक्कामात मी माणसंच कमी पाहिली होती, तिथे किडा मुंग्यांचे काय!! माझ्या पूर्ण स्टे मध्ये मी एकही डास, माशी, पाली, झुरळं असले प्रकार बघितले नव्हते. त्यामुळे मी जास्त खुश होते.
ज्वेल हाऊस मध्ये आम्ही प्रवेश केला. प्रवेश केल्यावर मोठे मोठे टीव्ही स्क्रीन होते. त्यात वेगवेगळे ज्वेल्स चमकत होते. त्यातच मला कोहिनूर हिरा दिसला. एक क्षण असे वाटले, हे काय फक्त टीव्हीवर बघायचं की काय?
आम्ही तसेच घाईघाईत पुढे निघालो. पूर्वीच्या राजा-राणीची ड्रेपरी, तलवारी, विविध आयुध, त्यांनी वापरलेले दागिने, त्यांचे मुकूट खूप काही गोष्टी होत्या. आम्ही ते पटापट बघत पुढे चालत होतो. आम्हाला कशातही इंटरेस्ट नव्हता आणि एके ठिकाणी खूप गर्दी दिसली. हॉलच्या मध्यभागी एक काचेचे केबिन असल्यासारखी जागा होती आणि तिथे बऱ्यापैकी गर्दी दिसली. आम्हाला कळले जे बघायला आम्ही उत्सुक आहोत ते तिथेच आहे. पटापट तिथे पोहोचलो. लंडन आणि रांग याचा एक अतूट संगम आहे. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला रांगेतच थांबावे लागते.
त्याबाबतचा एक सुंदर प्रसंग आठवला.
मी एकदा ऑफिसला जात असताना परत काहीतरी गाड्यांचा गोंधळ झाला होता. प्लॅटफॉर्म फुल झाला होता. मी आत मध्ये शिरले आणि प्लॅटफॉर्म बघितला तर माणसांनी भरलेला होता. अगदी आपल्या मुंबई ठाण्याच्या प्लॅटफॉर्म सारखा. बराच वेळ ट्रेन आली नव्हती आणि इंडिकेटरवर ‘डिलेड’ असा बोर्ड होता. तरीही सर्व शांतपणे उभे राहून ट्रेनची वाट बघत होते. गोंधळ नाही, गडबड नाही आणि गप्पाष्टक तर मुळीच नाही. प्लॅटफॉर्म भरल्यावर रेल्वे गार्डने मेन गेट बंद केल होत. 4- 5 मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर ट्रेन आली आणि पुढे जे काही घडलं, ते माझ्या कल्पनेच्या पलीकडचे होते. ट्रेन आल्या आल्या सर्वांनी व्यवस्थित लाइन लावून शांतपणे आत चढले. घुसखोरी कुठेच नव्हती. मला ते खूप आवडले.
तसेच आता ही इथे लाईन होती आणि त्या केबीनच्या भोवती एक फिरता वॉकर बेल्ट होता. त्या वॉकर बेल्ट वर उभे राहून केबिन मध्ये ठेवलेल्या अमूल्य ठेव्याचे दर्शन घेत येत होते. तुम्ही जास्त वेळ तिथे रेंगाळू नये म्हणून केवळ तो वॉकर बेल्ट असावा.
आम्ही शांतपणे लाईन मध्ये उभे राहिलो आणि जेव्हा आम्ही ‘कोहिनूर’ जवळ पोचलो, ते चकाकते सौंदर्य डोळे भरून बघितले. पण वॉकर बेल्टमुळे 5-6 सेकंदच बघायला मिळत होते. तिथेच शेजारी राणीचा क्राऊन होता, त्यातही ‘कोहिनूर’ चा एक भाग बसवलेला होता. पण ओरिजनल कोहिनूर हिरा अप्रतिम होता की, त्याचे वर्णन करायला शब्दच अपुरे होते. कोहिनूर हिराच्या दर्शनाने आमचे डोळे असे चमकले, जसे काही कोहिनूर डोळ्यात उतरला आहे!!
याच साठी केला अट्टहास!!
पाच सेकंद दर्शन घेऊन मन भरले नाही. मी आणि उमेशने मोजून सात वेळा त्या बेल्टवर लायनीत थांबून ‘कोहिनूर’ चे दर्शन घेतले. कितीही बघितले तरी समाधान होत नव्हते. दरवेळेला हिऱ्याची काहीतरी वेगळीच बाजू समोर येत होती.
पण आता निघणे सुद्धा भाग होते नाही तर तिथल्या सिक्युरिटी गार्डला भलताच संशय आला असता. मन भरून दर्शन घेतल्यावर आम्ही बाहेर पडलो. आलोच आहोत तर इतरही गोष्टींचे दर्शन घेतले. मग ज्वेल हाऊस मधून बाहेर आल्यावर आजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये जाऊन त्यांची हिस्टरी, ठेवलेल्या आठवणीच्या गोष्टी पाहिल्या. तिथे एका ठिकाणी जेलसारखे होते. पूर्वीचे राजे लोक कैद्यांचा कसे छळ करायचे याचेही प्रदर्शन तिथे होते. ते बघायला फारच त्रासदायक होते. असो.
असे दोन एक तास आम्ही त्या टॉवर ऑफ लंडन मध्ये घालवून समाधानाने बाहेर पडलो. बाहेर सोव्हेनियर शॉपमध्ये मी ‘ज्वेल ऑफ लंडन’ ची व्हिडीओ कॅसेट आई-बाबांसाठी विकत घेतली. घेताना ‘ह्यात कोहिनूर हिरा आहे ना’ असे दहा वेळा कन्फर्म केले. आई बाबा कोहिनूर पर्यंत पोहोचू शकत नव्हते, म्हणून कोहिनूर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझी ही धडपड होती.
तिथून निघून आम्ही चालत चालत फेमस ‘टॉवर ब्रिज’ ला गेलो. एखादे मोठे शिप जर का ‘थेम्स’ नदीतून जात असेल तर टॉवर ब्रिज मधोमध दुभंगून वर उचलला जातो, मग शिप तिथून पास होते.
आत्तापर्यंत मला ‘लंडन ब्रीज’च मधोमध दुभंगून वर उचलला जातो असं वाटत होतं. पण ‘लंडन ब्रिज’ एक वेगळीच केस आहे. आम्ही ‘टॉवर ब्रिज’ ला पोहोचलो, तेव्हा कुठलीही शिप येणार नव्हती. त्यामुळे ते बघणे आमच्या नशिबात नव्हते. आम्ही टॉवर ब्रिज वर उभे राहून फोटो काढले.
आता मला थेम्स नदीचे खरे दर्शन झाले आणि तिथे एवढे कौतुक का होता हेही जाणवले. रुंदीने फारशी नसली तरी ती पूर्ण लंडनभर खूप सुंदर नजाकतदार वळणे घेत जाते. मी नजर टाकत होते तेथे सर्वदूर ‘थेम्स नदीची’ ही वलये दृष्टीस पडत होती. खूपच नाजूक आणि मोहक नदी वाटली.
तिथून आम्ही परत ‘टॉवर हिल’ स्टेशनला आलो. डिस्ट्रिक्ट लाईने वेस्टमिनिस्टरला गेलो. तिथे लंडनचे पार्लमेंट हाऊस आहे. त्याचे ‘विक्टोरिया टॉवर’ आणि ‘बिग बेन, हे दोन फेमस टॉवर्स आहेत. दोन्ही टॉवर्स वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शनचे आहेत. ‘बिग बेन’ वर एक मोठे घड्याळ आहे. ‘विक्टरिया टॉवर्स’ मध्ये त्रिकोणी आणि त्याच्या बाजूला चार मिनार सारखे चार सुळके असा आहे. दोन्हीवर ही फार सुंदर डिझाइन्स आहे.
पूर्ण वेस्टमिन्स्टर थेम्सच्या काठावर बसले आहे. रात्री त्याचे दिव्यांच्या झगमगाटातले सुंदर प्रतिबिंब नदीमध्ये पडलेले दिसते. आम्ही तिथे असताना फारसा अंधार नव्हता त्यामुळे आम्हाला पूर्ण प्रतिबिंब बघता आले नाही. आजूबाजूचा परिसरही स्वच्छ, सुंदर, सगळीकडे हिरवळ असा आहे. दिवसभराच्या धावपळीने आम्ही जरा आता दमलो होतो. विक्टोरिया टावरच्या बाजूलाच विक्टोरिया गार्डन होते, तिथे आम्ही मस्तपैकी हिरवळीवर बसलो. बरोबर काहीतरी खायला पण घेतले होते. आजूबाजूला नजर टाकली, तिथं काही टूरिस्ट आडवे झाले होते. आम्हालाही काही वाटले नाही, आम्ही जरा पाच मिनिटं पाठ टेकली. आणि एक छोटीशी डुलकी काढली. खूप शांत वाटले. फ्रेश उठलो आणि परत घराची वाट धरली.
प्रत्येक पर्यटन स्थळाच्या आसपास तुम्हाला ती मोहक ‘थेम्स नदी’ दर्शन देत रहाते. त्यामुळे ती मनावर चांगलीच ठसली होती. तिचे ते रूप मनात साठवत त्या दिवशी झोपले!!
– यशश्री पाटील
Inside Tower of London
first ever site of Tower Bridge
My desk in office at Green Park
–
Umesh with security Guard in Tower of London
Leave a Reply