नवीन लेखन...

आरोग्य व्यवस्थेचा हुsर्रेव

आरोग्य व्यवस्थेचा हुर्रेsव

ही गोष्ट फार जुनी असून पूर्ण आठवत ही नाही तशी. पण जे मनात ठसतं ते मात्र आपण कधीच विसरु शकत नाही. वर्षानुवर्षे ते तसंच दिसतं डोळ्यासमोर. आपल्या बालपणीच्या आठवणीत रमायला सर्वांनाच आवडतं. कित्येक माणसं आपलं बालपण वारंवार आठवत आठवत च जगत असतात. इतरांना ते सांगत असतात. ते सांगताना व आठवताना खूप गंमत वाटते.

मला सुध्दा बालपणीचे ते रम्य दिवस सतत खुणावत असतात. आमचं गाव अगदी छोटंसं खेडं. गावाला येण्यासाठी ना चांगला रस्ता होता, ना बसची सोय होती. गावात दोन खोल्यांची सरकारी शाळा ही एकच अशी इमारत होती की पूस्तकात ‘ इ’ इमारतीचं शिकतांना ज्याच्याकडे पाहून म्हणावं की ही अशी असते इमारत. बाकी सर्वांची घरं म्हणजे वाडे होते. मोठे दार, आत गेलं की दोन बाजूला ढाळंज वर लाकडी कडी किलचण, माळवंद. घराच्या बाबतीत तेंव्हा ढाळंज, कडी, किलचण, कोनाडा, उंबरा, वसरी, न्हाणी, माजघर, बोळ, माळवंद, लाज्ञी, खुंटी, हौद असे कितीतरी शब्द कानी पडायचे त्यांची सवय होती. जागोजागी ते दिसायचं आज सिमेंट काॅंक्रीटची घरं झाली, तसे नवे शब्द आले बेड, किचन, हाॅल, टेरेस, टॅंक, टाईल्स,
प्लाॅस्टर, स्लॅप, हे सगळं बदल झालेलं पाहत असताना मनात वाटतं हा आपल्या भाषेवर झालेल्या आक्रमणाचा तर परिणाम नाही ना?

असो भाषेमध्ये आणि राहणीमानात काही वर्षांनंतर परिवर्तन घडत असतं तसं विचारामध्ये आणि मतांमध्ये देखील परिवर्तन होत असतं. पण आजही मला आठवते ते लहानपणी माझे वैद्यकीय तपासणी आणि औषधी याबद्दल असलेले मत फारच अप्रगत आणि अज्ञानी होते. तसे त्यावेळी सर्वांचेच तसेच मत असायचे. ताप आला तर बाबु मानभाव सकाळी पीठ मागायला यायचा त्याच्यापुढे तांब्याभर पाणीअन् रांखूडीचा ढेपसा घेऊन बसायचे तो बोटावर अंगठ्याने राखूंडी चोळून बारीक करत काही तरी पुटपुट करायचा. आपण त्याच्या हालचाली बघण्यात दंग, तितक्यात तोंडावर सपकण् पाणी मारायचा. मग काय दुस-या दिवशी ताप कमी. असेच चालायचे बरेचदा.

शाळेतआरोग्य तपासणी यायची कधी, खरं तर तेंव्हा आरोग्य तपासणी-फिफासणी काही कळत नव्हतं. आमच्या भाषेत सांगायचं‌ तर शाळेत इंजेक्शन आलंय एवढंच कळायचं. कधी पण अचानक यायचे हे लोकं, आधी कळलं तर फार बरं झालं असतं वाटायचं निदान त्या दिवशी शाळेला दांडी मारताआली असती. पण तसं व्हायचं नाही.
शाळेत तपासणी व्हायची तेंव्हा एरवी नुस्ता कलकलाट करणारी सगळी पोरं चिडीचूप होऊन जायची. भितीने बावरलेले आणि रडवेले चेहरे करून बसायचे सर्व जण. प्रत्येकाचं खिडकीकडे अधिक लक्ष असायचं. कारण ती एकच जागा होती अशी की जिथून उडी मारून पळून जाता येत होतं पण तिथं असायचे उभे आमचे गुरुजी. तरी एक दोन पोरं हिम्मत करुन गुरुजी ची नजर चुकवून उड्या हाणायचेच. आम्ही गुरुजी.. गुरुजी.. असं म्हणेपर्यंत तर ते पसार झालेलं असायचे… मग एकेकाला दुस-या वर्गात नेलं जायचं अन् इकडं बघ ते काय आहे? असं विचारणारा एक जण गावातलाच असायचा कुणीतरी त्यानं घट्ट पकडून ठेवलेलं असायचं अन् ते डाॅक्टर असे इंजेक्शन वर खाली करत असायचे पुढे काय व्हायचं ते बघण्याची हिम्मत आमच्यात नसायची. काही तरी टोचायचं दंडावर पण त्याआधीच भोकाड पसरुन राष्ट्रीय कार्यक्रमाला सुरुवात झालेली असायची. हात -पाय शक्य तेवढे झटकायचे, कुणी तर गडबडा लोळण घ्यायचे. सगळ्यांचा रडून रडून अवतार झालेला असायचा. मग हातावर दोन-चार गोळ्या द्यायचे सकाळ संध्याकाळ घ्या म्हणून सांगितलं की तिथून जे धूम ठोकायची की वाड्याजवळंच येऊन थांबायचं. तोपर्यंत आमच्या वाड्यातले सात -आठ जण बहिण भावंडं मिळून येऊन उभे टाकलेले असायचे. सर्वांनी मिळून डाॅक्टरच्या नावानं शिव्या देऊन निषेध नोंदवायचा. वाड्याच्या पायरीवर उभं रहायचं डाॅक्टरनं दिलेल्या गोळ्या एक एक करून फेकून द्यायच्या. हुर्रेव करत करत आरोग्य व्यवस्थेच्या तोंडावर त्यांच्याच गोळ्या फेकण्याचा कार्यक्रम असायचा. त्यात कोणाची गोळी लांब पडते याची स्पर्धा रंगायची खेळाच्या नादात सारं विसरून जायचं. आनंदानं उड्या मारत घरी जायचे. असे आमचे आरोग्य व्यवस्थेबद्दल चे अज्ञान आठवले की आजही हसावे की रडावे हे कळत नाही. आम्ही तर तेव्हा लहान होतो कळत नव्हतं पण आज कळते लोकही आरोग्य व्यवस्थेचा हुर्रेव करतांना मी पाहतो तेव्हा काय चूक काय बरोबर खरंच कळत नाही..

— संतोष सेलूकर, परभणी
७७०९५१५११०

Avatar
About डॉ.संतोष सेलूकर 25 Articles
प्राथमिक शिक्षक जि.प.परभणी येथे कार्यरत असून दूरचे गाव हा कविता संग्रह प्रकाशित आहे.अनेक ठिकाणी कविसंमेलने व साहित्यसमेलनात सहभाग. सातत्याने १९९५ पासून कविता व ललितलेख लेखन विविध काव्यलेखन स्पर्धेत पारितोषिक प्राप्त.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..