आपण परदेशात गेल्यावर तिथं कोणी भारतातील, त्यातूनही महाराष्ट्रातील, नशीबाने पुण्यातील माणूस भेटला की, जो आनंद होतो.. त्याचं शब्दांत वर्णन करणंही अवघड आहे. कारण त्यात एकप्रकारचा आपलेपणा, आपुलकी असते.
तसंच आपण जिथं राहतो, त्या परिसरात मराठी माणसाचं दुकान दिसलं तर आपण पहिल्यांदा त्याच दुकानात खरेदीला जातो. माझं बालपण तर सदाशिव पेठेतच गेलं. तेव्हा मराठी माणसांची दुकानं भरपूर होती. अगदी भाजीवाल्यापासून ते मिठाईवाल्यापर्यंत!
सकाळी मारुती सावंत हा फुलवाला, सायकलवरून फुलपुडा घरी आणून द्यायचा. दुधासाठी भोरवाल्यांची रामेश्वर डेअरी जवळच होती. वर्तमानपत्रासाठी गोखले यांचं छोटं दुकान होतं. कोपऱ्यावरच भाजीवाले देसाई होते. त्यांच्या अलीकडे करंदीकर टेलर्सचं दुकान होतं. कपडे आल्टर करणारे गणोरे, गिरणी जवळच होते. त्यांच्या समोरच माटे यांचं मिठाईचे दुकान होतं. त्यांना लागूनच डोंगरे यांचं किराणा मालाचं छोटं दुकान होतं. आमच्या घरासमोर पारसवार यांचं भलं मोठं किराणा मालाचं दुकान होतं. एकाच घरातले सर्वजण त्या दुकानात गुण्यागोविंदाने काम करीत असत. गणपतीच्या दिवसांत दुकानात गणेशमूर्तींची विक्री होत असे. दिवाळीतील लक्ष्मीपूजनाला ते कुटुंबासह भरपूर आतषबाजी करीत असत. त्यांच्या पलीकडे डाॅ. ढमढेरे यांचा दवाखाना होता. आमच्यापैकी कुणी आजारी पडलो की, त्यांच्याच दवाखान्यात जात असू. आमच्या शेजारची पिठाची गिरणी देखील बापट वकीलांची होती. सर्व महाराष्ट्रीयन माणसं आनंदात रहात होती.
पेरुगेटकडे जाताना एक घड्याळ दुरुस्तीचं बोकील यांचं दुकान होतं. त्यांना ऐकायला कमी येत असे, त्यांच्याशी काही बोलायचं झाल्यास मोठ्या आवाजात बोलावं लागे. त्याला लागूनच प्रपंच वाचनालय होतं. त्यांच्या पलीकडे एस बी अॅण्ड कंपनीचं ‘विविध भांडार’ हे सर्व प्रकारच्या वस्तू मिळणारं एकमेव दुकान होतं. अजून पुढे गेलं की, म्हस्के यांचं सायकल मार्ट होतं. त्यांच्या समोरच दळवी यांचं हेअर कटींग सलून होतं. कोपऱ्यावर पाटील यांची पानपट्टी होती. म्हातारे मिशावाले पाटील शेठजीसारखी लाल रंगाची टोपी घालून बसलेले असायचे. त्यांना लागूनच मराठी साहित्यिक दि. बा. मोकाशी यांचं रेडिओ दुरुस्तीचं दुकान होतं. त्यांच्याकडं कोणी ना कोणी गप्पा मारत बसलेलं असायचं. चौकात कोपऱ्यावर माटेंचं सलूनचं दुकान होतं. त्याच्या शेजारी मोडक यांचं शिलाई मशीनचं दुकान होतं.
पुढच्या चौकात कोपऱ्यावर काशिनाथ येमूल यांच्या पानपट्टी शेजारी भावे यांचं एक छोटं स्टेशनरीचं दुकान होतं. दुकानाला पाटी होती की नाही याकडे मीच काय कुणीही कधी पाहिलं नाही. त्या आठ बाय आठ फूटच्या दुकानात भावे कायम उभे राहिलेले असायचे. साधारण उंचीचे भावे पांढरी बंडी किंवा झब्ब्यात असायचे. खाली पायजमा. तुरळक केस मागे वळवलेले, नाकावर चष्मा. त्यांच्याकडं पाटीवरच्या पेन्सिलपासून ते शाळेतल्या क्रमिक पुस्तकांपर्यंत सर्व काही मिळायचं. त्यांच्या दुकानातील निम्या वस्तू टांगलेल्या पिशवीत असायच्या. कशात काय ठेवलंय हे त्यांनाच सापडायचे. रंगपंचमीला रंग, पिचकाऱ्या ते विकायचे. सुट्टीच्या दिवसात पतंग व मांजा, आऱ्या. श्रावणात चातुर्मास व स्तोत्रांची पुस्तकं विकायचे. दिवाळीत टिकल्यांची डबी व पिस्तुलं विकायचे. मी त्यांच्याकडून गोष्टींची पुस्तके, पाटीवरची पेन्सिल, रंगीत घोटीव कागद, शाईच्या पुड्या, स्पंजची डबी, ड्राॅपर, इ. अनेक वस्तू घेतल्याचं चांगलं आठवतंय.
त्याकाळी सोरट नावाचा प्रकार असायचा. म्हणजे एखाद्या जाड कार्डशीटवर चाॅकलेटची छोटी पाकीटं लावलेली असायची. त्यातूनच आपण एक खरेदी करायचं. त्यांतील असलेले छोट्या कागदावरचे नंबर ओळीने जमा केले तर एखादं पेन भेट मिळायचे. मी एकदा १ ते ८ पर्यंत नंबर मिळवायचा प्रयत्न केला. परंतु ‘आठ’ नंबर काही केल्या मिळेना. शेवटी लाल बाॅलपेनने इंग्रजी 3 नंबरचा 8 केला. भावेंनी चष्मा लावून नंबर तपासले. त्यांनी लाल बाॅलपेनने केलेली ‘करामत’ ओळखली. त्यावरुन मला त्यांनी फैलावर घेतले. मी निमूटपणे घरी परतलो.
माझी शाळा झाली, काॅलेज संपले. एव्हाना भावेंनी वयाची पंच्याहत्तरी पार केली होती. दुकानात त्यांची मुलगी बसू लागली. आता पूर्वीसारखं दुकान चालतही नव्हतं.
तिथं नवीन इमारत बांधण्यासाठी तेथील सर्व दुकाने पाडण्यात आली. भावे आता फक्त आठवणीतच राहिले. आमच्या आॅफिसला लागूनच ओक रहात होते. एक दिवस भावेकाका हळूहळू आमच्या दिशेने येताना दिसले. त्यांनी विचारले, ‘ओक इथंच राहतात ना?’ मी त्यांना शेजारी ओकांकडे घेऊन गेलो. भावे ओकांचे मावस काका होते. ओकांकडून ते आमच्या आॅफिसमध्ये आले, जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. त्यांनादेखील आम्ही भेटल्याचा आनंद झाला. ते निघाले. हळूहळू चालत पुढे रस्त्यावर वळल्यावर दिसेनासे झाले. काही दिवसांनी ओकांनी ते गेल्याचे सांगितले. फार वाईट वाटलं. लहानपणची एकेक माणसं काळाआड निघून गेली.
आज भावेंच्या दुकानाच्या जागेवर टोलेजंग इमारत उभी आहे. त्या इमारतीच्या उंचीपेक्षा भावेंनी एखाद्या व्रतस्थासारखे चालविलेले दुकान, आपलेपणाची वागणूक त्याहूनही गगनाला भिडणारी आहे.
आता पन्नास वर्षांनंतर पुणं बदलून गेलंय. मराठी माणसांची दुकानं तुलनेनं कमी आहेत. त्यातूनही एखादं दिसलं तर मी त्याच दुकानात जातो आणि खरेदी करतो….
शेवटी आपल्या माणसांचं दुकान, हे ‘आपलंच दुकान’ असतं… नाही का?
© – सुरेश नावडकर २९-११-२०
मोबाईल ९७३००३४२८४
Leave a Reply