नवीन लेखन...

आपातीत गरजांची पुर्ती

मध्यंतरी दोन्सबर्ग न्युयार्क ची एक बातमी वाचली होती ती अशी – वैमानिकांना प्रशिक्षण देणारा एक मेंटर (प्रशिक्षक ) दोन तीन पायलट प्रशिक्षुंना पॅराशूट  ट्रेनींग साठी एका हेलिकॅाप्टर ने घेउन जात होता.दहा हजार फुट उंचीवर त्याने प्रशिक्षुं ना उडी घ्यायला सांगितली.एकांनी बरोबर उडी घेतली, त्याचे पॅराशूट अपेक्षेप्रमाणे उघडले.एक प्रशिक्षु उडी घ्यायला कचरत होता.प्रशिक्षकाने अचानकच बघ अशी उडी घ्यायची मी दाखवतो असे म्हणुन त्याने स्वत: पटकन उडी घेतली व  दुर्दैवाने पॅराशूट उघडलेच नाही कारण त्याने ते घातलेच नव्हते !  जे व्हायचे ते होऊन गेले होते. पोळी कां करपते- लक्ष नसते म्हणुन ,चटका कां बसतो- काळजी घेतली नाही म्हणुन ,त्याच धर्तीवर प्रश्न पडतो अशी दुर्घटना कां झाली ? तर हे उत्तर येईल की त्याने आधीपासुनच पॅराशूट घालुन ठेवण्याची साधी तयारी ( प्रत्याशित आपात स्थिती करता तरतुद ) केलीच नव्हती म्हणुन.   उडी घ्यायची असो किंवा नसो त्याने सुरक्षा कवच हे अंगावर घालायला हवेच होते.गरज ही काही सांगुन येत नसते परंतु अशा संभावनांना गृहीत धरुन ,मग कुठलीही बाब असो ,तशी बेगमी असायलाच हवी.  संत कबीर यांनी म्हटले आहे.

‘ काल करे सो आज , आज करे सो अब ।
पल  मे  प्रलय होएगी , बहुरि  करेगो  कब ॥’

अर्थात आजचे काम उद्यावर विनाकारण लांबवु नका,सगळीच कामे एकादिवशी होणार नाही म्हणजेच योग्य ते  नियोजनबध्द तर्हेने उरकत जावे, तशी सवय लावुन घ्यायला हवी म्हणजे धोके टाळतां येऊ शकतात.

एक म्हण आहे “अडला नारायण गाढवाचे पाय धरी”. आता नारायण गाढवाचे पाय धरेल की नाही सांगतां येत नाही परंतु गरज पडली तर मनुष्य मात्र  नक्कीच धरेल कारण मुळात मनुष्य एक स्वार्थी प्राणी आहे. स्वार्थासाठी ,गरजेसाठी  तो अगदी काहीही करु शकतो, मात्र गरज भागल्यानंतर त्याचे वर्तन म्हणजे ’गरज सरो आणी वैद्य मरो ‘असेच असते. अनुभवाने त्याला कळते की ‘तहान लागल्यावर विहीर खणण्यात’ अर्थ नसतो म्हणुन आकस्मिकतेच्या गरजांसाठी आधीपासुनच प्रावधान करुन ठेवायला हवे.मनुष्य बर्याचशा गोष्टी इतर प्राण्यांकडुन पाहुन शिकला असे म्हणतात.वाळवंटातील उंटाला पाणी पिताना  जाणीव असते की पुन्हा पाणी केव्हा मिळेल याची शास्वती नाही म्हणुन तो अतिरीक्त (spare )पाणी पोटात साठवुन ठेवतो.देवाने त्याच्या शरीरात तशी सोय केलेली असते.गाय सुध्दा गरजेपेक्षा जास्त खावुन घेते व नंतर गरजे नुसार रवंथ करुन अन्न पोटात पाठवते.मानवी शरीर रचनेत सुध्दा इश्वराने काही काही अवयव duplicate ठेवले आहे,उदा: दोन डोळे,दोन नाकपुड्या (nostrils )दोन कान,दोन किडनी वगैरे. इतकेच नाही तर मनुश्याने खाल्लेले काही प्रकारचे अन्न ‘चरबी’च्या रुपात पोटावर साठवल्या जाते व नंतर जर उपासमार झाली तर ती चरबी वितळुन आवश्यक उर्जा मिळुन जाते.आवश्यक गरजांच्या बाबतीत मात्र संयम बाळगायला हवा व कुठेतरी सुवर्ण मध्य साधायला हवा.

माणसाच्या जिवंत राहाण्यासाठीच्या मुळ गरजा म्हणजे हवा,पाणी व अन्न. एकदा ह्यांची सोय झाली की मग गरज येते ती म्हणजे लज्जा रक्षणार्थ कपडे , सोबती साठी सहचारी , सुरक्षिततेसाठी निवास( घर). एकदा कां हे मिळाले की सुरु होतात  दुय्यम गरजा. ह्या सगळ्यांची पुर्तता झाली की माणसाला भ्रांत पडते ‘उद्याची ‘ मग परवाची नंतर पुढपुढची भविष्याची.एक गोष्ट मिळाली तर दुसरी साठी धडपड ,हे असे चालुच राहते.एकुण काय तर वस्तु,संपत्ती जमवत राहायचे आणी नंतर त्यांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न व सतत ची काळजी.हे सर्व मिळवण्याचा परिणाम तब्येती वर होतो.हे सगळे करुन जर त्यांचा उपभोग घेतां आला नाही तर सगळे व्यर्थच म्हणायचे. ह्यावरून एका सावकाराची गोष्ट आठवली.

एका गावात एक सावकार रहात असे.त्याचे पाशी मुबलक संपत्ती होती इतकी की चार पीढ्या नुसते बसुन ऐशारामात राहु शकतील.त्याला सतत काळजी असायची की कोणी चोर दरोडेखोर  येतील ,माझी संपत्ती नेतील,इतकी काळजी की त्याचा पहारेकर्यांवर पण विश्वास नसे. हे सततचे असल्याने त्याची तब्येत ठीक रहात नसे,झोप येत नसे.एकदा गावांत एक ज्ञानी सन्यासी येतो . सावकाराला वाटते आपण त्याला भेटून आपली समस्या सांगावी तो निश्चितच उपाय सांगेल. सन्यासी म्हणाले तु जर माझे एक काम करशील तर तुला नक्कीच  शांती मिळेल असा उपाय सांगीन .त्याला एक गाठोडे देऊन तो म्हणाला की हे गाठोडे तु दोन कोसांवर असलेल्या टेकडी वर एक म्हातारी राहाते तिला नेऊन दे मात्र तिला काही त्रास होईल असे काही करु नको. त्याप्रमाणे सावकार मजल दरमजल कसाबसा टेकडीवर गेला व म्हातारी झोपली असल्याने ती उठेपर्यंत वाट बघत बसला. तास दीड तास झाला तरी ती निश्चिंत झोपली होती.सावकाराला आश्यर्य वाटले.ती उठल्यावर त्याने तिला गाठोडे दिले व खाण्यासाठी काही देणार तर ती म्हणाली माझे जेवण झाले व संध्याकाळसाठी माझेकडे भाकर आहे. सावकार म्हणाला उद्याचे काय? हे तुझ्याकडे राहु दे .म्हातारी म्हणाली उद्यासाठी तो वरचा आहे नं,मग मी कशाला चिंता करु.सावकाराला कळुन चुकले की आपण वृथाच चिंता करत बसतो म्हणुन आपल्याला झोप येत नाही.सावकार परत गेल्यावर सन्याशाला नमस्कार करतो व म्हणतो तुम्ही मला म्हातारीची भेट घडवून खुप ज्ञान दिले आहे ,आता मला काही भिती नाही.आशय हा की काही गोष्टी देवावर सोडणेच इष्ट ठरते.

असे म्हणावे तर जगात देवावर विश्वास न ठेवणार्या नास्तिक लोकांचा पण एक वर्ग असतो .इतकेच कशाला, “चार्वाक तत्वज्ञान” अर्थात भोगवादी प्रवृती जोपासणारे लोक सुध्दा खुप असतात.त्यांची मनोधारणा येणेप्रमाणे असते-

यावत् जीवेत सुखं जीवेत ।
ऋणं कृत्वा घृतं पिबेत ॥
भस्मीभूतस्य देहस्य ।
पुनरागमनं कुत: ॥

अर्थात खा,प्या, मजा करा,आवश्यक असेल तर  ऋण घ्या पण तुप प्या.त्यातच सुख असते. मृत्युनंतर शरीराची राख झाल्यावर शरीर अस्तित्वात पुन्हा थोडीच येणार ! वेदबाह्य असले तरी चार्वाक/लोकायत दर्शन हा एक सिध्दांत आहे व तो कसा अस्तित्वात आला ह्या बद्दल एक भाष्य आहे .असे म्हणतात की ह्या जगतात जेव्हा असुरशक्ती प्रबळ झाली होती तेव्हा इश्वराने त्यांच्यात अशी वेदबाह्य मनोभावना जागृत करुन त्यांना जाणीव पुर्वक धर्मभ्रष्ट करुन मग त्यांच्या शक्तीचा र्हास करुन त्यांचे पतन केले . तसा पद्मपुराणात उल्लेख असल्याचे म्हटले जाते .ते आचरणारे लोक ‘स्वत:च्या पोळीवर तुप ओढायला’ तत्पर असतात.

वर बघितलेली एक वृत्ति म्हणते प्रयत्न करायची गरज नाही ‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी’,दुसरी वृत्ति म्हणते “जो दुसर्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला “ म्हणुन ‘प्रयत्न करा व येन केन प्रकारेण आपली गरज भागवुन घ्या’.तर ह्या दोन्ही प्रवृतींच्या मुळे मग प्रश्न असा येतो की किती गरजा देवावर सोडाव्या व  स्वार्थासाठी नाही पण गरजेपुरत्या तरी आपण स्वत: किती भागवाव्या? आणी हे ठरवावे तरी कसे ? ह्या संदर्भात संत तुकाराम महाराज तर त्यांच्या अभंगात म्हणतात की –

‘लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥
ज्याचे अंगी मोठेपणा । तया यातना कठीण ।
तुका म्हणे जाण । व्हावे लहानाहूनि लहान ॥’

म्हणजे इतक्या लहान मुंगीला तर साखरेचा कण मिळतो व पुरतो ,तिला जास्ती काही नको असते, याउलट समुद्र मंथनातून मिळालेल्या चौदा रत्नातील एक ‘ऐरावत ‘ या इंद्राच्या बलाढ्य हत्तीला तर त्याच्या माहूत्याकडुन अंकुशाचा मारच खावा लागतो.मुंगी इतकी लहान की तिच्या अस्तित्वाची कोणी दखल पण घेत नाही परंतु जितका मोठेपणा जास्त तितकीच त्याला संपत्ती व लौकिकाची हाव जास्ती व पर्यायानी दुःख: जास्त, म्हणुन हे देवा मला तर लहानात लहान बनव म्हणजे मुळात गरजांच जास्त राहाणार नाहीत. ‘नागिन’ सिनेमातल्या हेमंत कुमार यांनी गायलेल्या ,राजिन्दर कृष्ण यांनी रचलेल्या एका प्रसिध्द भजनात असाच आशय दर्शवला गेला आहे – –

“तेरे  द्वार  खडा  एक  जोगी . .
न  मॅांगे यह  सोना  चॅांदी  मॅांगे दर्शन देवी …”

अर्थात,खरे प्रेम,खरी भक्ती असेल तर सोने चॅांदी यांची सुध्दा काहीच किंमत नसते मग इतर गरजा त्या काय !

आता हे सिनेसृष्टी,कल्पनासृष्टीत तर ठीक वाटते परंतु व्यवहारात गरजांना व त्यासाठीच्या धडपडीला अंत च नाही असे आढळते. नुकतीच एक विस्मयकारक बातमी वाचनात आली ती म्हणजे –

काही दिवसांपूर्वी चेन्नईला रस्त्याच्या कडेला एक भिकारी मृतावस्थेत आढळला.रस्त्याच्या बाजुलाच असलेल्या त्याच्या झोपडीत पोलीसांना पोत्यांमध्ये चक्क एक करोड श्याहिंशी लाख व काही हजार रुपये मुल्य असलेली नाणी सापडली.बातमी एकदम विश्वास ठेवण्यालायक वाटत नसली तरी अशक्य पण नाही कारण हल्ली भिकार्यांची बॅंकांमध्ये रग्गड खाती असतात हे ऐकिवात आहे.ह्या बातमीत मुळात बरेच मुद्दे चर्चनीय आहेत तरी भिकारी एकटा असुन इतकी जमा संपत्ती झोपडीत ठेवलीच कशी हे आश्चर्य आहे.तो अशिक्षीत होता हे निश्चीत कारण हे पैसे बॅंकेत ठेवले तर त्यावर येणार्या व्याजावरच तो सुखात राहु शकला असता हे त्याला कळले नसावे.त्याचे तर कुटुंब पण नव्हते त्यामुळे एकट्याला रोज किती पैसे लागतात,महिन्या दोन महिन्याला किती लागु शकतात व निकड भासलीच तर जास्तीत जास्त किती पैसे लागु शकतात वगैरे सगळे त्याला अकलनीय असावे त्यामुळे तो करोडों रुपयांवर लोळत होता. मरणोपरांत त्याने शासनाला अनभिज्ञपणे मोठे दान दिले असे म्हणु किंवा दहा पंधरा वर्षे भीक मागितल्याच्या गुन्ह्याची शिक्षा म्हणुन  तेवढा दंड सरकारी खजिन्यात भरला असे म्हणु या.

वरील बातमीचा इथे उल्लेख करायचे कारण हे की आपण इतके बेहिशोबी व अव्यावहारिक नसलो तरी बरेचजण आपल्या वास्तविक ”गरजां”विषयी तितकेसे काटेकोरपणे जागरुक नसतात व आपण नुसते धनसंचय करत रहातो ,स्वत:च्या वृध्दापकाळासाठी , बायको नंतर मुलांसाठी इतकेच काय नातवांसाठी आणी त्याला अंत नसतो. फरक हा की आपण रक्कम बॅंकेत ठेवतो पण तसे बघितले तर आपली मानसिकता तीच !

आदी मानवाच्या गरजांची व त्यांच्या आपुर्तीचा  इतिहास थोडक्यात बघु या ,कारण तो फारच मनोरंजक आहे. पुर्वी मनुष्य ‘ आज मिळाले ते आपले’ व ’’उद्याचे उद्या बघु’ अशा अवस्थेत होता. नंतर आपल्याजवळ जास्त असलेले दुसर्याला देऊ करुन त्याच्या बदल्यात त्याचे जवळचे आवश्यक ते आपण घ्यावे ,नंतर वस्तुंची अनेकांशी अदलाबदली मग हळुहळु तराजु आला व अशा स्वरुपात पण मर्यादीत व्यवसाय सुरु झाला. विचारांचे आदान-प्रदान ,संवाद व  दळणवळण सुकर झाल्यावर देवाण-घेवाणी साठीचे माध्यम अशा स्वरूपात सर्वमान्य  चलन( पैसे ) आले व व्यापाराला सुरवात झाली. देशादेशांमधल्या चलनाचे परस्पर  तुलनेसाठी ‘सोन्याचे मुल्य’ हे संदर्भ म्हणुन प्रचलनात आले. व्यापाराबरोबर साठवण, हंगामी आवश्यकते साठी अतिरीक्त साठा,तथाकथित अनावश्यक साठा, नफा-तोटा, काळाबाजार हे आले. ’बळी तो कान पिळी’या तत्वावर माणसांची पिळवणुक अगर देशांची अडवणूक व्हायला लागली,डॅालरची किंमत कधी कमी न होणे हा पण त्यातलाच भाग झाला.गुलामगिरीत पिंजल्या गेलेल्या देशांना स्वातंत्र्य दिल्यानंतर त्यांची लूट झाली व देशा-देशांमध्ये मोठी आर्थिक  दरी निर्माण झाली. वाढत्या दळणवळणाच्या संसाधनांमुळे देशादेशांमधली चुरस व स्पर्धा वाढुन माणसातल्या मानवतेचे अवमुल्यांकन झाले. पाहिजे त्यावेळी  पाहिजे ती वस्तु न मिळण्याच्या आशंकेमुळे(as a major of safety ) आकस्मिकतेची तरतुद ‘ भुक नसो पण शिदोरी असो ’ या उक्ती प्रमाणे व्हायला लागली.प्राथमिक अवस्थेत दळणवळण कठीण होते यायला जायला खुप अवधी लागायचा, आजच्यासारखी हॅाटेल नसायची तेव्हा प्रवासात भुक लाडु-तहान लाडु ठेवायचे ,घरगुती औषध म्हणुन ‘आजीचा बटवा ‘असायचा.व्यावहारीक जीवनात पण समाज अनेक बाबींमध्ये जसे स्पेअर पार्टस,विद्युत,औषधे,पेट्रोल,क्रूड तेल,संसाधने वगैरे गोष्टींचे तात्कालिक गरज नसली तरी अतिरीक्त बेगमी करायला लागला आणी हळुहळु तो पायंडाच पडला. आपण फक्त गरज पडली तर म्हणुन साठा करत असतो कारण आपली मानसिकताच तशी झाली आहे परंतु लागले तर जास्तीत जास्त किती लागेल हा सारासार विचार करत नाही.आणीबाणी साठी तरतुद व मनसोक्त साठा ह्यामध्ये सुवर्ण-मध्य साधायला हवा. वस्तुंचे महत्व कळायला हवे .एक शेअर करण्याजोगा अनुभव म्हणजे युरोपमध्ये गेलो असता, काही काही देशांत बर्याचशा हॅाटेलस मध्ये एक गंमतीदार पण अर्थपुर्ण सुचनाफलक दिसला,” Eat as much as you can ,but take only as much as you can eat” म्हणजेच उगीच घेऊ नका व टाकु नका.ह्यावरुन त्यांना वस्तुंचे महत्व किती असते ते दिसते.

आपात स्थितीच्या गरजेसाठी प्रावधान करण्याची कल्पना बहुदा मुंगी जसे कण अन कण पावसाळ्यासाठी जमवुन ठेवते या गोष्टी पासुन आली असावी. गरजेच्या तरतुदीची दुसरी आवश्यकता सुरक्षेच्या दृष्टीने पण जाणवली असणार मग ती वस्तुची असो ,औषधांची असो वा पैशांची असो .काही रोग हे असे असतात जे सगळ्यांना होत नाही तरी होऊ शकतात ह्या संभावनेपोटीच आपण रोगप्रतिबंधक लस टोचून घेतो. सुरक्षा तरतुदीचे सामान्य उदाहरण म्हणजे इंजीनियर जेव्हा नदीवर काही टन वजनाचा ट्रक जाईल म्हणुन पुल बांधतो तेव्हा तो प्रत्यक्षात दुप्पट किंवा तिप्पट वजनी लोड त्यावरुन जाईल असे सुरक्षेच्या दृष्टीने  अनुमान मानुन प्रत्यक्षात बांधतो. पुल जर दोन्ही दिशांना वापरल्या जाणार असेल तर केव्हा तरी एकाच बिंदूवर दुप्पट वजन येणारच व त्या स्थितीत तिप्पट वजनाचे अनुमान पण चुकणारच.( दोन किंवा तीन पट हा झाला सुरक्षा गुणांक,factor of safety.) जरी अशी स्थिती कधीतरी येणार असली तरी कुठल्याही स्थितीत चुक होता कामा नये ही खबरदारी घ्यायला हवी म्हणुन सारा खटाटोप.

प्राचीन काळात पण युध्दात संभावित धोक्याविरुध्द सुरक्षेच्या दृष्टीने शरिराभोवती कवच वापरत असत.सुर्यपुत्र कर्णाला तर सुर्याने जन्मत:च कवच-कुंडला चे आवरण निर्मिले होते.सुरक्षा नुसती शारिरीक च नसते तर आत्मबलाने मानसिक सुध्दा असते व ती येते दुर्गा कवच,अर्गल,कीलक आदी किंवा अन्य श्रध्दा असलेल्या मंत्रांच्या सातत्याने उच्चारण्यामुळे.आता उदाहरण द्यायचे झाले तर अडीअडचणीला कामी पडावे म्हणुन आपण पैसे बचत करुन जसे बचत खात्यात जमा करतो तसेच ही आध्यात्मिक उपासनेनी मिळणारी आत्मशक्ती सुध्दा संचीत होत जाते व मनुष्याचे प्रारब्ध सुध्दा क्वचित प्रसंगी बदलते, “ सनद रहे वक्त काम आए “ म्हणतात तसे. ह्याच संदर्भात एक “सेवा बॅंक” म्हणुन गमतीदार पण अर्थपुर्ण व्यवस्थेबद्दल काही दिवसांपुर्वी वाचनात आले होते.जेव्हा आपण धडधाकट असतो तेव्हा वयस्क किंवा परावलंबी व्यक्तींना आपण सेवा द्यायची,जितके तास सेवा करु तितके तास आपल्या नांवे सेवा बॅंकेत जमा होतील व जेव्हा आपण परस्वाधीन होऊ तेव्हा ती बॅंक तितके तास दुसर्या कोणाच्या माध्यमातुन बिनामुल्य आपली सेवा करेल.एकदम भन्नाट कल्पना असली तरी ह्यात व्यवहारीक अडचणी असतील पण हे जर प्रचलनात आले तर किती सोईचे होईल.ह्यांत ‘जर तर’ आले पण आकस्मिक येणार्या गरजे साठी किती सोईचे होईल नं? .बचतीच्या सिध्दांताप्रमाणेच  दुसरे ‘ विमा ‘क्षेत्र असते. जनमानस विमा करतो ते यदाकदा होऊ शकणार्या  दुर्घटनेच्या संभावनेच्या अंतर्भावासाठी. दुर्घटना सगळ्यांनाच व त्याही नेहमी होत नसतात,तरी सुरक्षा उपाय म्हणुन आपण सगळे विमा करतो व वास्तविक फायदा एखाद दुसर्यालाच होतो.

तांत्रिक क्षेत्रात आणीबाणीची स्थिती येते कां व आली तर तरतुद कशी करतात ही उत्सुकता आपल्याला असते. यथोचित सुरक्षा गुणांक ठेवुनच उपकरणे यंत्र वगैरे डिझाईन केल्या व बनवल्या जातात. आधुनिक युगात कंप्युटर हे एक असे महत्वपुर्ण उपकरण आहे जे बहुदा सगळेजण वापरतात . वर उल्लेखीत आपदा स्थितीतील कल्पनांचा उपयोग मी माझ्या शोध प्रबंधात केला होता. ते मनोरंजक वाटेल म्हणुन शेअर करतो. कंप्युटर मध्ये प्रोसेसर हा सगळ्यात महत्वाचा घटक असतो व त्यात काही बिघाड झाला तर कंप्युटर काम करणेच बंद करेल.कंप्युटर मध्ये विश्वसनीयता ( Reliability) ही अत्यंत गरजेची बाब असते. काम बंद पडु नये म्हणुन त्यात अनेक प्रोसेसर्स ( multiprocessor )काम करतात.हे विवीध प्रोसेसर एकमेकांशी  “ नेटवर्क” च्या सहाय्याने जोडलेले असतात.आता जर एखाद्या नेटवर्क मध्ये दोष आला तर तीच व्यत्ययाची स्थिती यायची .तसे होऊ नये म्हणुन निर्दोष ( fault tolerant ) म्हणजे दोष सहन करू शकणारे नेटवर्क वापरतात.मी माझ्या शोध प्रबंधात असेच निर्दोष नेटवर्क बनवण्याचे प्रस्ताव सुचविले ज्यांत नेटवर्क मधील एक कनेक्शन सदोष झाले तर त्या आणीबाणीच्या स्थितीत सिग्नल दुसर्या मार्गाने पुढे जाईल व अशा “आपरीवर्तक “ ( modular ) किंवा ‘परिवर्तनसुलभ ‘ नेटवर्क मुळे काम न खोळंबता चालु राहील अर्थात कंप्युटर कार्यप्रणाली मध्ये व्यत्यय ( breakdown) येणार नाही. कंप्युटरस च्या अशा विश्वसनीयतेमुळेच अचुक सर्जीकल स्ट्रॅाईक व चंद्रावर मानवाला उतरवण्यासारखे जोखिमेचे कार्य यशस्वीरित्या संपन्न होऊ शकतात.

रोजच्या दैनिक व्यवहारात मात्र व्यक्तिला प्रत्याशित गरजांच्या पुर्ततेबाबत निर्णय उपलब्ध संसाधनांना बघुन स्वत: चे स्वत: घेणे गरजेचे ठरते, तेही योग्य वेळेलाच कारण आपली कृतीच आपले नशीब ठरवणार असते. काहीच केले नाही तर आहेच, कालाय तस्मै नम:। Time takes it’s own course!

— सतीश परांजपे 

2 Comments on आपातीत गरजांची पुर्ती

  1. आजच्या पळापळीच्या जीवनात क्षणभर शांतता महाग झाली आहे. आपण वस्तुस्थिती ची जाणीव करून दिली आहे.

  2. आजच्या पळापळीच्या जीवनात क्षणभर शांतता महाग झाली आहे. आपण वस्तुस्थिती ची जाणीव करून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..