निवडणूकीचा मोसम सुरू झाला आहे. सर्वच पक्ष आपापले जाहीरनामे, वचननामे नागरीकांसाठी जाहीर करत आहेत. या सर्व ‘नाम्यां’त पक्ष काय करू इच्छितो हेच जाहीर केलेलं असतं. परंतू नागरीकांना काय हवंय याचा विचार कुणीच केलेला दिसत नाही, करतानाही दिसत नाही..!
प्रत्येक वाॅर्ड मुंबईचाच हिस्सा असला तरी प्रत्येक वाॅर्डाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत, असतात. एखाद्या वाॅर्डच्या गरजा काय आहेत हे त्या वाॅर्डात राहाणारे नागरीकच चांगल्याप्रकारे सांगू शकतात. आणि म्हणूनच नागरीकांच्या गरजांप्रमाणे त्या त्या वाॅर्डाची सुधारणा केली जावी असं दुर्दैवानं कुणालाच वाटत नाही.
लोकशाहीचा पाया असलेल्या मतदारांना सर्वच पक्षांनी गृहीत धरलंय व त्यामुळे असं होतं. एकदा का आपल्याला कुणीही गृहीत धरलं तर मग आपण असलो काय आणि नसलो काय, कुणाला काहीच फरक पडत नाही ही एरवीही अनुभवायला येणारी बाब आहे. आपल्या मापाचे कपडे कोण शिवणार असं म्हणतो ते याचमुळे..! मतदारांना गृहीत धरल्यामुळे मोठ्या भावाचे, अंगाने थोराड असलेल्या धाकट्या भावाचे वा चुलत/मामे-मावस भावांचे, अंगाला बसोत अथवा न बसोत, कपडे वापरणं ओघानेच आलं..खास आपल्यालाठी कपडे शिवावेत असं कुणालाच वाटत नाही.
सुख छोट्या छोट्या गोष्टीतच असतं असं थोर लोक म्हणतात ते काय उगाच नव्हे..
मोठाली धरणं, कोस्टल रोड, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक इत्यादी मोठ्या गोष्टी सर्वच लोकांसाठी आहेत. त्यांचं स्वागतच आहे. परंतू आपल्या घरात/सोसायटीत पुरेश्या दाबाने पाणी नाही, आपला रोजचा प्रवास ज्या रस्त्याने होतो त्या रस्त्यातील खड्डे व पेव्हर ब्लाॅक्स नांवाच्या पापाचा नाश, आपल्या वाॅर्डात एखादं वाचनालय, व्याख्यानं ऐकण्यासाठी एखादा लहानसा हाॅल होणं, बैठ्या वस्तीत पुरेशी शौचालयं इत्यादी लहान-सहान गोष्टी आपल्या जिव्हाळ्याच्या असतात त्याबद्दल कोणताच पक्ष प्राथमिकतेने बोलताना दिसत नाही..
आपल्या वाॅर्डमधे काय काय सुधारणा व्हावी किंवा आपला परिसर कसा असावा-दिसावी याचा विचार अगदी सर्वच नसले तरी काही नागरीक नक्कीच करत असणार. मग त्या त्या वाॅर्डातून निवडणूक लढवणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला अशा नागरीकांचं मत विचारात घ्यावं असं का वाटत नाही.? ‘नागरीकांचा जाहीरनामा’ असावा असं एकाही पक्षाला का वाटत नाही हे आश्चर्यच आहे. आश्चर्य कसलं म्हणा, नागरीकांना गृहीत धरलं की असंच व्हायचं..
प्रत्येक वाॅर्डच्या -अगदी १०० टक्के नसल्या तरी – काही गरजा जरी भागल्या गेल्या की अख्ख शहर सुंदर होऊ शकेल.. परंतू त्यासाठी त्या त्या वाॅर्डातल्या विचारी नागरीकांना प्रत्येक पक्षाने विचारात घेणं आवश्यक आहे..धरणं, मोठाले रस्ते, उड्डाण पुल, स्मारकं, पुतळे होत राहातीलच परंतू मतदार असलेल्या नागरिकांचं रोजचं जगणं सुसह्य होणं जास्त महत्वाचं असतं याचा विचार सर्वच पक्षानी करून त्यानुसार पावलं टाकली तर उत्तम होईल असं मला वाटतं..
वाॅर्डाच्या मापाचे कपडे शिवणं अत्यंत आवश्यक झालंय..!!
– नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply