दूर कुरूक्षेत्रावर कौरव आणि पांडव दोघांचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकलेले. सैनिकांच्या हातात शस्त्र, अर्जुन, भीम, भीष्म, द्रोणाचार्य सारे उभे एकमेकांच्या समोर. इकडे अंध धृतराष्ट्राला उत्सुकता कुरूक्षेत्रावर काय होत आहे हे जाणून घेण्याची पण ते सारे जाणणार कसे, सांगणार कोण?
या प्रश्नाचे उत्तर ज्याच्याजवळ असते त्याचे नाव असते संजय. या संजयाचे वैशिष्ट्ये असे असते की तो दूरवरचे पाहू शकत होता. त्याला तशी दैवी शक्ती लाभलेली असते म्हणून.
दिव्यदृष्टीच्या आधारे हा संजय कुरूक्षेत्राचे सारे युद्ध पाहतो, गीता ऐकतो आणि धृतराष्ट्राला त्याचे वर्णन करून सांगतो.
दिव्यदृष्टीधारी त्या संजयाची आज आठवण होण्याचे कारण म्हणजे आपण सारे त्या संजयाची भूमिका आता वठवत आहोत… कसे… आधुनिक काळात सर्वांच्या सोयीसाठी आणि संवादाचे साधन म्हणून आपण सारे मोबाईलधारी झालेलो आहोत. हा मोबाईल म्हणजे आपल्या सर्वांची दिव्यदृष्टी. या मोबाईलच्या माध्यमातून जगभरात घडणाऱ्या घटना घडामोडींची माहिती क्षणात आपल्यापर्यंत पोहचते.
आपल्या गाव खेड्यात झालेल्या घटना, घडामोडी क्षणभरात जगात पोहचतात, ही आहे या मोबाईलधारी संजयाची कामगिरी. फक्त ही कामगिरी पार पाडताना आपल्याला भान राहत नाही. कोणत्याही गोष्टीचे. जे घडले, जसे घडले तसे आपण इतरांपर्यंत पोहचवतो. हे करत असताना त्याच्या परिणामांचा विचार करायला आपल्याला वेळ असतो का? असा विचार आपण साऱ्यांनीच करायला हवा. कारण हा विचार न केला गेल्यामुळे बऱ्याचदा वाईट प्रसंगाचा जन्म होतो.
कुरूक्षेत्रापासुन संजय प्रत्यक्षात खुप लांब होता, त्यामुळे तो असमर्थ होता सारा रणसंग्राम रोखण्यासाठी. आपण मात्र आपल्या हाती असलेल्या गोष्टी देखील पुर्णपणाने करत नाही, ही खंत आहे. आपल्या डोळ्यादेखत झालेल्या अपघातावेळी मदत करणे सोडून आपण फोटो काढत बसतो, क्लिप तयार करतो आणि ती व्हायरल करण्यात धन्यता मानतो, कोण सर्वांत आधी अशा गोष्टी व्हायरल करतो यात आपल्याला कोण अभिमान वाटतो. वास्तविक अशावेळी आपल्या मदतीची गरज असताना आपण कोणत्या गोष्टी करत बसतो याबाबत चिंतन व्हायला हवे.
आपल्या हातात संजयाची दृष्टी लाभलेल्या मोबाईलचा चांगला वापर केला जाऊ शकतो ना… या गोष्टीचे आपणही भान ठेवायला हवे असे वाटते. आपण कोणत्या गोष्टी व्हायरल करतोय हे तरी पाहिले पाहिजे ना. वास्तविक पाहता मोबाईल हे असे साधन आहे ज्या व्दारे आपण आपल्या भोवताली घडणाऱ्या घटना, घडामोडींवर बारकाईने नजर ठेवू शकतो. प्रत्येक घटनेची नोंद घेण्याची क्षमता आपल्या मोबाईलमध्ये असते. त्यामुळे चांगल्या वाईट गोष्टींची नोंद आपण ठेवू शकतो. जवळपास कुणी मोबाईलधारक असला तर त्याची चांगल्या अर्थाने दहशत वाटली पाहिजे, असे वातावरण कधी निर्माण होऊ शकेल काय? या गोष्टी आपण करू शकतो पण करत नाही. कारण आपल्याला या गोष्टींची जाणीवच राहिलेली नाही.
आधुनिक युगात जसे यांत्रिकीकरण वाढतेय तसे आपल्या मनाचे देखील यांत्रिकीकरण होऊ लागले आहे. आपण फक्त त्या संजया सारखे माहिती इकडून तिकडे देण्याचे, घटना इकडून तिकडे सांगण्याचे काम करू लागलो आहोत…
हे योग्य आहे का?
— दिनेश दीक्षित
(९ एप्रिल २०१८)
Leave a Reply