नवीन लेखन...

काश्मीर, दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबींवर आप पार्टीची ठोस भूमिका जरुरी

आता प्रशांत भूषण यांनी नक्षलग्रस्त भागातील निमलष्करी दलांच्या नियुक्तीसंदर्भात जनमत घेण्याची मागणी केली. याआधी काश्मीरमधील लष्कराच्या नियुक्तीसंदर्भात जनमत घेण्याची मागणी त्यांनी केली होती. काश्मीर, नक्षलवाद हे राष्ट्रीय प्रश्न आहेत. या महत्त्वाच्या आणि संवेदनशील असलेल्या प्रश्नांबाबत कोणत्याही राजकीय पक्षाने उथळ भाष्य करणे चुकीचे आहे. आपल्या चुकीच्या वक्तव्यांचा परिणाम संरक्षण यंत्रणांच्या मनोधैर्यावर होऊ शकतो.

याआधी प्रशांत भूषण यांनी जम्मू-काश्मीरमधील लष्कर हटवावे, अशी मागणी केली होती. काश्मीरातील लष्कर हटविण्याची मागणी करण्यामागे अल्पसंख्यकांची गठ्ठा मते गोळा करण्याचा या पक्षाचा विचार असेल तर तो त्या पक्षालाच महागात पडणार आहे. अशा देशघातकी मागण्यांचे कोणताही देशप्रेमी समाज कदापि समर्थन करू शकणार नाही.

प्रशांत भूषण नक्षलवाद्यांचे उघड समर्थन

अतिरेक्यांना मदत होईल, अशी विधाने करणार्‍या कलंकित लोकांना आप पार्टीत कशी काय जागा मिळाली? प्रशांत भूषण, अरुंधती रॉय, तिस्ता सेटलवाड असा देशविरोधी मते प्रदर्शित करणारा एक ग्रुप फार आधीपासून कार्यरत आहे. प्रशांत भूषण नक्षलवाद्यांचे उघड समर्थन करणारे आहेत. काही दिवसांपूर्वी गडचिरोलीत पकडल्या गेलेल्या दोन नक्षलसमर्थित युवकांचे संबंध दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक साईबाबा यांच्याशी असल्याचे उघड झाले होते. या साईबाबांची चौकशी करण्यासाठी गडचिरोलीचे पोलिस गेले असता, तेथे प्रशांत भूषण, तिस्ता सेटलवाड, अरुंधती रॉय या उपस्थित होत्या. हा ग्रुप छुप्या मार्गाने देशातील लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात सातत्याने भूमिका मांडत असतो आणि अतिरेकी, नक्षल्यांना बळ मिळेल, अशी विधाने करीत असतो, त्यांना अप्रत्यक्षपणे मदत करीत असतो. हे लोक जर स्वस्त लोकप्रियतेच्या हवेवर स्वार होऊन सत्तेत आले, तर देशाचे भवितव्य काय असेल, याचा विचार या देशातील सुबुद्ध जनतेने करायला हवा.

जम्मू-काश्मीरमधील लष्कर हटवण्याची मागणी पाकिस्तानने वारंवार केलेली आहे. पाकिस्तानला काश्मीरमध्ये धुडगूस घालायचा आहे, परंतु जोपर्यंत तिथे लष्कर आहे तोपर्यंत त्यांना काही करता येत नाही. त्यामुळे ज्या-ज्या वेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा झाली त्या प्रत्येक वेळी पाकिस्तानच्या नेत्यांनी काश्मीरमधील लष्कर हटवण्याची मागणी पुढे केली. भूषण यांना ही गोष्ट समजत नाही की, पाकिस्तान सरकार जी मागणी करते तीच आपण करता कामा नये. परंतु भारतामध्ये काही स्वयंघोषित मानवाधिकारवादी नेते आहेत. भारतीय लष्कराकडून काश्मिरी लोकांचा छळ होतो, अशी अधूनमधून आवई ते उठवत असतात. नेमका भूषण यांनी असे वक्तव्य करून तोच राग आळवला. काश्मीरातील फुटीर गट आणि त्यांच्या जीवावर राजकारण करणारे काही स्थानिक मतलबी राजकीय नेते त्यांच्या देशघातकी, समाजघातकी डावपेचासाठी जी मागणी सातत्याने करीत आहेत. तीच मागणी आम आदमी पार्टीच्या प्रशांत भूषण यांच्यासारख्या उच्चविद्याविभूषित आणि ज्येष्ठ नेत्याने उचलून धरावी, ही त्या पक्षाच्या भावी राजकारणाबद्दल संभ्रम निर्माण करणारी बाब आहे.

देशद्रोही भूमिका प्रशांत भूषण यांनी यापूर्वीही मांडली होती

काश्मीरला स्वातंत्र्य देण्यात यावे किंवा तेथील जनतेची इच्छा असल्यास त्यांना पाकिस्तानमध्ये समाविष्ट होऊ द्यावे, अशी अत्यंत देशद्रोही भूमिका याच प्रशांत भूषण यांनी यापूर्वी मांडली होती. त्यावेळी ते अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सहभागी होते. मात्र, अण्णा हजारे यांनी त्यांच्या त्या वक्तव्याची तडकाफडकी गंभीर दखल घेऊन त्यांना खडसावले होते.

काश्मीरमधील लष्कराच्या उपस्थितीबद्दल सार्वमत घेण्यात यावे, असे सुचवून एकप्रकारे त्यांनी भारतीय लष्कराच्या तेथील अस्तित्वालाच आव्हान देण्याचा केलेला प्रयत्न आत्मघातकी स्वरुपाचाच ठरू शकतो. पाकिस्तानने १९४८ साली अचानकपणे घुसखोरी करून अर्धा काश्मीर घशाखाली घातला. १९६५ मध्ये आणि १९७१ मध्ये काश्मीरचे लचके तोडण्याचे प्रयत्न केले. पंधरा वर्षांखाली कारगिलमध्ये घुसखोरी करून भारताचा भूभाग बळकावण्याचा खटाटोप केला. गेल्या तब्बल पंचवीस वर्षांपासून पाकिस्तानी हद्दीतून घुसखोरी सुरू आहे. पाकिस्तानी हद्दीतून पुरविलेली शस्त्रे, प्रशिक्षण, पैसा आणि मनुष्यबळ यांच्या जोरावर दहशतवाद्यांचा हैदोस सातत्याने सुरू आहे. या हैदोसात हजारो निरपराधांचे बळी गेले आहेत, दहशतवाद्यांनी तेथील पर्यटनाचा व्यवसाय पूर्णपणे मोडीत काढल्याने स्थानिकांवर बेरोजगारी ओढवली आहे.

राज्यातील जनतेला सुरक्षिततेची हमी देण्यासाठी भारतीय लष्कराला तेथे रात्रंदिवस जागरुक रहावे लागते. आजवर भारतीय लष्कराच्या अक्षरशः हजारो जवानांना तेथे स्वतःचे रक्त सांडावे लागले आहे. जनतेच्या रक्षणासाठी झटणारे भारतीय लष्कराचे जवान काश्मीरात तैनात आहेत म्हणूनच काश्मीरातील जनता आपले दैनंदिन व्यवहार पार पाडू शकते. भारताचे लष्कर सध्याच्या परिस्थितीत तिथून हटविणे म्हणजे काश्मीरातील भारतीय जनतेला शत्रूच्या तोंडी देण्यासारखाच तो प्रकार ठरतो. प्रशांत भूषण यांची मागणी कोणत्याही राष्ट्रप्रेमी भारतीयाला सहन होणारी नाही. आम आदमी पार्टीने यांनी धुडकावायला हवी होती. मात्र केजरीवाल यांनी प्रशांत भूषण यांची ती मागणी वैयक्तिक आहे, एवढे मोघम सांगून एवढय़ा गंभीर विषयाला फाटा देण्याचा प्रयत्न म्हणजे एकप्रकारे भूषण यांच्या मागणीचे समर्थनच ठरते. दिल्लीतील निवडणुकीपूर्वी एका कट्टर धार्मिक नेत्याचे समर्थन घेण्याचा प्रयत्न केजरीवाल यांनी केला होता.

पक्षाच्या भावी वाटचालीचे दर्शन?

भूषण म्हणाले, ‘आप’ केंद्रात सत्तेत आल्यास काश्मीरातून सुरक्षा दले काढून घेणे व सशस्त्र दलाच्या विशेषाधिकारांबाबत सार्वमत आजमाजवले जाईल. भाजप प्रवक्ते मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, ‘दहशतवाद्यांचीच भाषा तुम्ही बोलत आहात. हे तर दहशतवाद्यांचे प्रतिष्ठित चेहरे आहेत.’केंद्रीय मंत्री मनीष तिवारी टीका म्हणाले, ‘काश्मीरसारख्या संवेदनशील मुद्यावर बोलताना त्यांनी भान ठेवले पाहिजे.’ डाव्या पक्षांनीही प्रशांत भूषण यांच्यावर परखड टीका केली.

ज्या आम आदमी पक्षाचे ते नेते आहेत त्या पक्षाचे हे धोरण आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेवटी केजरीवाल यांनी खुलासा केला, काश्मीर हा भारताचा अविभाज्यभाग आहे. मात्र जनभावना देखील जाणून घेतल्या पाहिजेत.’ असेही केजरीवाल यांनी सुनावले.ओपिनीयन पोल घेऊन तुम्ही राज्य कारभार करणार असाल तर सरकारची गरजच काय?जनतेने एकदा निर्णय घेण्यासाठी सत्ता दिल्यावर जनमताची आवश्यकता काय? राष्ट्रीय सुरक्षा, विदेश नीती, आर्थिक धोरण अशा महत्वाच्या विषयातही जनमत घेतलं जात असेल तर निर्णय घेण्यास तुम्ही सक्षम नाही असा अर्थ होतो. लोकांच्या भल्याचे निर्णय घेण्यासाठी जनतेने तुम्हाला सत्ता दिलेली असते.

काश्मीर,दहशतवाद, बाबींवर ठोस भूमिका जरुरी

राजदीप सरदेसाई यांनी केजरीवाल यांच्या घेतलेल्या मुलाखतीबाबत एक फेसबुक पोस्ट सध्या सर्वत्र फिरत आहे. त्यात युट्यूबचा संदर्भ दिला आहे. यात म्हटले आहे की, ‘अरविंद केजरीवालने ऑन कॅमेरा इंटरव्यू देनेसे पहले शर्त रखी थी की उन्हे आतंकवाद, कश्मीर, बांगला घुसपैठिये इन मुद्दोंपर सवाल नही पूछे जाने चाहिए| और सवाल पूछतेही वो स्टुडियो छोडकर भाग गए’.

आता काश्मीर प्रश्नावर सरळ सरळ फुटीरतावाद्यांची भाषा प्रशांत भूषण यांच्यासारखे या पक्षाचे नेते बोलू लागले आहेत. काश्मीरमध्ये सैन्य जसे दहशतवाद्यांना डाचते आहे, तसे ते भारतातील या दीडशहाण्या बुद्धिवाद्यांना डाचते आहे. संवेदनशील प्रश्नावर आपल्या पक्षाचे मत काय आहे, हे मात्र केजरीवाल यांना ठरवावेच लागणार आहे.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..