सकाळी लवकर उठावे. दोन श्लोक म्हणावेत. तळहात पहावेत. व्यायाम करावा, सर्व आह्निके आवरावीत. आणि देवासमोर उभे राहून प्रार्थना करावी. मनातल्या मनात नको. अदृश्यातील देवाची नकोच. आपल्या संस्कृतीमधे उपासना सगुणाची सांगितलेली आहे. सगुणाच्या उपासनेचा टप्पा पूर्ण झाला की निर्गुणाची उपासना करायची. पहिल्यापासूनच निर्गुणाची उपासना केली तर त्याचे परिणाम वेगळे दिसतात.
हिंदु धर्मामधे तर तेहेतीस कोटी (कोटी म्हणजे प्रकार ) देव सांगितलेले आहेत. एकच देव पुरला नसता का ? एवढ्या देवांची उपासना आवश्यक आहे का ? अन्य धर्मामधे प्रेषितांची पूजा केली जाते. तर हिंदुमधे देवांचे पूजन केले जाते.
देव कसा पहावा, त्यातील मुख्य देवत्व कसे ओळखावे ? मूर्त अमूर्त भाव कसे जाणावे ? सर्वांभूती परमेश्वर कसा असतो? इ. अनेक प्रश्नांची खरी उत्तरे आपणाला माहितीच नाहीत. कारण आम्ही त्याचा कधी चिंतन मनन करून अभ्यासच केला नाही. तसे शिकवलेच गेले नाही.
ब्रह्म तत्त्व कोणते ? विष्णू तत्त्व कुठे रहाते ? आणि शिव तत्त्व काय करते ? या तत्त्वांची उपासना केल्यास आपल्यातील त्या त्या तत्त्वाची वृद्धी होत जाते. आणि आपल्याला त्याचे परिणामही दिसतात, त्याला अनुभूती म्हणतात. या अनुभूतीतून शिकायचे असते, जाणायचे असते. ही जाणून घेण्याची जी पद्धत असते तिला ध्यान म्हणतात. आणि यातून मिळते ती समाथी अवस्था !
ही अवस्था प्राप्त होण्यासाठी त्यालाच शरण जावे. त्याच्यासमोर उभे रहावे आणि हात जोडून प्रार्थना करावी.
हे ईश्वरा,
माझा आजचा दिवस तुझ्या कृपेने मला तू मला अनुभवायला देत आहेस,
कालच्या दिवसापेक्षा आजचा दिवस तुझ्याच कृपेच्या वर्षावाने असाच सुंदर जाऊ दे !
माझ्यातील स्वभावदोष मला समजून ते पालटण्याची वृत्ती तूच मला दे !
मला माझ्या जगण्याचा खरा अर्थ काय आहे, या जीवाला तू या विश्वामधे कोणत्या उद्देश्याने आणले आहेस, हे मला समजून घेण्यासाठी बुद्धी दे !
तूच सर्व शक्तीमान आहेस,
असा सकारात्मक भाव ठेवून, त्या शिवाला शरण जावे. आणि आतील जीवाला शांत करावे.
त्वम ब्रह्मासि
त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी
त्वम शिवोस्मि
तूच ब्रह्म आहेस
तूच विष्णू आहेस
तूच शिवही आहेस
जे तत्व तुझ्यात आहे तेच तत्त्व सूक्ष्म रुपात माझ्यातही आहे. मला फक्त ही जाणीव सतत राहू दे.
शिवोअहम्
शिवोऽहम्
शिवोऽहम्
१३ फेब्रुवारी २०१८
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021
Leave a Reply